1 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 फेब्रुवारी 2019)
पाणबुडया संबंधी प्रकल्पाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी:
- संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी परिषदेने 31 जानेवारी रोजी सहा पाणबुडया बांधण्याच्या 40 हजार कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली.
- लष्करासाठी पाचहजार मिलान 2 टी रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या प्रकल्पालाही मंत्रालयाने मंजुरी दिली. संरक्षण मंत्रालयाच्या महत्वकांक्षी रणनितीक भागीदारी मॉडेल अंतर्गत हा दुसरा प्रकल्प आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया धोरणाला चालना देण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्वाचे आहेत.
- संरक्षण खरेदी परिषद ही संरक्षण साहित्य विकत घेण्यासंबंधी निर्णय घेणारी संरक्षण मंत्रालयाची सर्वोच्च समिती आहे. रणनितीक भागीदारी मॉडेल अंतर्गत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- या कार्यक्रमातंर्गत देशातील खासगी कंपन्यांना परदेशी संरक्षण साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत मिळून काम करता येणार आहे.
- हिंद महासागरात चिनी नौदलाच्या वाढलेल्या हालचाली भारतासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारवर सागरी संरक्षण सिद्धतेवर भर देण्यासाठी दबाव वाढला आहे.
- प्रकल्प 75(I) अंतर्गत भारतीय नौदलाची सहा डिझेल इलेक्ट्रीक पाणबुडयांची निर्मिती करण्याची योजना आहे. ब्राह्मोस या अत्याधुनिक क्षेपणास्त्रासह टॉरपीडो आणि शत्रूच्या रडारला चकवा देणाऱ्या स्टेल्थ तंत्रज्ञानाने या पाणबुडया सज्ज असतील.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची नवी घोषणा:
- भारतीय जनता पक्षाने 2019 लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. ‘अबकी बार मोदी सरकार‘ घोषणा देत सत्तेवर आलेल्या भाजपाने यावेळी ‘अबकी बार 400 के पार‘ ही नवी घोषणा तयार केली आहे.
- भाजपाने यावेळी 400 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत एनडीएने 336 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये एकट्या भाजपाने 282 जागांवर विजय मिळवला होता.
- भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी 400 जागांचे टार्गेट ठेवले आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपाने नरेंद्र मोदींना एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करत ‘अबकी बार मोदी सरकार’ अशी घोषणा दिली होती.
- ‘ज्याप्रकारे मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत काम केले आहे ते पाहता जनतेला पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी पहायचे आहे. 1984 नंतर पहिल्यांदाच पूर्ण बहुमताने सरकार स्थापन झाले होते.
- भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतरच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपा 400 चा आकडा सहज पार करेल’, असा विश्वास भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
ट्रायचा निर्णय आजपासून लागू:
- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाची (ट्राय) नवीन नियमावली शुक्रवारपासून (1 फेब्रुवारी) लागू होत आहे. मात्र सशुल्क वाहिन्यांबाबत अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे. देशातील तब्बल 70 टक्के ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्यांची यादी भरून दिली असल्याचा दावा ट्रायचे अध्यक्ष आर.एस. शर्मा यांनी केला आहे.
- शर्मा म्हणाले, ज्या ग्राहकांनी अर्ज भरलेला नाही ते ग्राहक लवकरच अर्ज भरतील, असा विश्वास आहे. तसेच तोपर्यंत टीव्हीचे प्रसारण बंद होणार नाही याची खात्रीही ट्रायने दिली आहे. मात्र, लवकर अर्ज भरून घेण्याची सूचना त्यांनी केली आहे.
- ज्या ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्यांसाठी अर्ज भरलेले नसतील त्यांना नि:शुल्क वाहिन्या पाहता येतील. मात्र, अर्ज भरेपर्यंत ग्राहकांना सशुल्क वाहिन्या दाखवायच्या की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार बहुविध सेवा पुरवठादारांवर (एमएसओ) सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- मात्र त्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे काही ठिकाणी सशुल्क वाहिन्यांचे प्रसारण बंद होण्याची तर काही ठिकाणी सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सशुल्क वाहिन्यांबाबतचा संभ्रम कायम आहे.
‘पबजी’ गेमवर बंदीसाठी मुलाची कोर्टात धाव:
- लहान मुलांमध्ये सध्या वेड असलेल्या प्रसिद्ध ‘पबजी’ या मोबाइल गेमवर बंदी घालण्यात यावी, यासाठी एका 11 वर्षीय मुलाने 31 जानेवारी रोजी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या गेममुळे हिंसेला आणि आक्रमकतेला चालना देण्यात येत आहे, असे आहद निझाम याने याचिकेत म्हटले आहे.
- आहद याने त्याच्या आईद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारला या गेमवर बंदी घालण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेद्वारे केली आहे.
- तसेच अशा हिंसक गेम्सवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारला आढावा समिती नेमण्याचे निर्देश द्यावेत, अशीही विनंती केली आहे.
- प्लेयर्स अननोन बॅटल ग्राउंड (पबजी) हा आॅनलाइन गेम असून एका वेळी अनेक जण तो खेळू शकतात. एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अशा गेम्सबाबत चिंता व्यक्त केली होती. मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. एन.एम. जामदार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शहिदांच्या कुटुंबीयांना मिळणार दुप्पट अनुदान:
- भारतीय सैन्य दलातील शहिदांच्या कुटुंबीयांचे अनुदान 25 लाखांवरून 50 लाख करतानाच महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील शौर्य तसेच सेवापदक विजेत्यांच्या अनुदानात दुपटीने वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
- ‘वन फार आॅल अॅण्ड आॅल फार वन’ उपक्रमांतर्गत आयोजित ‘अ ट्रिब्युट टू इंडियन आर्मी अॅण्ड सॅल्यूट टू सोल्जर्स’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
- मुख्यमंत्री म्हणाले की, शौर्य गाजविणाऱ्या आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणार्या शहिदांच्या कुटुंबियांच्याप्रती कृतज्ञ राहणे आपले कर्तव्यच आहे. त्यासाठी शहिदांच्या कुटुंबीयांच्या अनुदानात दुपटीने वाढ करतानाच त्याच जिल्ह्यात शेतीसाठी दोन हेक्टर जमीन देण्यासाठी जिल्हाधिकार्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
- तसेच याशिवाय शौर्यपदक आणि सेवा पदक विजेत्यांसाठी एकरकमी पुरस्कारांच्या रोख अनुदानात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मरणोत्तर शौर्य आणि सेवापदक धारण करणार्यांच्या कुटुंबीयांच्या मासिक अनुदानातही दुपटीने वाढ करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दिनविशेष:
- 1 फेब्रुवारी हा दिवस 2013 या वर्षीपासून ‘जागतिक बुरखा/हिजाब दिन’ म्हणून पाळला जातो.
- सन 1884 मध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
- सुधी रंजन दास यांनी सन 1956 मध्ये भारताचे 5वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- 1 फेब्रुवारी सन 2003 रोजी अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्युमुखी पडले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा