15 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
BSNL-MTNLची सेवा बंधनकारक – केंद्राचा मोठा निर्णय
15 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 ऑक्टोबर 2020)
सहा राज्यांसाठी ‘स्टार्स’ नावाची योजना:
नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून केंद्र सरकारने सहा राज्यांसाठी ‘स्टार्स’ नावाची योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘स्टार्स’ योजनेंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देणे, परीक्षा पद्धतीत सुधारणा करणे, राज्या-राज्यांमध्ये अधिक समन्वय निर्माण करणे तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रमुख उद्दिष्टे असतील.
ही योजना महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि ओडिशा या सहा राज्यांमध्ये राबवली जाणार असून बुधवारी त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या योजनेसाठी जागतिक बँकेने 3,718 कोटींचा निधी दिला असून राज्ये 2 हजार कोटी देतील.
गुजरात, झारखंड, उत्तराखंड, आसाम आणि तमिळनाडू या पाच राज्यांसाठीदेखील अशीच योजना राबवली जाणार असून त्यासाठी आशियाई विकास बँक साह्य़ करणार आहे.
इयत्ता तिसरीपर्यंत विद्यार्थ्यांना भाषेची जाण येईल व त्या आधारावर परीक्षेची रचना केली जाईल. परीक्षा पद्धतीत सुधारणा केल्या जातील.
स्वतंत्र मूल्यमापन मंडळ वा संस्था स्थापन केली जाईल, असेही जावडेकर यांनी सांगितले.
BSNL-MTNLची सेवा बंधनकारक – केंद्राचा मोठा निर्णय:
केंद्र सरकारने बीएसएनल आणि एमटीएनएल या सार्वजनिक दूरसंचार कंपन्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार, सर्व केंद्रीय मंत्रालये, सार्वजनिक विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये बीएसएनएल-एमटीएनएलची सेवा अनिवार्य करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने (डीओटी) याबाबत एक परिपत्रक काढले आहे.
दूरसंचार विभागाच्या परिपत्रकानुसार, भारत सरकारने आपली सर्व मंत्रालये/विभाग, सीपीएसई, केंद्रीय स्वायस्त संस्थांमध्ये बीएसएनएल आणि एमटीएनएलची सेवा अनिवार्य करण्यास मंजुरी दिली आहे.
12 ऑक्टोबर रोजी हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारच्या सर्व सचिवालय आणि विभागांसाठी ही सेवा लागू करण्यात आली आहे.
भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो, ही भीती चीनच्या मनात:
पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरु झाल्यापासून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी पँगाँग टीएसओच्या परिसरावर हायस्पीड गस्ती नौकांद्वारे लक्ष ठेवून आहे.
चीनकडून टाइप 305 आणि टाइप 928 डी बोटींचा वापर करण्यात येतो. या नौका स्वीडीश सीबी-90 ची कॉपी आहे.
चीन पँगाँग टीएसओ परिसरातील फक्त भूभागावरच नव्हे, तर पाण्याखालून कुठली हालचाल होऊ नये, यावरही चीन लक्ष ठेवून आहे.
भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो, ही भीती चीनच्या मनात आहे. जगभरातील नौदलं ज्या पाणबुडी विरोधी तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्याचाच वापर चीनकडून सरु आहे.
फिंगर चार ते फिंगर आठ दरम्यान चीनने एकूण 13 बोटी तैनात केल्या आहेत. पँगाँग टीएसओ तलावात पाण्याखाली चालणाऱ्या हालचालींवर पीएलए एअर फोर्सने बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.
यासाठी पीएलओ एअर फोर्सने मॅग्नेटिक अॅनोमली डिटेक्टर बूम बसवलेल्या विशेष विमानांचा वापर सुरु केला आहे. विमानाच्या शेपटाकडे हे उपकरण असते.
पीएलएच्या नौदलाकडून पाणबुडीविरोधात Y-8 GX6 किंवा Y-8 या विमानांचा वापर केला जातो.
युक्रेनचा हा स्पेनवरील 17 वर्षांतील पहिला विजय ठरला:
विक्टर सायगानकोव्ह याने मिळालेल्या संधीचे सोने करत युक्रेनला नेशन्स लीग फुटबॉलमध्ये स्पेनवर 1-0 असा विजय मिळवून दिला.
युक्रेनचा हा स्पेनवरील 17 वर्षांतील पहिला विजय ठरला.
कियिव्ह ऑलिम्पिक स्टेडियमवर जवळपास 15 हजार चाहत्यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सामन्यात प्रेक्षकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे खेळाडूही आनंदित झाले.
स्वित्झर्लंडच्या अप्रतिम खेळामुळे जर्मनीला बरोबरीसाठी संघर्ष करावा लागला.
जर्मनीने पिछाडीवरून मुसंडी मारत 3-3 अशी बरोबरी साधली.
56व्या मिनिटाला स्वित्झर्लंड 3-2 अशा आघाडीवर होता. पण चार मिनिटांनी सर्जे नॅब्रीचा गोल जर्मनीला बरोबरी साधून देणारा ठरला.
दिनविशेष:
15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक विद्यार्थी दिन’ आहे.
सन 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.
15 ऑक्टोबर 1918 हा दिवस भारतीय गुरू आणि संत शिर्डीचे साई बाबा यांचा स्मृतीदिन आहे.
वैज्ञानिक आणि भारताचे 11 वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये झाला.
हरगोविंद खुराणा यांना सन 1968 मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.