13 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 फेब्रुवारी 2019)
राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सिद्धी शिर्केला सुवर्णपदक:
- पुण्याच्या सिद्धी शिर्के हिने 64व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. तिने 14 वर्षांखालील मुलींच्या 500 मीटर टाइम ट्रायलमध्ये अव्वल स्थान पटकावले. सिद्धीचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले. तिने रोड सायकलिंगमध्ये 6 किलोमीटर टाइम ट्रायलमध्ये सुवर्णयश मिळवले होते.
- भारतीय क्रीडा प्राधिकरण, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने म्हाळुंगे-बालेवाडी येथील वेलोड्रम स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सिद्धी शिर्केने 45.110 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले.
- तामिळनाडूच्या एम. पूजा स्वेताने 47.610 सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक प्राप्त केले. तर महाराष्ट्रच्या सुहानी मोरेने 52.517
सेकंदासह कांस्यपदकाची कमाई केली. - 14 वर्षांखालील मुलांच्या 500 मीटर टाइम ट्रायलमध्ये झारखंडच्या नारायण महतोने (40.158 सेकंद) सुवर्णपदक प्राप्त केले. महाराष्ट्राच्या अथर्व पाटीलला (41.680 सेकंद) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. झारखंडच्या अर्णव श्री याने (41.830 सेकंद) कांस्यपदक मिळवले.
हिरवाई निर्मितीच्या प्रयत्नात भारत-चीनचा मोठा योगदान:
- जास्त लोकसंख्येचे देश हे नेहमी पर्यावरणाची हानी करीत असतात, त्यामुळे जमिनीवरील हिरवाईचे क्षेत्र कमी होते, असा आतापर्यंतचा समज असला तरी अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेच्या एका अहवालाने तो खोटा ठरला आहे.
- चीन व भारत या जास्त लोकसंख्या असलेल्या देशांनीच हिरवाई निर्माण करण्याच्या जागतिक उद्दिष्टात मोठे काम केले आहे असे अहवालात म्हटले आहे.
- जग हे वीस वर्षांपूर्वीपेक्षा जास्त हिरवे आहे, असाही निष्कर्ष त्यात काढण्यात आला आहे. नासाच्या उपग्रहांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधात मुख्य लेखक व बोस्टन विद्यापीठातील प्राध्यापक ची चेन यांनी म्हटले आहे, की जगातील एकतृतीयांश हिरवाई भारत व चीनमध्ये असून, जगातील हिरवाईखालील क्षेत्राचा 9 टक्के भाग या दोन्ही देशांत आहे.
- 11 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या शोधनिबंधात 2000-2017 या काळात नासाच्या उपग्रहांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे भारत व चीन या देशांत जगातील इतर पीक क्षेत्रापेक्षा हिरवाईचे पट्टे अधिक आहेत असे म्हटले आहे.
1967 पूर्वीच्याच रहिवाशांना मिळणार 10 टक्के आरक्षण:
- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता 10 टक्के आरक्षण देण्याबाबतचा शासकीय आदेश काढण्यात आला. त्यानुसार या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय 13 आॅक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापूर्वीचे महाराष्ट्रातील रहिवासी असणे अनिवार्य असेल.
- या आरक्षणाच्या लाभासाठी अटी व शर्थी लागू केल्या. त्यानुसार ज्या अर्जदार/उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या आत असेल त्यास आर्थिक दुर्बल समजून आरक्षणाचा लाभ दिला जाईल.
- कुटुंबाच्या एकत्रित उत्पन्नात त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या सर्व स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश असेल. म्हणजेच वेतन, कृषी उत्पन्न, उद्योग-व्यवसाय व इतर सर्व मार्गांतून होणारे, अर्ज दाखल करण्याच्या दिनांकाच्या मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न एकत्रितपणे 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे ही अट राहील.
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वय, परीक्षा शुल्क व इतर देय सवलती या इतर मागास प्रवर्गास शासनाने लागू केलेल्या नियमानुसार असतील. आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्रता प्रमाणपत्र देण्याचे अधिकार संबंधित तहसीलदारांकडे असतील.
- शासकीय, निमशासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे, नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरणे यांच्यात नियुक्तीसाठी सरळसेवा पदांमध्ये 10 टक्के आरक्षण लागू असेल. शैक्षणिकदृष्ट्या असलेले 10 टक्के आरक्षण शासकीय शैक्षणिक संस्था, विद्यालये, महाविद्यालये, सर्व उच्च शिक्षण देणार्या संस्थांमध्ये लागू राहील.
पुण्याचा सौरभ पवार बनला भूगर्भशास्त्रज्ञ:
- गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या सौरभ पवार यांना भूगर्भशास्त्रात रस वाटू लागला. मग हाच करिअरचा मार्ग त्यांनी निवडला. या क्षेत्रातील शिखर गाठायचे म्हणून पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट धरली.
- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी देशात तिसरा क्रमांक मिळविला. ते लवकरच भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून रुजू होतील. आंबेगाव पठार येथील सौरभ यांनी ‘कम्बाईन जिओ सायंटिस्ट ॲण्ड जिओलॉजिस्ट‘ परीक्षेत हे यश मिळविले. त्यांचे शालेय शिक्षण ज्ञानप्रबोधिनी शाळेत झाले.
- बारावीनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असणाऱ्या प्रवेश परीक्षेतही चांगले गुण होते. त्यामुळे सौरभ यांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सहज प्रवेश मिळाला असता. परंतु ‘भूगर्भशास्त्र’ विषयातील करिअर खुणावत होते.
- त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाऐवजी भूगर्भशास्त्राची वाट निवडली. त्यासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. एस्सी (जिओलॉजी) पदवी पूर्ण केली. पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी त्यांनी चेन्नईतील अण्णा विद्यापीठ गाठले.
- तेथे सुवर्णपदकासह एम.एस्सी (जिओलॉजी) शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर फेलोशिपच्या सहाय्याने ‘पीएच.डी.’द्वारे संशोधनाचा मार्ग सौरभ यांच्यासाठी मोकळा होता. परंतु, त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरविले. या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात अपयश आले. पण, अधिक जोमाने दुसऱ्यांदा परीक्षा देत घवघवीत यश मिळविले.
‘ट्राय’ तर्फे 31 मार्च ही नवी डेडलाईन जाहीर:
- टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने ग्राहकांना दिलासा देत आवडीचे चॅनल निवडण्याची मुदत वाढवली आहे. आवडीचे चॅनल निवडण्यासाठी आता ट्रायने 31 मार्च ही नवी डेडलाईन दिली आहे.
- यापूर्वी ट्रायने ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्यासाठी 1 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, केबल सेवा असलेले 65 टक्के ग्राहक आणि डीटीएचच्या केवळ 35 टक्के ग्राहकांनी आपल्या आवडत्या वाहिन्यांची निवड केली असल्याची माहिती ट्रायने दिली. अनेक जणांना नव्या नियमांनुसार टीव्ही चॅनलचे पॅक कसे निवडावे याबद्दल माहिती नाहीये किंवा संभ्रम आहे.
- परिणामी, ट्रायने व्यापक जनहिताचा विचार करून ज्या ग्राहकांनी आपले चॅनल निवडलेले नाहीत त्यांना त्यांच्यासाठी योग्य असलेल्या पॅकमध्ये (बेस्ट फीट प्लॅन) समाविष्ट केले जावे किंवा जोपर्यंत ग्राहक आपले चॅनल निवडत नाहीत किंवा त्यांना इतर योग्य पॅकमध्ये समाविष्ट केले जात नाही तोपर्यंत सध्या ग्राहकाचा सुरु असलेला पॅकच सुरू ठेवावा, असे आदेश दिले आहेत.
दिनविशेष:
- 13 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक रेडीओ दिन‘ आहे.
- स्पेनने सन 1668 या वर्षी पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
- प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 मध्ये झाला होता.
- इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1894 मध्ये झाला.
- लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1911 रोजी झाला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा