12 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
12 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (12 नोव्हेंबर 2018)
भारतीय सैनिकांचे फ्रान्समध्ये 57 ठिकाणी पुतळे:
- पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीच्या स्मृतिप्रीत्यर्थ फ्रान्समधील लॅव्हेन्टी या शहरात नव्याने उभारलेल्या पुतळ्याचे अनावरण 11 नोव्हेंबर रोजी, सैन्य दिनानिमित्त झाले. 1918 मध्ये पहिले महायुद्ध संपल्याच्या स्मरणार्थ हा दिन पाळला जातो.
- ब्रिटिश सैन्यातून लढताना हौतात्म्य आलेल्या भारतीय सैनिकांना फ्रान्समधील वेगवेगळ्या स्मशानभूमींमध्ये दफन केलेले आहे. या ठिकाणांजवळ अशी 57 स्मृतिस्थळे उभारण्याची योजना ‘इंटर फेथ शहिदी कोमेमोरेशन असोसिएशन‘ (आयएफएससी) या संस्थेने आखली आहे. त्यापैकी हा सात फुटी कांस्य पुतळा पहिलेच स्मारक आहे.
- तर लॅव्हेन्टी येथील दोन मृतावशेष हे 39व्या रॉयल गढवाल रायफल्सच्या जवानांचे असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांचे गेल्या वर्षी पुन्हा लष्करी इतमामात दफन करण्यात आले होते.
- फ्रान्सच्या भूमीत चिरनिद्रा घेत असलेल्या आपल्या भारतीय सैनिकांचे अशा सर्व 57 ठिकाणी पुतळे उभारण्याच्या प्रकल्पाला लॅव्हेन्टीतून प्रारंभ झाला आहे.
Must Read (नक्की वाचा):
रोहित शर्मा हा जगातील अव्वल फलंदाज:
- सध्याच्या घडीला जगामधील सर्वोत्तम फलंदाज कोण, असे प्रश्न विचारले जात आहेत. काही जणांना विराट कोहली, स्टीव्हन स्मिथ, केन विल्यम्सन किंवा जो रुट वाटत आहेत. पण वेस्ट इंडिजच्या एका महान फलंदाजाने मात्र रोहित शर्मा हा जगातील अव्वल फलंदाज आहे, असे म्हटले आहे.
- सध्याच्या घडीला रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात आहे. भारताकडून ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा रोहितच्या नावावर आहेत. त्याचबरोबर ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रमही रोहितच्याच नावावर आहे. एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्येही तीन व्दिशतके रोहितच्याच नावावर आहे.
- वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ब्रायन लारा म्हणाला की, “सध्याच्या घडीला क्रिकेट जगतामध्ये रोहित हा सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याची फलंदाजी पाहताना नेहमीच आनंद मिळतो. त्याच्या फलंदाजीतून अवीट आनंद मिळतो. त्यामुळे सध्याच्या घडीला तर क्रिकेट विश्वात रोहित हा सर्वोत्तम फलंदाज आहे.”
‘सेबी’ कंपन्यांव्दारे ठेवणार बाजारावर नजर:
- बेकायदेशीर मार्गांनी पैसा गोळा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सेबी (सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) आता विप्रो, एल अँड टी इंफोटेकसह इतर सात कंपन्यांची मदत घेणार आहे. सेबी विप्रो, एल अँड टी इंफोटेकसह इतर सात कंपन्यांच्या मदतीने बाजारावर नजर ठेवणार आहे.
- तर इतर कंपन्यांमध्ये एसेंचर सोल्युशन, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेज इंडिया, हेलवेट पेकार्ड एंटरप्रायजेस (इंडिया), ईआईटी सर्व्हिसेज इंडिया आणि तरावू टेक्नॉलाजीचा समावेश आहे.
- सेबीची या कंपन्यांच्या मदतीनं डेटा स्टोरेज क्लाऊड, ब्रोकर्सवर नजर ठेवून आकलन करणे, विश्लेषण क्षमतेचा विस्तार करण्याची इच्छा आहे. या कंपन्यांमुळे सेबीला डाटा मायनिंग (माहिती हुडकून काढणे), हेरगिरीची साधने विकसित करण्यासह सायबर हल्ले रोखण्यास मदत मिळणार आहे.
- तसेच नोंदणीकृत कंपन्यांच्या अधिग्रहण सौद्यात छोट्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे योग्य मूल्य मिळावे, यासाठी सेबीने या कंपन्यांची मदत घेण्याचे ठरविले आहे. तसेच नवीन प्रवर्तकांमार्फत छोट्या गुंतवणूकदारांना दिल्या जाणाऱ्या मूल्यांबाबत स्वतंत्रपणे आकलन केले जाणार आहे.
जागतिक न्यूमोनिया जनजागृती दिनविशेष:
- वर्ष 2016 मध्ये जगभरात झालेल्या पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू न्यूमोनिया आणि डायरियामुळे झाले होते. भारतात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.
- न्यूमोनिया व डायरियामुळे सर्वाधिक बालमृत्यू होणाऱ्या 15 देशांचा अभ्यास अहवालात नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. हे प्रमाण सर्वाधिक आढळणार्या देशांतील आरोग्यव्यवस्था असुरक्षित वर्गातील मुलांना उपचार पुरवण्यात असमर्थ असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
- 12 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक न्यूमोनिया जनजागृती दिनाच्या पार्श्वभूमीवर 10वा न्यूमोनिया अॅण्ड डायरिया प्रोग्रेस रिपोर्ट जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील इंटरनॅशनल व्हॅक्सिन अॅक्सेस सेंटरने नुकताच प्रसिद्ध केला. यात न्यूमोनिया व डायरिया आजारांनी सर्वाधिक बालमृत्यू होणाऱ्या 15 देशांतील न्युमोनिया आणि डायरिया प्रतिकारासंदर्भातील प्रगतीबाबत विवेचन करण्यात आले आहे.
- या आजारांमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपायांमध्ये स्तनपान, लसीकरण, वैद्यकीय सेवेची उपलब्धता, प्रतिजैवकांचा वापर, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस) व झिंक पूरके देणे हे उपाय प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
- लसीकरणाच्या व्याप्तीबाबत हे देश प्रगती करत असले, तरी लहान मुलांमधील आजारांवर उपचार करण्यात ते प्रचंड प्रमाणात कमी पडत आहेत, असे गेल्या दहा वर्षांपासून प्रसिद्ध होणाऱ्या अहवालात म्हटले आहे. विशेषत: दुर्गम भागात राहणार्या, गरीब आणि मागास समुदायांतील मुलांना होणारे आजार हाताळण्यात हे देश कमी पडत आहेत.
बंगालच्या उपसागरात ‘गज’ चक्रीवादळ:
- बंगालच्या उपसागरामध्ये सध्या गज या चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, पुढील दिवसांत त्याची तीव्रता वाढणार आहे. चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ढगाळ स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
- दोन दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातून चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार गज चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.
- चक्रीवादळात किनाऱ्यालगतच्या भागामध्ये ताशी 90 ते 110 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने या परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.
- महाराष्ट्रामध्ये सध्या बहुतांश भागात निरभ्र आकाश असल्याने कोकण, मुंबई विभाग वगळता इतर ठिकाणी किमान तापमानात घट झाली असल्याने थंडी अवतरली आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या तापमानाचा पारा 20 अंशांच्या खाली आला आहे. चक्रीवादळाच्या स्थितीत राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
दिनविशेष:
- 12 नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक न्यूमोनिया दिन‘ म्हणून पाळला जातो.
- सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांचा 12 नोव्हेंबर 1880 मध्ये पारनेर, जि. अहमदनगर येथे जन्म झाला.
- समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव तथा एस.एम. जोशी यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1904 मध्ये झाला.
- सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
- सन 2000 मध्ये 12 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा