11 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 डिसेंबर 2020)
शरद पवारांना मिळणार यूपीएच अध्यक्षपद :
महाराष्ट्रात महाविकास शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जातं. तर दुसरीकडे सध्या देशात सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपतींची भेट घेत नवे कृषी कायदे मागे घेण्याची रणनीती शरद पवार आणि सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांनी तयार केली आणि यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानीही भेट झाली.
दरम्यान, शरद पवार हे आता केंद्रात विरोधकांच्या नेतृत्वाच्या भूमिकेत येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. रिपब्लिक टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार लवकरच ते यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारू शकतात अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
तर या प्रकरणी सुरूवातीच्या टप्प्यातील चर्चा पूर्ण झाल्या असल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये आणि हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्वाकडे याबाबत विचारणा केली होती.
तर काही नेत्यांनी काँग्रेसची सूत्र पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याची मागणीही केली होती. परंतु राहुल गांधी यांनी यापूर्वी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे सोनिया गांधी यांच्याकडून यूपीएचं अध्यक्षपदही स्वीकारण्यास नकार दिल्याचं सूत्रांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना सांगितलं.
देशात सध्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. विरोधकांच्या एका शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती. त्यावेळी राहुल गांधीदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते. अशावेळीही त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व शरद पवार यांनी केलं होतं. 2004 पासून सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आता प्रशिक्षणाकडे वळला असून वेस्टब्रिज कॅ पिटलच्या सहकार्याने त्याने बुद्धिबळ अकादमीची स्थापना केली आहे. त्यामुळे पाच वेळचा जगज्जेता आनंद आता युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसणार आहे.
वेस्टब्रिज-आनंद बुद्धिबळ अकादमीतर्फे प्रशिक्षणासाठी देशातील पाच उभरत्या बुद्धिबळपटूंची निवड करण्यात आली आहे. त्यात 15 वर्षीय आर. प्रज्ञानंद, निहान सरिन, रौनक साधवानी, डी. गुके श आणि प्रज्ञानंदची बहीण आर. वैशाली यांचा समावेश आहे.
तसेच या उपक्रमांतर्गत प्रत्येक वर्षी गुणी खेळाडूंचा शोध घेतला जाणार असून त्यांना जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अव्वलस्थानी आणण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या आभासी पद्धतीने खेळाडूंना मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘‘युवा खेळाडूंसाठी आपल्या कच्च्या दुव्यांवर मेहनत घेण्याची हीच योग्य वेळ आहे. सध्या जगभरातील स्पर्धा लांबणीवर पडल्याने खेळाडूंनी आता प्रदीर्घ कारकीर्दीचा विचार करता आपल्या खेळात सुधारणा करावी,’’ असेही आनंदने सांगितले.
तर आनंदला या उपक्रमासाठी जर्मनीचा ग्रँडमास्टर आर्टर जुस्सूपो, पोलंडचा ग्रँडमास्टर ग्रेगोर्झ गजेवस्की आणि भारताचा ग्रँडमास्टर संदीपन चंदा हे प्रशिक्षणासाठी मदत करणार आहेत.
‘जिनोव्हा’च्या लसीला मानवी चाचण्यांसाठी मान्यता :
पुण्यातील जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सने विकसित केलेल्या ‘एचजीसीओ 19’ या कोरोना लसीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना भारतीय औषध महानियंत्रकांकडून मान्यता देण्यात आली आहे. ही देशातील पहिली एमआरएनए आधारीत लस आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिनोव्हाच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधत लसीच्या प्रगतीची माहिती घेतली होती. अमेरिकेतील एचडीटी बायोटेक कॉर्पोरेशनच्या सहकार्याने ही लस विकसीत करण्यात आली आहे.
तर केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाने या लसीच्या विकसनासाठी अर्थसहाय्य केले आहे. जिनोव्हा कडून काही दिवसांपुर्वीच चाचण्यांसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार तज्ज्ञ समितीने काही अटींच्या आधारे चाचण्यांना मान्यता दिली आहे.
पहिल्या टप्प्यातील चाचण्यांची अंतरिम माहिती समितीकडे सादर केल्याशिवाय चाचणीचा दुसरा टप्पा सुरू करता येणार नाही, असे समितीने म्हटले आहे. दरम्यान, पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटकडून ‘कोविशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे. त्यातच पुण्यातीलच ‘जिनोव्हा’च्या ‘एमआरएनए’ आधारीत लसीचीही लवकरच चाचणी सुरू होणार असल्याने संपुर्ण जगाचे लक्ष पुण्याने वेधले आहे.
12 डिसेंबरपासून पोस्ट ऑफिसचा नवा नियम :
जर तुमचे सुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर तुम्हाला आता हे नवीन नियम माहीत असणे आवश्यक आहे. 12 डिसेंबर 2020 पासून पोस्ट ऑफिसच्या नियमामध्ये बदल होणार आहेत.
तर नव्या नियमानुसार, 11 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना पोस्ट ऑफिस बचत खात्यात (Post Office Savings Account) किमान 500 रुपये शिल्लक (बॅलन्स) ठेवणे आवश्यक आहे.
12 डिसेंबरला ग्राहकांच्या खात्यात किमान बॅलन्स नसेल तर देखभाल शुल्क (Maintenance Charges) द्यावे लागणार आहे.
इंडिया पोस्टने(India Post)ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. इंडिया पोस्टने एका ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आता पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यात किमान बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे.
इंडिया पोस्टने माहिती देताना म्हटले आहे की, 11 डिसेंबर 2020 नंतर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर लागू होणारी देखभाल फी टाळण्यासाठी आपल्या खात्यात लवकरच किमान 500 रुपयांचा बॅलन्स निश्चित करा. अन्यथा आर्थिक वर्षाच्या अखेरीस देखभालच्या नावाखाली खात्यातून 100 रुपये वजा केले जातील.
इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटनुसार पोस्ट ऑफिस बचत खात्यावर वार्षिक व्याज दर 4 टक्के आहे. व्याज कमीतकमी बॅलन्स रकमेच्या आधारे महिन्याच्या 10 व्या आणि महिन्याच्या शेवटी कॅलक्युलेशन केले जाते. ग्राहक जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून त्यांच्या सोयीनुसार ते खाते उघडू शकतात.
दिनविशेष:
सी.व्ही. रमण यांना सन 1930 मध्ये नोबेल पारितोषिक जाहीर झाला.
भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी झाला.
सन 1946 या वर्षी युनिसेफ (UNICEF) ची स्थापना झाली.
भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म 11 डिसेंबर 1969 मध्ये झाला.
2001 या साली चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मध्ये प्रवेश झाला.
सन 2006 मध्ये अंतराळवीर सुनिता विल्यम आय.एस.एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली होती.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.