10 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
10 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 नोव्हेंबर 2020)
बायडेन यांचा पहिला निर्णय Covid Task Force स्थापन :
- अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन व उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी सोमवारी अमेरिकेतील करोना संदर्भातील टास्क फोर्सची निर्मिती केली.
- तर विशेष म्हणजे या टास्क फोर्सचे नेतृत्व करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तीन सह अध्यक्षांमध्ये एका भारतीय वंशाच्या समावेश आहे.
- करोना टास्क फोर्सचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तीन सह अध्यक्षांवर असणार आहे. ज्यामध्ये डॉक्टर विवेक मूर्ती यांच्यासह येल विद्यापीठातील औषधी विभागाचे सहयोगी प्राध्यापक मार्सेला नुनेझ-स्मिथ व अन्न व औषध प्रशासन विभागचे माजी आयुक्त डेव्हिड केसलर यांचा समावेश आहे.
- तसेच करोना टास्क फोर्समधील 13 सदस्यांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली आहे. यामध्ये प्रख्यात आरोग्य तज्ज्ञांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):
‘फायझर’ची करोना लस 90 टक्के परिणामकारक :
- जगभर आतापर्यंत सुमारे 10 लाख लोकांचा बळी घेणाऱ्या करोना विषाणूच्या प्रतिबंधाबाबत दिलासादायक माहिती फायझर कंपनीने सोमवारी दिली. कंपनीने तयार केलेली लस 90 टक्के परिणामकारक ठरू शकते, असे कंपनीने सांगितले.
- तसेच फायझर आणि तिची जर्मन सहयोगी कंपनी बायोएनटेक यांनी ही लस संयुक्तपणे तयार केली आहे. ती 90 टक्के परिणामकारक ठरू शकेल, असे प्राथमिक निष्कर्ष असल्याचे फायझर कंपनीने सांगितले.
- तर लशीचा उपयोग 16 ते 85 वयोगटातील लोकांवर तातडीने करण्यासाठी या महिनाअखेरीस अमेरिकेच्या नियंत्रकांकडे अर्ज करण्याचे संकेतही कंपनीने दिले आहेत.
केंद्रीय कार्यालयांत मराठी भाषा आता सक्तीची :
- केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांत इंग्रजी व हिंदीबरोबरच स्थानिक भाषा म्हणजेच मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक केले आहे.
- तर ते न करणारे कार्यालय जिल्ह्यात आढळल्यास त्याच्या प्रमुखास निमंत्रक करून त्यास पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मराठीचा वापर करण्यास प्राधान्य देण्याचे लक्षात आणून देणे आवश्यक आहे.
- तसेच यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी भाषा संचालनालयास अहवाल देण्याचे आदेश राज्य शासनाने 6 नोव्हेंबर रोजी जारी केले आहेत.
- राज्यातील केंद्र शासनाच्या राजभाषा विभागाने हिंदी व इंग्रजीबरोबर प्रादेशिक मराठी भाषेचा वापर प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- यानुसार, राज्यासह जिल्ह्यातील केंद्रीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, विमा कंपन्या, रेल्वे तसेच अन्य केंद्रीय आस्थापनांच्या कार्यालयांत मराठी भाषेचा वापर करण्यात येतो यावर लक्ष केंद्रित करून अहवाल तयार करण्याच्या कामासाठी जिल्हा व तालुका स्तरावर गट-ब च्या दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांमधून एका समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक आदेशही आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत.
इस्कॉनला मिळाला ग्रीन चॅम्पियन पुरस्कार :
- ग्रीन बिल्डिंग काँग्रेसच्या नुकत्याच आयोजित झालेल्या अठराव्या आवृत्तीत इस्कॉनला यंदाचा ग्रीन चॅम्पियनशिप पुरस्कार जाहीर झाला आहे.
- जनतेला निसर्गाविषयी संवेदनशील बनविण्यासाठी सतत अग्रणी राहिल्याने इस्कॉन या संस्थेला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- तर इस्कॉन गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरंगा दास यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
- तसेच यावेळी ते म्हणाले की येत्या काळात इस्कॉनच्या वतीने भक्तिवेदांत संशोधन केंद्राच्या विद्यापीठाची रचना व बांधकाम ग्रीन कॅम्पस या संकल्पनेवर आधारित करण्यात येणार आहे. इस्कॉनची जगभरातील 700 मंदिरं उपासनेची ग्रीन केंद्रे म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी इस्कॉनची आंतरराष्ट्रीय ग्रीन कमिटी आयजीबीसीबरोबर कार्यरत आहे.
दिनविशेष :
- 10 नोव्हेंबर – जागतिक विज्ञान दिन
- 10 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.
- ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून 10 नोव्हेंबर 1698 मध्ये विकत घेतले.
- 10 नोव्हेंबर 1990 मध्ये भारताचे 8 वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1848 मध्ये झाला.