14 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (14 डिसेंबर 2018)
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जीवन गौरव पुरस्कार:
- ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि तबला वादक विनायक थोरात यांनी नि:स्वार्थपणे रंगभूमी व संगीतभूमीसाठी केलेली सेवा ही अमूल्य आहे. या दोन्ही कलाकारांनी आयुष्यभर रंगभूमीसाठी दिलेले योगदान हे आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.
- तसेच साहित्य, कला, संगीत यांचे संचीत पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करीत आहे, असे वक्तव्य सांस्कतिक मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.
- नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार विजेते बाबा पार्सेकर यांच्याहस्ते जयंत सावरकर यांना तर गतवर्षीचे संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार विजेत्या श्रीमती निर्मला गोगटे यांच्या हस्ते विनायक थोरात यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- तर यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष, प्रसाद कांबळी, अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती कीर्ती शिलेदार आणि नवनिर्वाचित नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी आदी मान्यवर उपस्थित होते.
बँक कर्मचाऱ्यांचा संप, पाच दिवस बँका बंद राहणार:
- बँकेची जर काही महत्त्वाची कामे असतील तर ती 20 तारखेच्या आधीच करुन घ्या, जर 20 तारखेपर्यंत बँकेची कामे केली नाहीत तर तुम्हाला बरेच दिवस वाट पाहावी लागेल. कारण 20 तारखेनंतर 5 दिवस बँका बंद असणार आहेत. 21 ते 26 डिसेंबरदरम्यान 5 दिवस बँका बंद असतील.
- 21 डिसेंबर रोजी बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्राच्या नीती विरोधात ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
- वेतनवाढ आणि बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांच्या विलयाच्या निर्णयाला विरोध यासाठी बँकांकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. त्यामुळे 21 डिसेंबर रोजी संप, 22 आणि 23 डिसेंबर रोजी चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.
- तसेच 24 डिसेंबर रोजी बँका उघडतील पण मोठ्या गर्दीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यानंतर 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसनिमित्त सुट्टी आणि 26 डिसेंबर रोजी युनायटेड फोरमने पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
- बँका बंद असल्याने एटीएममध्ये देखील गर्दीचा सामना करावा लागू शकतो. बँकांना सुट्टी असली तरी एटीएमध्ये पैसे टाकण्याचे काम सुरु असणार आहे.
मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री ‘कमलनाथ’:
- मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 13 डिसेंबर रोजी रात्री उशीरा काँग्रेसने ट्विटरद्वारे कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
- काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्रीपद नसेल असेही सांगितले जात आहे.
- मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात जोरदार चूरस होती, मात्र पहिल्यापासूनच कमलनाथ यांचे नाव आघाडीवर होते.
- पण नेतृत्वाचा प्रश्न राज्यात सुटू न शकल्याने अंतिम निर्णय हायकमांडवर सोपवण्यात आला होता. त्यानुसार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतले.
- शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांना अखेर माघार घ्यावी लागली. त्यांना दिल्लीत मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.
‘ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार मान्यकरून त्यांची अमलबजावणी करावी’ सर्वोच्च न्यायालय:
- देशभरातील 10 कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार मान्य करून त्यांची अंमलबजावणी अवश्य करण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले.
- तसेच याबाबत केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून वृद्घाश्रमांच्या संख्येची जिल्हावार माहिती घ्यावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
- जेष्ठांसाठीच्या निवृत्तीवेतन (पेन्शन) योजनांचा फेरआढावा घेऊन या योजना अधिक वास्तववादी कराव्यात, असेही न्यायालयाने सुचवले आहे.
- याप्रकरणी सामाजिक न्यायाच्या पैलूवर भर देत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, जेष्ठांसह अन्य नागरिकांचा सन्मानपूर्वक जगण्याचा, निवारा आणि आरोग्याचा अधिकार सुरक्षित ठेवण्याबरोबरच त्याची अंमलबजावणी करणे हेसुद्धा सरकारचे कर्तव्य आहे. यावेळी न्यायालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यघटना दिनी नागरी हक्कांविषयी व्यक्त केलेल्या मताचा हवाला दिला.
- याप्रकरणी न्या. मदन बी. लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला निर्देश दिले. ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा आणि औषधोपचारांबाबत सर्व राज्यांकडून जिल्हानिहाय माहिती घेण्यात यावी, असेही त्यांनी केंद्र सरकारला बजावले आहे.
सीआयडीचे दिग्दर्शक बी.पी. सिंग FTII च्या अध्यक्षपदी:
- सीआयडी या गाजलेल्या टीव्ही मालिकेचे निर्माते दिग्दर्शक बी.पी. सिंग यांची FTII च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
- माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती पुढे आणली आहे. बिजेंद्र पाल सिंग हे आता FTII चे नवे अध्यक्ष असतील अशी पत्रकच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे.
- सिनेमॅटोग्राफी हा बी.पी. सिंग यांचा मुख्य विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या टीव्ही आणि मनोरंजन जगतात कार्यरत आहेत. सीआयडी या त्यांच्या मालिकेला नुकतीच 21 वर्षे पूर्ण झाली.
- सीआयडी या मालिकेने लोकांच्या मनावर गारूड केले. अभिनेते अनुपम खेर यांच्या जागी सिंग यांची निवड करण्यात आली आहे. 4-3-17 या कालावधीपासून त्यांचा तीन वर्षांचा कालावधी सुरु झाल्याचेही माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे.
- तसेच याआधी सिंग यांच्याकडे FTII चे उपाध्यक्ष पद होते. सिंग यांना इथल्या प्रश्नांची पूर्ण जाणीव आहे. ते आता अध्यक्ष म्हणून अधिक चांगले काम करतील अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.
राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार कालवश:
- राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 76व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे ते सासरे होते.
- अरुण बोंगीरवार हे 1966 बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी सरकारच्या विविध खात्यांमध्ये आयएएस अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
- तसेच त्यांनी महाराष्ट्रातील 25 वे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले होते. बोंगीरवार हे मूळचे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातले असून, त्यांनी उस्मानाबाद आणि नागपूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी पदावरही काम केले होते. तसेच ते औरंगाबाद, पुणे आणि कोकणचे विभागीय आयुक्त होते.
- महसूल खात्यामध्ये त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी बोंगीरवार कमिटीचे नेतृत्वही केले होते. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी या दोन मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
- तसेच पुण्याचे महापालिका आयुक्तपद भूषवण्याचीही त्यांना संधी मिळाली होती. 1999मध्ये त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.
दिनविशेष:
- योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचा जन्म 14 डिसेंबर 1918 रोजी झाला होता.
- अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 मध्ये झाला होता.
- ‘दुसरे महायुद्ध‘ सन 1941 मध्ये जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
- इंदिरा गांधी यांचे पुत्र ‘संजय गांधी‘ यांचा जन्म 14 डिसेंबर 1946 मध्ये झाला होता.
- सन 1961 मध्ये टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा