1 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 मार्च 2019)

1 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 मार्च 2019)

दहशतवादाविरोधात रशिया भारतासोबत:

  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला आणि त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पुलवामा येथे हल्ला आणि शहीद जवानांबद्दल त्यांनी त्यांच्या संवेदनाही व्यक्त केल्या.
  • इतकेच नाही तर दहशतवादाविरोधात रशिया भारतासोबत आहे असे वचनही त्यांना दिले. पुलवामाचा हल्ला ही दुःखद घटना असल्याचे पुतिन यांनी म्हटले आहे.
  • दहशतवादाविरोधात भारत जी कारवाई करतो आहे त्याला रशियाने साथ दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांचे आभार मानले आहेत. दोन्ही नेत्यांनी फोनवरून केलेल्या चर्चेत दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
  • दरम्यान या वर्षाच्या शेवटी व्लादिवोस्तोक या ठिकाणी होणाऱ्या इस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सहभागी व्हावे असे निमंत्रणही पुतिन यांनी दिले.
  • पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. या घटनेचा तीव्र निषेध देशभरातून करण्यात आला. तसेच संयुक्त राष्ट्रसंघानेही या घटनेचा निषेध नोंदवला.

भारतीय वैमानिकाची आज सुटका होणार:

  • पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची 1 मार्च रोजी सुटका करण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे.
  • हे आमचे शांततेसाठीचे पहिले पाऊल आहे, असा कांगावा पाकिस्तान करीत असला तरी प्रत्यक्षात अमेरिका, सौदी अरेबियासह काही देशांनी आणलेल्या दबावामुळे पाकिस्तानला ही सुटका करणे भाग पडल्याचे स्पष्ट होत आहे. भारतानेही ही सुटका म्हणजे तडजोड नसून जोवर अतिरेक्यांवर ठोस कारवाई करीत नाही तोवर पाकिस्तानशी चर्चा नाही, असा ठाम पवित्रा घेतला आहे.
  • विशेष म्हणजे उभय देशांचा तणाव निवळावा यासाठी आपल्याला महत्त्वाची भूमिका बजावता आली, असे सूचक उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढल्याने भारत आणि पाकिस्तान प्रश्नात अमेरिकेने प्रथमच शिरकाव केला आहे.
  • सौदी अरेबियाच्या राजदूतांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच सौदीचे एक मंत्री तेथील राजपुत्रांचा खास संदेश घेऊन पाकिस्तानला रवाना झाले. या पाश्र्वभूमीवर मोदी यांनी संरक्षणविषयक उच्चस्तरीय समितीची बैठक घेतली.
  • शांततेच्या प्रयत्नांचा एक भाग आणि भारतासमवेत चर्चेचे पहिले पाऊल म्हणून अभिनंदन यांची सुटका करण्यात येणार आहे, असे इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत जाहीर केले. 1 मार्च रोजी वाघा सीमेवरून अभिनंदन मायदेशी परतणार असल्याची माहिती मिळाली आहे.

केंद्र सरकारव्दारे रेल्वेची नवी सेवा उपलब्ध:

  • विमान प्रवासाप्रमाणे आता भारतीय रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या आवडीनुसार सीट निवडता यावे यासाठी ‘ऑनलाइन चार्ट’ची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रवाशांना तिकीट आरक्षित करतानाच उपलब्ध असलेल्या आसनांबाबत अर्थात आरक्षणाच्या सद्यस्थितीची माहिती मिळेल.
  • रेल्वेच्या या नव्या सेवेद्वारे प्रवाशांना गाडीच्या डब्याची सचित्र माहिती (ग्राफिकल प्रेझेंटेशन) तसेच ‘बर्थ‘नुसार तपशील मिळणार आहे. यासाठी रेल्वेची वेबसाइट http://www.irctc.co.in वर CHARTS / VACANCY असा एक नवा पर्याय सुरू करण्यात आला आहे.
  • या नव्या सेवेव्दारे आरक्षित केलेल्या जागा आणि उपलब्ध असलेल्या जागा वेगवेगळ्या रंगांनी दाखविल्या जाणार आहेत. ‘मोबाइल इंटरनेटवरही ही यंत्रणा उपलब्ध असणार आहे, यामुळे रेल्वे तिकीट आरक्षणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल’, असे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल म्हणाले.
  • येत्या 20 दिवसांमध्ये ही सुविधा शताब्दी आणि राजधानी गाड्यांना उपलब्ध होणार आहे. उपलब्ध आसनांबाबत ऑनलाइन माहिती उपलब्ध असेल, त्यामुळे तिकीट तपासनीसला शोधण्याची गरज राहणार नाही. ही यंत्रणा सगळ्या गाड्यांबाबत उपलब्ध करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सवर्ण आरक्षण लागू होणार:

  • केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत जम्मू-काश्मीरबाबत दोन महत्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
  • त्यानुसार, जम्मू-काश्मीर आरक्षण (संशोधन) अध्यादेश 2019ला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या रहिवाशांनाही अनुसुचित जाती-जमाती, ओबीसींचे आरक्षण आता लागू होणार आहे.
  • यापूर्वी 2004 पासून आजवर हे आरक्षण केवळ नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या रहिवाशांनाच लागू होते. त्यानुसार, 1954 सालच्या राष्ट्रपतींच्या अध्यादेशात बदल करुन 370 कलम अंशतः शिथील करण्यात आले आहे.
  • तसेच काही महिन्यांपूर्वीच घटनादुरुस्तीद्वारे देशभरात लागू करण्यात आलेले आर्थिक मागासांचे 10 टक्के आरक्षणही जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
  • तर त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील सरकारी सेवेत असणाऱ्यांना आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुसुचित जाती-जमाती तसेच ओबीसी या आरक्षणासह आर्थिक मागासांच्या 10 टक्के आरक्षणाचा फायदा घेता येणार आहे.

करीना कपूर लसीकरण मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर:

  • अभिनेत्री करीना कपूरने एक सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. लसीकरणाच्या मोहिमेची ती ब्रँड अॅम्बेसिडर झाली आहे. या माध्यमातून ती लसीकरणाबाबत जनजागृती करणार आहे.
  • लसीकरणाच्या जनजागृतीसाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. करीना कपूर याच मोहिमेचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.
  • सीरमतर्फे चालवण्यात येणाऱ्या मोहिमेचा कालावधी वर्षभराचा आहे. समाजातील वंचित गटांमध्ये लसीकरणाचे महत्त्व आणि त्यांची गरज पोहचावी यासाठी करीना कपूर जनजागृती करताना दिसणार आहे.
  • गेल्या काही वर्षांचा विचार केला तर पोलिओ आणि देवी यांसारख्या रोगांचे उच्चाटन हे लसीकरणामुळेच शक्य झाले आहे. असे असले तरीही इतर काही आजारांमुळेही गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडतात.
  • गोवर, घटसर्प यांसारख्या आजारांमुळे मुलं किंवा गर्भवती स्त्रियांचा मृत्यू होतो. यामुळेच सीरम इन्स्टिट्युटने यासंदर्भातला पुढाकार घेतला आहे.

दिनविशेष:

  • एक मार्च हा दिवस ‘जागतिक नागरी संरक्षण दिन‘ आहे.
  • यलो स्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना सन 1872 मध्ये झाली होती.
  • सन 1907 मध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे 1 मार्च 1922 रोजी जन्म झाला.
  • आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास 1947 या वर्षी पासून सुरूवात झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 मार्च 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.