11 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 डिसेंबर 2018)
RBI चे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा:
- ‘आरबीआय‘ अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी हे पद सोडतो आहे असे उर्जित पटेल यांनी म्हटले आहे.
- केंद्र सरकार आणि आरबीआय वादाच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त समोर आले आहे. आरबीआयमध्ये गव्हर्नर पदावरा काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती असेही उर्जित पटेल यांनी म्हटले आहे. तसेच आपण आपल्या पदाचा त्वरित राजीनामा देत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
- आरबीआयच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करणे हा माझ्यासाठी गौरव होता. मी माझ्या सहकाऱ्यांचे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानतो त्यांनी मला खूप सहकार्य केले असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
- सन 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उर्जित पटेल यांची नियुक्ती केली होती. आता वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी पद सोडल्याचे जाहीर केले असले तरीही हा बीजेपी सरकारसाठी झटका मानला जातो आहे.
अग्नि 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी:
- भारताच्या अग्नि 5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी येथील डॉ. अब्दुल कलाम बेटांवर 10 डिसेंबर रोजी यशस्वीरीत्या घेण्यात आली. त्याचा पल्ला पाच हजार किलोमीटरचा आहे.
- स्वदेशी बनावटीच्या अग्नि 5 क्षेपणास्त्राची ही सातवी चाचणी असून ते जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.
अग्नि 5 हे तीन टप्प्यांचे क्षेपणास्त्र असून 17 मीटर उंच व 2 मीटर रुंद आहे. 1.5 टन अण्वस्त्रे वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. - संरक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, एकात्म चाचणी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाच्या तळावरून मोबाईल लाँचरच्या मदतीने हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले.
- सामरिक दल कमांड तसेच संरक्षण संशोधन व विकास संस्था यांनी ही चाचणी केली. यात रडार, देखरेख उपकरणे, देखरेख स्थानके यांचा सहभाग होता.
- उच्च वेगाचा संगणक व चुका विरहित आज्ञावली यांच्या मदतीने या क्षेपणास्त्राचे उड्डाण अचूकपणे झाल्याचे सांगण्यात आले.
- तसेच हे क्षेपणास्त्र अशा पद्धतीने सोडण्यात आले की, एका विशिष्ट मार्गावर पोहोचल्यानंतर ते पुन्हा पृथ्वीकडे वळून लक्ष्यावर आघात करू शकले. त्याचा मार्ग संगणकाने निश्चित केलेला होता.
ऐतिहासिक वास्तू ‘ताजमहाल’ दर्शन महागले:
- आग्र्याच्या ताजमहालचे सौंदर्य न्याहाळणं आता महाग झाले आहे. 10 डिसेंबर पासून येथे प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे.
- नव्या तिकीट दरांनुसार पर्यटकांना आता 50 रुपयांऐवजी 250 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर परदेशी पर्यटकांसाठी 1300 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय सार्क देशांमधून आलेल्या पर्यटकांना 540 रुपयांऐवजी 740 रुपये शुल्क आकारले जाईल.
- गर्दी आटोक्यात आणून ताजमहालच्या मुख्य ढाच्यावरील भार कमी करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 200 रुपयांचे हे शुल्क मुख्य कबरीच्या दर्शनासाठी आकारण्यात येणार आहे.
- एका वृत्तानुसार 2016 नंतर ताजमहालच्या तिकीट दरात झालेली ही आठवी दरवाढ आहे. यापूर्वी भारतीय पर्यटकांना 50 रुपये आणि विदेशी पर्यटकाला 1100 रुपये मोजावे लागत होते.
आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य सुरजीत भल्ला यांचा राजीनामा:
- पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य सुरजीत भल्ला यांनी 11 डिसेंबर रोजी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.
- भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. आता त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुरजीत यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
- ट्विटरच्या माध्यमातून सुरजीत यांनी राजीनाम्याची माहिती दिली.
दिनविशेष:
- सी.व्ही. रमण यांना सन 1930 मध्ये नोबेल पारितोषिक जाहीर झाला.
- भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी झाला.
- सन 1946 या वर्षी युनिसेफ (UNICEF) ची स्थापना झाली.
- भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म 11 डिसेंबर 1969 मध्ये झाला.
- 2001 या साली चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मध्ये प्रवेश झाला.
- सन 2006 मध्ये अंतराळवीर सुनिता विल्यम आय.एस.एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली होती.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा