12 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (12 डिसेंबर 2018)
रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर ‘शक्तिकांता दास’:
- शक्तिकांता दास यांची रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून निवड करण्यात आली आहे. उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यांनतर सरकारने दास गव्हर्नर निवड केली आहे. मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची येत्या 14 डिसेंबर रोजी महत्त्वाची बैठक असल्याने नवीन गव्हर्नरची नियुक्ती करणे आवश्यक होते.
- दास यांनी 2015 ते 2017 या काळात केंद्रीय अर्थ सचिव म्हणून काम बघितले होते. ते भारताच्या वित्त आयोगाचे सदस्य देखील आहेत. शिवाय जी-20 शिखर परिषदेत सरकारचे प्रतिनिधी म्हणून देखील काम बघतात.
- पटेल यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र गेल्याकाही दिवसांपासून स्वायत्ततेच्या मुद्द्यावरुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारमध्ये तणाव निर्माण झाला होता. उर्जित पटेल हे गव्हर्नरपदाचा राजीनामा देणार याची चर्चा आधीपासूनच सुरु होती.
मुक्ता बर्वेला ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर:
- मराठी भाषेचा ‘उंबरठा’ ओलांडत सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 32व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा ‘स्वर्गीय स्मिता पाटिल स्मृती पुरस्कार 2018‘ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांच्या सशक्त अभिनयाने गाजलेल्या व 40 वर्ष पूर्ण केलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे.
- तसेच ‘स्वर्गीय स्मिता पाटिल कौतुक पुरस्कार 2018‘ हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई-3’ या चित्रपटाची अभिनेत्री मुक्ता बर्वेला प्रदान करण्यात येणार आहे.
- दिनांक 15 डिसेंबर 2018ला दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात ‘जैत रे जैत’ चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, चित्रपटाचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपटाची निर्माती उषा मंगेशकर आणि चित्रपटात काम केलेले अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये स्मिता पाटील यांच्या गाजलेल्या ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ चित्रपटांविषयी या सर्व मान्यवरांमध्ये परिसंवाद रंगणार आहे.
पेन्शन योजनेमधील सर्व रक्कम काढणे आता करमुक्त:
- राष्ट्रीय पेन्शन योजनेमधील (एनपीएस) निवृत्तीच्या वेळी काढण्यात येणारी सर्व रक्कम 100 टक्के करमुक्त करण्यात येत असल्याची घोषणा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.
- देशभरातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. एनपीएसमधील सरकारचे योगदान मूळ वेतनाच्या 10 टक्क्यांवरून 14 टक्के करण्यात येत असल्याचेही त्यांनी घोषित केले.
- तसेच सरकारचे 14 टक्के आणि कर्मचार्यांचे 10 टक्के असे 24 टक्के योगदान या योजनेत आता असेल.
- जानेवारी 2004 मध्ये सरकारी कर्मचार्यांसाठी एनपीएस योजना सुरू करण्यात आली होती. नंतर 2009 मध्ये खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही ही योजना
- खुली करण्यात आली.एनपीएसमधील निवृत्ती वेतनासाठी वापरली जाणारी 40 टक्के रक्कम सध्या करमुक्त असून, 60 टक्के रक्कम एनपीएसधारक निवृत्तीच्या वेळी काढू शकतो. त्यातील 40 टक्के रक्कम करमुक्त असून 20 टक्के रक्कम करपात्र आहे. नव्या निर्णयानुसार, ही सर्व 60 टक्के रक्कमही आता करमुक्त होईल.
- वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, नवे बदल कधीपासून अमलात आणायचे याची तारीख अद्याप ठरलेली नाही. ती लवकरच जाहीर केली जाईल. असे बदल सामान्यत: नव्या वित्त वर्षापासून अमलात आणले जातात. कारण त्यासाठी वित्त विधेयकात बदल करणे आवश्यक असते.
बोस्टवाना ऑलिम्पियाडमध्ये भारताला पाच सुवर्ण:
- बोस्टवाना येथे पार पडलेल्या 15व्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये भारताला 5 सुवर्ण तर 1 रौप्य पदक मिळाले आहे.
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात पार पडलेल्या या ऑलिम्पियाडमध्ये 44 देशांतील 250 विद्यार्थी सहभागी झाले होते.
- या स्पर्धेत जळगाव येथील अमेय देशमुख, दिल्लीतील धनंजय रमण, कोटा येथील मोहित गुप्ता, नमन सिंग राणा आणि इशापूर येथील वैभव राज यांनी सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर कोटा येथील बरून परुआ याने रौप्य पदकावर नाव कोरले.
- नागपूर येथील हिस्लोप कॉलेजचे प्राध्यापक हेमंत पांडे, भाभा अणुसंशोधन केंद्रातील डॉ.ए.के. राजाराजन आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातील निवृत्त प्रा.व्ही.गो. गंभीर या तिघांनी या टीमचे नेतृत्त्व केले.
- देशभरातील 1300 केंद्रांमध्ये पार पडलेल्या परीक्षांमध्ये 33 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यातून विविध स्तरावर चाळणी करून अंतिम सहा जणांच्या टीमची निवड करण्यात आली होती. या टीमला होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात विशेष प्रशिक्षण देण्यात आले यानंतर या टीमने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कामगिरी केली आहे.
शालांत परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कात वाढ:
- दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध सवलतींची मागणी होत असतानाच राज्य शिक्षण मंडळाने शालांत परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कात दोनशेपट वाढ केल्याने पालक धास्तावले आहेत.
- शालांत परीक्षेच्या तांत्रिक विषयासाठी वीस रुपये शुल्क आकारले जाते. आता हेच शुल्क 400 रुपये प्रती विद्यार्थी आकारण्याचे फर्मान मंडळाने काढले आहे.
- विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने विविध पक्षांनी विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क माफ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.
- शालांत परीक्षेला ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर बसतात. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमास पसंती दिली आहे. यांत्रिकी, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स असे विषय निवडले जातात. त्याचे प्रात्यक्षिक पूर्ण केल्याखेरीज मुख्य परीक्षेस बसता येत नाही.
- ऑक्टोबरपासून मंडळाने प्रात्यक्षिक व मुख्य परीक्षेचे शुल्क आकारणे सुरू केले होते. शाळा पातळीवर प्रथम ते गोळा झाले. मात्र, आठवड्यापूर्वी मंडळाने वाढीव शुल्काचे फर्मान काढल्याने पालकांना धक्का बसला आहे.
- वाढीव शुल्काच्या निर्देशापूर्वीच वीस रुपये गोळा करणाऱ्या शाळांना आता तब्बल चारशे रुपये पालकांकडून आकारावे लागणार आहेत. मुदतीपूर्वी प्रात्यक्षिक शुल्क जमा करणाऱ्या पालकांच्या प्रश्नांना आता शाळेला सामोरे जावे लागणार आहे.
दिनविशेष:
- सन 1882 मध्ये आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.
- गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचा जन्म 12 डिसेंबर 1892 मध्ये झाला होता.
- जी. मार्कोनी याला सन 1901 मध्ये प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
- 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
- राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 मध्ये झाला.
- प्रसिध्द अभिनेते शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 मध्ये झाला.
- प्रियांका चोप्रा यांना सन 2016 मध्ये युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले होते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा