11 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2018)
देशातील पहिले स्वॅट महिला कमांडो पथक:
- पुरुषांच्या बरोबरीने आता महिला कमांडो दिल्लीच्या संरक्षणाची जबाबदारी संभाळणार आहेत. दिल्लीच्या सुरक्षेसाठी स्वॅट महिला कमांडो पथक तयार करण्यात आले आहे. स्वॅट महिला कमांडो पथक असलेले दिल्ली हे देशातील पहिले पोलीस दल ठरणार आहे.
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत स्वॅट महिला कमांडोंचा दिल्ली पोलीस दलात अधिकृत समावेश करण्यात येईल. ईशान्य भारतातील 36 महिलांचा या कमांडो युनिटमध्ये समावेश करण्यात आला आहे.
- भारतीय आणि परदेशी तज्ञांच्या देखरेखीखाली या 36 महिलांना अत्यंत कठोर, खडतर प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुरुषांप्रमाणे महिलांचे अशा पद्धतीचे विशेष कमांडो युनिट उभारण्याची मूळ कल्पना दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांची आहे. दिल्लीतील दहशतवादी करावाया रोखण्याची मुख्य जबाबदारी या पथकावर असेल. पुरुषांच्या तुलनेत या महिला सरस असल्याचे त्यांच्या प्रशिक्षणकर्त्यांनी सांगितल्याचे पटनायक म्हणाले.
- अनेक प्रगत पाश्चिमात्य देशांनी अजून महिलांचे स्वॅट कमांडो पथक उभारलेले नाही. त्यामुळे ही मोठी बाब आहे. या 36 महिला कमांडोंमध्ये आसाममधील 13, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मणिपूरमधल्या प्रत्येकी पाच महिलांचा समावेश आहे. भारताप्रमाणेच इस्त्रायलमध्येही या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. विनाशस्त्र कसे लढायचे ते सुद्धा या महिलांना शिकवण्यात आले आहे.
यंदाच्या पावसाळी अधिवेशनात सर्वाधिक काम:
- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची 10 ऑगस्ट रोजी सांगता झाली. हे अधिवेशन गेल्या 18 वर्षांतील सर्वाधिक यशस्वी अधिवेशन ठरले आहे. फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या आर्थिक अधिवेशनामध्ये सरकारला फारसे काम करता आले नव्हते. पण या अधिवेशनाने मात्र कामकाजाचे सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत.
- यंदाचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैला सुरू झाले तर 10 ऑगस्टला संपले. तब्बल 14 वर्षांनंतर या अधिवेशनात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला.
- या अधिवेशनात तेलुगू देशम पक्षाच्या (टीडीपी) खासदारांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून निदर्शनंही केली तर एनआरसीच्या मुद्द्यावरून संसदेत खडाजंगीही झाली.
- पण या सगळ्या गदारोळाचा संसदीय कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही. म्हणूनच हे अधिवेशन गेल्या 18 वर्षातले सर्वाधिक यशस्वी अधिवेशन ठरले. पण तरीसुद्धा तिहेरी तलाक विरोधी विधेयकासारखे महत्त्वाचे विधेयक या अधिवेशनात पास होऊ शकले नाही.
- तसेच या अधिवेशनात झालेल्या कामाबद्दल लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आनंद व्यक्त केला आहे. संसदेचे पुढचे अधिवेशनही यशस्वी होईल अशी त्यांना अपेक्षा आहे.
- संसदेत 20 विधेयकं मांडली गेली, त्यातून 18 पास झाली.
- लोकसभेत नियोजित कामकाजापेक्षा 10 टक्के जास्त काम झाले तर राज्यसभेत 66 टक्के जास्त काम झाले.
- राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा बहाल करण्यात आला.
- लोकसभेत 50 टक्के तर राज्यसभेत 48 टक्के वेळ कायदे निर्मिती झाली.
- आर्थिक अधवेशनाच्या तुलनेत तिप्पट काम झाले.
- 26 टक्के विधेयके संसदीय समितीकडे पाठवली गेली.
- 999 पर्सनल बिल संसदेत सादर करण्यात आले.
नीरज चोप्रा करणार भारतीय संघाचे प्रतिनिधित्व:
- गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील यशानंतर सर्व भारतीय खेळाडूंना वेध लागले आहेत ते आशियाई खेळांचे. या वर्षीच्या आशियाई स्पर्धेमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
- 18व्या आशियाई स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक म्हणून दिसणार आहे. भारतीय ऑलम्पिक संघाचे (आईओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी ही घोषणा केली. आशियाई स्पर्धा 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबांग येथे होणार आहे.
- नीरज चोप्राने 2016 मध्ये आईएएफ विश्व अंडर 20 चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. 2014च्या आशियाई स्पर्धेत भारताचे माजी हॉकी कर्णधार सरदार सिंह ध्वजवाहक होते.
- कोरियाच्या इंचियोनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 11 सुवर्ण, 10 रौप्य आणि 36 कांस्य पदकासह एकूण 57 पदकांची कमाई केली होती. तर भारताने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये एकूण 101 पदकांची कमाई केली होती. तर 2002 मध्ये मँचेस्टर येथील स्पर्धेमध्ये 69 पदके मिळवली होती.
मिहानमध्ये होणार संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्प:
- नागपूर येथील मिहानमध्ये उभ्या राहणाऱ्या संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी 20 एकर जागा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे घेतला. या संरक्षण साहित्य उत्पादन क्लस्टरच्या माध्यमातून सुमारे 50 हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
- सहय़ाद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रियल हब कंपनीला मिहान येथील सेक्टर 10 मधील सुमारे 20 एकर भूखंड संरक्षण साहित्याच्या निर्मितीसाठी देण्याबाबतचा प्रस्ताव या बैठकीत मंजूर करण्यात आला.
- सामाजिक जाणिवेच्या भावनेतून या ठिकाणी विविध संरक्षण साहित्य निर्मिती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे शिर्डी विमानतळ येथे नाइट लँडिंगची सुविधा तातडीने सुरू होईल यादृष्टीने कामास गती देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
- तसेच राज्यात मोठय़ा प्रमाणावर विविध ठिकाणी विमानतळांची कामे सुरू आहेत हे लक्षात घेता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या नगर नियोजन विभागाचे बळकटीकरण करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. यासाठी विविध आवश्यक ती पदे तातडीने भरण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.
दिनविशेष:
- सन 1943 मध्ये सी.डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
- दादरा व नगर हवेली हा भाग सन 1961 मध्ये भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.
- सन 1999 बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या ‘परिमार्जन नेगी‘ याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.
- डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे 11 ऑगस्ट 2013 मध्ये भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा