10 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 डिसेंबर 2018)
चार आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले देशातील एकमेव राज्य ‘केरळ’:
- केरळमधील कुन्नूर येथे नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 9 डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले.
- केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले.
- याबरोबरच 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले केरळ हे भारतातील पहिलेच राज्य ठरले आहे.
- कुन्नूर येथे सुमारे 2000 एकर परिसरात हे विमानतळ उभारले असून यासाठी 1800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
- केरळमध्ये कुन्नूर विमानतळाशिवाय तिरुवनंतपुरम, कोच्ची आणि कोझिकोड हे आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या कार्यरत आहेत.
महाराष्ट्राने मिळवले खेलो इंडिया युवा स्पर्धेचे यजमानपद:
- ‘खेलो इंडिया शालेय स्पर्धा‘ या उपक्रमानंतर आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘खेलो इंडिया युवा स्पर्धा‘ आयोजित करण्याचे ठरविले असून या स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राला बहाल करण्यात आले आहे. महाराष्ट्राने या स्पधेर्साठी बोली लगावत बाजी मारली.
- केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी महाराष्ट्राचे शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची घोषणा केली. स्पर्धेचे यजमानपद पुणे शहरास बहाल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
- तसेच ही स्पर्धा पुढील वर्षी 9 ते 20 जानेवारी दरम्यान होईल. ज्यामध्ये देशातील 9 हजार खेळाडूंची नोंदणी केली जाईल. यासंदर्भात, राठोड म्हणाले की, ‘खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेचे यश पाहता आम्ही युवा खेळाडूंसाठी स्पर्धांची योजना आखली होती. त्यासाठी तीन राज्यांनी बोली लावली होती आणि महाराष्ट्राने बाजी मारली. या शर्यतीत आसाम व झारखंड हेही होते. देशात आंतरराष्ट्रीय स्तराचे वातावरण निर्माण व्हावे. युवा खेळाडूंच्या प्रतिभेचा शोघ घेता यावा, यासाठी पंतप्रधानांनी आमच्यापुढे विचार ठेवला होता. खेलो इंडियाला आता शालेय स्तरावरून युवा स्पर्धापर्यंत पोहचण्यापर्यंत आम्ही आलो आहोत.
निश्चितपणे ही वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे.’
करण सिंगला सलग दुसरे विजेतेपद:
- भारतीय सैन्यदलाच्या करण सिंगने आपला दबदबा कायम राखत यंदादेखील वसई-विरार महापौर मॅरेथॉन शर्यतीत सलग दुसऱ्या वर्षी बाजी मारली, तर प्राजक्ता गोडबोले आणि शंकर थापा यांनी अर्धमॅरेथॉन शर्यत जिंकण्याची किमया साधली.
- सकाळच्या गुलाबी थंडीत प्रारंभ झालेल्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी निर्धारित वेळेत प्रारंभ झाल्यानंतर प्रमुख धावपटूंनी आघाडी घेण्यास प्रारंभ केला. त्यात सैन्यदलाच्या करणने प्रारंभापासून पहिल्या पाचांमध्ये राहण्याचे धोरण ठेवले.
- दोन-तृतीयांश अंतर पार केल्यानंतर त्याने एकेका धावपटूला मागे टाकत अव्वल स्थानावर मुसंडी मारली. मात्र अखेरच्या टप्प्यापर्यंत अन्य धावपटूंनीदेखील करणला तोडीसतोड धाव घेत त्याला चांगली लढत दिली. मात्र करणने त्याची अल्पशी आघाडी अखेपर्यंत कायम राखत 42 किलोमीटरचे अंतर 2 तास 22 मिनिटे 42 सेकंद या वेळेत पूर्ण केले.
- तसेच व्दितीय क्रमांकावर आलेल्या लालजी यादवने 2 तास 22 मिनिटे 58 सेकंद तर तृतीय क्रमांकावरील शामरू जाधवने 2 तास 23 मिनिटे 8 सेकंद वेळ नोंदवली. करणने अनुभवाच्या बळावर पुन्हा एकदा पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेवर छाप पाडली.
मिस वर्ल्ड 2018 विषयी थोडक्यात माहिती:
- जगात सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस वर्ल्ड 2018‘ चा मुकुट मेक्सिकोच्या व्हेनेसा पोन्स डी लिऑन हिने पटकावला.
- चीनच्या सान्या शहरात 68 वी ‘मिस वर्ल्ड 2018’ स्पर्धा आयोजित केली गेली. गतवर्षी भारताची सौंदर्यवती मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारली होती.
- तसेच यंदा मानुषीनेच व्हेनेसाला मिस वर्ल्डचा मुकुट घातला. या स्पर्धेत विविध देशांतील 118 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
- ‘मिस वर्ल्ड 2018‘ या स्पर्धेत सहभागी झालेली भारताची अनुकृती वास ही टॉप 30 पर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली. तर थायलंडची निकोलेन पिशापा उपविजेती ठरली.
- यंदाची मिस वर्ल्ड ‘व्हेनेसा‘ हिचा जन्म 7 मार्च 1992 रोजी झाला असून ती मेक्सिकन मॉडेल आहे. ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकणारी ती पहिलीच मेक्सिकन तरुणी आहे.
सोलापूरच्या भुईकोटात नवीन शिलालेख सापडला:
- सोलापुरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात नवीन शिलालेख इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीस पडला. फारसी लिपीतील आठ ओळींचा हा शिलालेख आदिलशाही राजवटीतील असण्याची दाट शक्यता इतिहास अभ्यासकांनी वर्तविली आहे. या शिलालेखाचे वाचन झालेले नाही. हे वाचन झाल्यानंतर इतिहासात नवीन प्रकाश पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
- आदिलशाहीकालीन भुईकोट किल्ल्यात अभ्यासक नितीन अणवेकर हे सर्वेक्षण करताना किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाहेरील तटाच्या खालच्या बाजूला जमिनीपासून एक फूट अंतरावर हा शिलालेख त्यांच्या दृष्टीस पडला. या शिलालेखाची उंची तीन फूट आणि रुंदी एक फूट असून या शिलालेखावर फारसी लिपीत मजकूर कोरला आहे.
- आठ ओळींचा हा शिलालेख किल्ल्यालगत सिद्धेश्वर कुस्ती आखाडय़ासमोर नव्यानेच आढळून आला आहे. या भुईकोट किल्ल्यात आतापर्यंत बारा शिलालेख सापडले आहेत. यात पाच शिलालेख फारसी लिपीतील तर चार देवनागरी लिपीतील आहेत.
- तसेच तळे कन्नड, मोडी आणि देवनागरी लिपीतील प्रत्येकी एक शिलालेखाचा समावेश आहे. फारसी लिपीतील नव्याने आढळून आलेला हा सहावा शिलालेख आहे.
दिनविशेष:
- 10 डिसेंबर हा दिवस ‘मानवी हक्क दिन’ म्हणून पाळला जातो.
- सन 1901 मध्ये नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
- संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग सन 1916 मध्ये झाला.
- सन 1998 मध्ये अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ ‘प्रा. अमर्त्य सेन‘ यांना प्रदान झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा