ब्रेनार्ड अरनॉल्ट 10 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (10 डिसेंबर 2022)
‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा :
गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदा भाजपाने 150 पेक्षा जास्त जागांसह विक्रमी विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे ही निवडणूक आम आदमी पार्टीसाठी विशेष ठरली आहे. कारण या निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारे आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. या संदर्भात बोलताना आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरद्वारे गुजरातमधील जनतेचे आभार मानले आहेत. ‘या’ व्यक्तीने पहिल्या स्थानावर घेतली उडी :
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मागील बऱ्याच काळापासून पहिल्या क्रमांकावर असलेल्या एलॉन मस्क यांनी हे स्थान गमावलं आहे. ट्विटरचे नवे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या एलॉन मस्क यांना लुईस व्हुइटनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रेनार्ड अरनॉल्ट यांनी मागे टाकलं आहे. फोर्ब्समधील यादीनुसार लुईस यांची संपत्ती 185.8 बिलियन डॉलर्स इतकी आहे. मस्क यांच्या संपत्तीपेक्षा ही संपत्ती 400 मिलियन डॉलर्सने अधिक आहे. ‘या’ भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय सामन्यात लगावलेत सर्वाधिक षटकार :
सूर्या या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 74 षटकार ठोकले. या वर्षी आतापर्यंत इंग्लंडचा जोस बटलर आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने मारलेल्या षटकारांपेक्षा हे जास्त आहेत. 2022 मध्ये, बटलरने 39 षटकार मारले आहेत. तसेच मिलरने 31 षटकार मारले आहेत. सूर्यकुमारने यावर्षी एकूण 44 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये त्याने 40.68 च्या सरासरीने आणि 157.87 च्या स्ट्राईक रेटने 1424 धावा केल्या. निकोलस पूरन या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर यूएईचा मोहम्मद वसीम 58 षटकारांसह तिसऱ्या , झिम्बाब्वेचा सिकंदर रझा 55 षटकारांसह चौथ्या आणि रोहित शर्मा 45 षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर वनडेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास :
पाकिस्तान आणि इंग्लंड संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड क्रिकेट संघाने शुक्रवारी, पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरताच इतिहास रचला आहे. 2000 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा इंग्लंड हा जागतिक क्रिकेटमधील पहिला संघ ठरला आहे. इंग्लंडनंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. त्याचबरोबर भारत 1775 सामन्यांसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तसेच पाकिस्तान 1608 सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे. दिनविशेष:
10 डिसेंबर हा दिवस ‘मानवी हक्क दिन’ म्हणून पाळला जातो. सन 1901 मध्ये नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले. संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग सन 1916 मध्ये झाला. सन 1998 मध्ये अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ ‘प्रा. अमर्त्य सेन‘ यांना प्रदान झाला.