12 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (12 ऑक्टोबर 2018)
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी रश्मी शुक्ला:
- राज्य पोलीस दलातील विशेष अभियानाचे प्रमुख डी. कनकरत्नम व अपर महासंचालक (सामग्री व तरतूद) हेमंत नगराळे यांना महासंचालकपदी बढती देण्यात आली. त्यांची अनुक्रमे राज्य सुरक्षा महामंडळ व न्यायिक व तांत्रिक (एल अॅण्ड टी)पदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली.
- तर गेल्या सुमारे पावणे दोन वर्षांपासून पूर्णवेळ अधिकाऱ्यापासून रिक्त असलेल्या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तपदी महामार्ग पोलीस विभागाच्या अपर महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनंतर गृह विभागाने त्याबाबतचे आदेश जारी केले. सेवाज्येष्ठतेच्या आधारावर कनकरत्नम व नागराळे यांना बढती देण्यात आली असून दोघेही जण 1987च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील डीजीची मंजूर असलेली सर्व आठ पदे भरण्यात आली आहेत.
- तसेच आस्थापना विभागाचे अपर महासंचालक असलेले संदीप बिष्णोई यांची महामार्ग वाहतूक पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांचा अतिरिक्त पदभार अपर महासंचालक (प्रशासन) प्रज्ञा सरवदे यांच्याकडे सोपवण्यात देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
पॅरा आशियाई स्पर्धेत शरद कुमारला विक्रमी सुवर्णपदक:
- गत चॅम्पियन शरद कुमार याने पुरुषांच्या उंच उडीत पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन नव्या विक्रमांसह सुवर्ण जिंकले. बिहारचा रहिवासी असलेल्या शरदच्या डाव्या पायाला अर्धांगवायू झाला होता. दोन वर्षांचा असताना पोलिओविरोधी मोहिमेत बानावट औषधाचा डोस दिल्यामुळे शरदवर ही परिस्थिती ओढवली होती.
- विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक विजेता असलेल्या 26 वर्षांच्या शरदने उंच उडीच्या टी-42/63 प्रकारात 1.90 मीटर उडी घेत आशियाई तसेच स्पर्धा विक्रमांची नोंद केली. टी 42-63 प्रकार शरीराच्या खालच्या भागातील दिव्यांगाशी संबंधित आहे.
- ऑलिम्पिक कांस्य विजेता वरुण भाटी याने 1.82 मीटर उडी घेत रौप्य जिंकले. कांस्यपदक थंगावेलू मरियप्पनला मिळाले. विशेष म्हणजे मरियप्पनने याच प्रकारात रियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले होते.
मुंबईतील ‘औद्योगिक क्रांती केंद्रा’चे दिल्लीत उद्घाटन:
- सॅनफ्रान्सिको पाठोपाठ थेट मुंबईत ‘औद्योगिक क्रांती केंद्र‘ उभे राहत असून त्याचे उद्घाटन 11 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
- दावोस येथे जागतिक अर्थ परिषदेत हे केंद्र स्थापन करण्यासंदर्भात करार करण्यात आला होता. या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील शेती क्षेत्राला फायदा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- अशा स्वरुपाचे जगातील हे दुसरे केंद्र आहे. जागतिक अर्थ मंचाच्या वतीने दिल्लीत ‘औद्योगिक क्रांती केंद्र 4.0’चे आयोजन करण्यात आले होते. या केंद्राचे महत्त्व स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, औद्योगिक क्रांती केंद्राच्या माध्यमातून शेतीपासून संरक्षण क्षेत्रापर्यत तंत्रज्ञानाचा वापर साह्य़कारी ठरला आहे.
- हे केंद्र मुंबईत स्थापन होत असल्याने आता शेतीच्या विविध क्षेत्रात अचूक अंदाज वर्तवता येतील. शेतीमाल विक्रीसाठी विविध बाजारपेठांमध्ये समन्वय साधता येऊ शकेल. हवामान बदलानुसार पीक पद्धतीतही बदल करणे शक्य होईल. पीक साखळी निर्माण करणे, रोगांवरील उपाय, दुष्काळ परिस्थितीवरही उपाय शोधणे सोपे होणार आहे.
- औद्योगिक क्रांती केंद्राच्या मदतीने ड्रोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून प्रशासकीय सेवांमध्येही सुधारणा करता येतील. भविष्यात कृत्रिम बुध्दिमत्तेचा अधिकाधिक वापरऔद्योगिक क्रांती केंद्राच्या साह्य़ाने करणे शक्य होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
देशाच्या एस-400 करारावर अमेरिका सरकार नाराज:
- भारताने रशियाबरोबर केलेल्या एस-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिमच्या खरेदी करारावर अद्याप अमेरिकेने आपली भूमिका जाहीर केलेली नाही. या करारात भारताला अमेरिकेकडून सवलत मिळण्याची शक्यता धूसर आहे.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाबरोबर केलेल्या या कराराबद्दल भारतावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मागच्या आठवडयात भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये एस-400 करार झाला. अमेरिकेने सीएएटीएसए कायद्यातंर्गत रशियाकडून शस्त्रास्त्र विकत घेण्यावर बंदी घातली आहे. मागच्या वर्षी अमेरिकन काँग्रेसमध्ये हा कायदा मंजूर झाला. फक्त अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सीएएटीएसए कायद्यातून एखादा देशाला सवलत देऊ शकतात.
- व्हाईटहाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी लवकरच भारतावर काय कारवाई होते ते तुम्ही लवकरच पहाल असे सांगितले. त्यामुळे भारतावर अमेरिकेकडून निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी अमेरिकेने रशियाकडून शस्त्रास्त्र विकत घेतले म्हणून चीनवर अशा प्रकारची कारवाई केली आहे.
स्वातंत्र्यसेनानी डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन:
- सर्वोदयी विचार रुजावेत यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे स्वातंत्र्यसेनानी डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांचे 11 ऑक्टोबर रोजी वयाच्या 96व्या वर्षी वृद्धापकाळाने वसमत येथील निवासस्थानी निधन झाले.
- ‘मराठवाडय़ाचे गांधी’ अशी त्यांची सर्वदूर ओळख होती. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे विचार अंगीकारत मराठवाडय़ाच्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या अखेरच्या शिलेदाराचे निधन झाल्याने मराठवाडाभर हळहळ व्यक्त होत आहे.
- जिल्ह्यातील वसमत या गावी 7 जानेवारी 1923 मध्ये गंगाप्रसादजींचा जन्म झाला. सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी उर्दू शाळेत घेतले. नंतर स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या योगेश्वरी विद्यालयातून मॅट्रिक आणि वर्धा येथील बियाणी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. दरम्यान, त्यांचे नाते महात्मा गांधी, विनोबा भावे आणि स्वातंत्र्यसंग्राम आणि भूदान आंदोलन याच्याशी जोडले गेले.
- महाविद्यालयात शिकत असताना चले जावो चळवळी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी मोलाची कामगिरी केली. आजेगाव येथील लढय़ात शस्त्र घेऊन ते प्रत्यक्ष लढले.
- मराठवाडय़ातील गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, चंद्रकोंत पाटील इत्यादी दिग्गजांच्या बरोबर अनेक सामाजिक आघाडय़ांवर त्यांनी बिनीचे शिलेदार म्हणून काम केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना ‘डी.लिट.’ या मानद पदवीने गौरविले होते.
दिनविशेष:
- भारतात ब्रिटिश सरकारने सन 1871 मध्ये क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट या कायद्याद्वारे 161 जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.
- क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1911 मध्ये झाला.
- क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) चे अध्यक्ष मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम.ए. चिदंबरम यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1918 मध्ये झाला.
- सन 2001 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा