1 एप्रिल 2022 चालू घडामोडी – Current Affairs
1 April 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 एप्रिल 2022)
ईशान्येच्या तीन राज्यांतील काही भागांत ‘आफस्पा’मागे :
- नागालँड, आसाम व मणिपूर या राज्यांमध्ये सशस्त्र दले (विशेषाधिकार) कायदा (आफस्पा) अन्वये लागू करण्यात आलेले अशांत क्षेत्र अनेक दशकांनंतर, 1 एप्रिलपासून कमी करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी जाहीर केला.
- तथापि, या तीन बंडखोरीग्रस्त राज्यांमधून आफस्पा पूर्णपणे मागे घेण्योत आला आहे असा या निर्णयाचा अर्थ नसून, या तिन्ही राज्यांच्या काही भागांमध्ये तो यापुढेही लागू राहील.
- डिसेंबर 2021 मध्ये नागालँडमध्ये लष्कराने ‘गैरसमजातून’ केलेल्या गोळीबारात 14 नागरिक ठार झाल्यानंतर, या राज्यातून आफस्पा मागे घेण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमली होती.
- आफस्पाखालील क्षेत्रात घट हा या भागातील सुधारलेली सुरक्षाविषयक परिस्थिती, तसेच ईशान्य भारतातातील बंडखोरी संपवण्यासाठी आणि कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकारने सतत केलेले प्रयत्न आणि करार यांचा परिपाक आहे, असे गृहमंत्री म्हणाले.
- ईशान्य भारतातील तीन राज्यांमधील बंडखोरीची समस्या हाताळण्यासाठी, त्या भागात कार्यरत असलेल्या सशस्त्र दलांना मदत करण्यासाठी अनेक दशकांपासून या राज्यांमध्ये ‘आफस्पा’ लागू आहे.
- या कायद्यान्वये सुरक्षा दलांना मोहिमा राबवणे व कुणालाही वॉरंटशिवाय अटक करणे यांचे अधिकार मिळाले आहेत.
- याशिवाय, सुरक्षा दलांनी कुणाला गोळय़ा घालून ठार मारल्यास त्यांना अटकेपासून व खटला भरण्यापासून संरक्षणही देण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):
मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल जुलै 2024 पर्यंत होणार सुरु :
- मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल हे बीपीएक्स – इंदिरा डॉक्स येथे बनत असलेले आयकॉनीक क्रुझ टर्मिनल, जुलै 2024 मध्ये सुरु होण्याची अपेक्षा आहे.
- तर या टर्मिनलची क्षमता वर्षाला 200 जहाजे आणि दहा लाख प्रवसी हाताळण्याची क्षमता आहे.
- तसेच या प्रकल्पाचा एकूण खर्च 495 कोटी रुपये असून, यापैकी 303 कोटी रुपये खर्च मुंबई पोर्ट ट्रस्टने वाहन केला आहे आणि उर्वरित खाजगी उद्योजकांनी.
- भारताचा बंदर विकास कार्यक्रम ‘सागरमाला’ प्रकल्पाला 7 वर्ष पूर्ण झाले, त्या प्रसंगी माध्यमांना संबोधित करताना मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी ही माहिती दिली.
- तर हे भारतातील अशा प्रकारचे पहिलेच आयकॉनीक सी क्रुझ टर्मिनल आहे, जे 4.15 लाख वर्ग फुट क्षेत्रावर बांधले गेले जाईल, येथे 22 लिफ्ट्स, 10 एस्क्लेटर्स आणि 300 चारचाकी वाहनांसाठी बहुमजली वाहनतळ असेल.
पंतप्रधान मोदी पुन्हा ठरले सर्वात शक्तिशाली भारतीय :
- इंडियन एक्सप्रेसकडून जाहीर करण्यात येणाऱ्या 2022 मधल्या 100 शक्तिशाली भारतीयांच्या यादीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत.
- जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येला करोना काळात नियमांचं पालन करण्यास भाग पाडण्यापासून, करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या विक्रमापर्यंत नरेंद्र मोदींनी देशातल्या राजकारणावर विविध मुद्द्यांच्या आधारे राज्य केलं आहे.
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 9 व्या तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या यादीत 16 व्या क्रमांकावर आहेत.
- पंतप्रधान मोदींच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तर चौथ्या क्रमांकावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आहेत.
- तर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवत मुख्यमंत्री झालेले योगी आदित्यनाथ सहाव्या क्रमांकावर असून उद्योगपती गौतम अदानी सातव्या क्रमांकावर आहेत.
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आठव्या क्रमांकावर आहेत, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवव्या आणि देशाच्या अर्थंमंत्री निर्मला सीतारामण दहाव्या क्रमांकावर आहेत.
विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धात मेक्सिको सलग आठव्यांदा पात्र :
- मेक्सिकोने बुधवारी रात्री झालेल्या अंतिम पात्रता फेरीतील सामन्यात एल सॅल्वॅडोरवर 2-0 असा विजय मिळवत सलग आठव्यांदा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
- ‘कॉनकॅकॅफ’कडून (उत्तर आणि मध्य अमेरिका आणि कॅरेबियन फुटबॉल संघटनांचा विभाग) कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका हे तीन संघ थेट पात्र ठरले आहेत.
- मेक्सिकोसाठी अॅझटेका स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत युरील अँटुनाने 16व्या मिनिटाला गोल केला आणि नंतर पहिले सत्र संपण्याच्या आधी रॉल जिमिनेझने पेनल्टी किकच्या मदतीने गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
- संघाच्या बचावफळीने अखेपर्यंत ही आघाडी कायम ठेवत विजय सुनिश्चित केला.
- यापूर्वी, रविवारी टोरंटो येथे कॅनडाने जमैकाला 4-0 असे नमवत 36 वर्षांनंतर पहिल्यांदाचा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
दिनविशेष:
- 1 एप्रिल हा दिवस ‘एप्रिल फूल दिन‘ म्हणून साजरा केला जातो.
- मुंबई अग्निशमन दलाची स्थापना 1887 मध्ये झाली.
- सन 1895 मध्ये भारतीय लष्कर स्थापन झाले.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक ‘केशव बळीराम हेडगेवार‘ यांचा जन्म 1 एप्रिल 1889 मध्ये झाला.
- भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना सन 1935 मध्ये झाली
- सन 1957 मध्ये भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 यावर्षी (मरणोत्तर) भारतरत्न प्रदान करण्यात आला.
- सन 2004 मध्ये गूगलने जीमेल (Gmail) ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.