12 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
12 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (12 मार्च 2020)
अमेरिका – तालिबान शांतता करारास सुरक्षा मंडळात मंजुरी :
- अमेरिका व तालिबान यांच्यात 29 फेब्रुवारी रोजी झालेल्या शांतता करारास संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने एकमताने मंजुरी दिली आहे.
- तर या कराराचे स्वागत करून मंजुरी देणारा ठराव करण्यात आला असून युद्धग्रस्त अफगाणिस्तानात शाश्वत शांतता नांदावी व अमेरिकी सैन्यास तेथून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती तयार व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने मंगळवारी या शांतता करारास मान्यता देणारा ठराव मंजूर केला, तो अमेरिकेने मांडला होता. अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रातील हंगामी उप स्थायी प्रतिनिधी चेरिथ नॉर्मन चॅलेट यांनी सांगितले, की अमेरिकेने तालिबानशी वर्षभर राजनैतिक वाटाघाटी केल्या असून आताचा शांतता करार हे त्याचेच फलित आहे.
- तसेच तालिबानने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध तोडावेत व अफगाणिस्तानात अमेरिकेच्या सैन्या विरोधात हल्ले करू नयेत असे करारात ठरले आहे. या करारानुसार तालिबानने अफगाण सरकारशी वाटाघाटी करणे अपेक्षित असून त्या लवकरच सुरू होणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):
विराट कोहली मोडणार सचिनचा सर्वात मोठा विक्रम :
- न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतील सपशेल अपयशाला मागे सारून धरमशाला येथे सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेद्वारे नवी सुरुवात करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
- पहिल्या सामन्यात सर्व क्रीडा प्रेमींचं कर्णधार विराट कोहलीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण ‘रन मशीन’ विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका मोठ्या विक्रमाजवळ पोहचला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली हा विक्रम मोडू शकतो.
- तसेच एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान 12 हजार धावा करण्यापासून विराट फक्त 133 धावा दूर आहे. 239 डावांत विराट कोहलीच्या नावावर 11,867 धावा आहेत.
- तर सध्या सर्वात वेगवान 12 हजार धावांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने 300 डावांत 12 हजार धावा केल्या आहेत.
- या मालिकेत 133 धावा काढताच सर्वात वेगवान 12 हजार धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होईल.
- ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने 314 डावांत तर श्रीलंकाचा माजी कर्णधारकुमार संगकाराने 336 डावांत 12 हजार धावा केल्या आहेत.
महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकात बाद फेरींच्या लढतींसाठी राखीव दिवस :
- ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला विश्वचषक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य सामन्यांसाठी राखीव दिवस न ठेवल्यामुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या प्रकरणातून बोध घेतला आहे.
- तर 2021मध्ये रंगणाऱ्या महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही उपांत्य लढती तसेच अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात येणार असल्याचे ‘आयसीसी’ने बुधवारी जाहीर केले.
- भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात गेल्या आठवडय़ातच झालेला पहिल्या उपांत्य सामना मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे भारताने साखळीतील सलग चार विजयांच्या बळावर उपांत्य फेरी गाठली. विशेष म्हणजे उपांत्य आणि अंतिम सामन्यांमध्ये दोन दिवसांचे अंतर असूनही राखीव दिवसाची तरतूद न केल्याने जगभरातील क्रीडाप्रेमींनी ‘आयसीसी’वर ताशेरे ओढले.
- न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या 2021च्या विश्वचषकातील सामन्यांची रूपरेषा ‘आयसीसी’ने जाहीर केली. 6 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी आतापर्यंत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या चार संघांनीच पात्रता मिळवली असून चार संघांचे स्थान निश्चित होणे बाकी आहे.
EPFOने ‘या’ नियमात केला बदल :
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(EPFO)ने 64 लाख पेन्शन धारकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. EPFOनं लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याच्या नियमात बदल केला आहे.
- तर पेन्शन मिळवण्यासाठी आता पेन्शन धारक आपल्या सोयीनुसार कधीही ऑनलाइन पद्धतीनं लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकणार आहेत.
- तसेच लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याच्या नियमात केलेल्या बदलांमुळे कर्मचारी पेन्शन योजना(EPS), 1995अंतर्गत 64 लाख पेन्शनर्सना फायदा मिळणार आहे.
- पेन्शन धारक आपल्या सुविधेनुसार वर्षभरातल्या कोणत्याही वेळेत ऑनलाइन पद्धतीनं जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा करू शकणार आहेत. जीवन प्रमाणपत्र जमा केलेल्या दिवसापासून ते वर्षभरापर्यंत वैध राहणार आहे, अशीही माहिती EPFOनं ट्विट करून दिली आहे.
- जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) हा पेन्शन धारक जिवंत असल्याचा पुरावा असतो. जर ते वेळेत जमा न केल्यास पेन्शन धारकाला पेन्शन मिळणंसुद्धा बंद होऊ शकतं. सद्यस्थितीत पेन्शन धारकांना वर्षातल्या नोव्हेंबर महिन्यात ज्या बँकेत पेन्शन येते, तिथे ते सर्टिफिकेट जमा करावं लागतं. नोव्हेंबरमध्ये संबंधित बँकेत जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा न केल्यास जानेवारीपासून त्याची पेन्शन बंद केली जाऊ शकते.
- परंतु आता EPFOनं नियमांत बदल केलेले असल्यामुळे वर्षभरात कोणत्याही वेळी आपल्याला लाइफ सर्टिफिकेट जमा करता येणार आहे. जमा केलेल्या तारखेपासून 12 महिन्यांसाठी ते मर्यादित राहणार आहे.
शिवाजी पार्क नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी :
- शिवाजी पार्क या नावाने प्रसिद्ध असलेल्या दादर पश्चिम येथील ऐतिहासिक मैदानाचे नामकरण करण्यात येणार आहे. यापुढे या मैदानाला शिवाजी पार्क बोलण्याऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ असे संबोधले जाणार आहे. याबाबतची मागणी महापालिका महासभेत एकमताने मंजूर करण्यात आली.
- तर आतापर्यंत शिवाजी पार्क या नावाने हे मैदान ओळखले जात होते. मात्र यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असल्याने हा प्रस्ताव पालिका सभागृहात बुधवारी पुन्हा चर्चेसाठी आणून छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे नामकरण करावे, अशी उपसूचना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मांडली. या उपसूचनेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. यामुळे या मैदानाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे करण्यास महासभेने एकमताने मंजुरी दिली.
- विविध खेळांबरोबरच राजकीय सभांसाठी प्रथम पसंती असलेले शिवाजी पार्क हे मैदान 1925 मध्ये पालिकेने जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते.
- तसेच या मैदानावर समुद्राच्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 1966 मध्ये उभारण्यात आला. या मैदानावर राज्य सरकारचे अनेक शासकीय कार्यक्रम होतात. अशा या मैदानाला शिवाजी पार्क असे नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या सभागृहात 10 मे 1927ला मंजूर करण्यात आला. त्यानंतर मैदानाला आतापर्यंत शिवाजी पार्क या नावाने संबोधले जात होते.
दिनविशेष:
- भारताचे संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी झाला होता.
- रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे सन 1918 मध्ये हलविण्यात आली.
- सन 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी 200 मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
- चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड नाटो (NATO) मध्ये 1999 यावर्षी सामील झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा