16 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (16 नोव्हेंबर 2018)
‘टॉक्सिक’ हा ऑक्स्फर्डच्या मते 2018चा प्रातिनिधिक शब्द:
- जगप्रतिष्ठित ऑक्स्फर्ड शब्दकोशाने 2018चा ‘वार्षिक शब्द‘ म्हणून ‘टॉक्सिक‘ या शब्दाची निवड केली आहे. जो शब्द त्या वर्षांतील समाजवास्तवाचे प्रतिनिधित्व करतो त्याची निवड दरवर्षी ऑक्स्फर्ड दरवर्षी ‘वर्ड ऑफ द इयर‘ म्हणून करते.
- या वर्षी अनेक शहरांतले वातावरण प्रदूषणाने विषारी होते, राजकीय क्षेत्रही विषारी वक्तव्यांनी दूषित होते आणि ‘मीटू‘सारख्या मोहिमेनेही विषारी पौरुषाचा प्रथमच उल्लेख केला. त्यामुळे हा शब्द या वर्षभरात विविध संदर्भात सातत्याने वापरात आल्याने त्याची निवड झाली.
- ‘गॅसलाइटनिंग‘, ‘इन्सेल‘, ‘टेकलॅश‘ आणि ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी‘ हे शब्द निवड समितीसमोर अंतिम फेरीत आले होते. जगभर खळबळ उडवून दिलेल्या ‘मी टू’ मोहिमेने ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी‘ अर्थात विषारी पौरूष हा शब्द जन्माला घातला होता आणि तो सर्वाधिक प्रचलितही झाला. त्यामुळे या शब्दावर सर्वाचेच एकमत झाले. मात्र त्याचवेळी ‘टॉक्सिक’ हा शब्दच या वर्षांत कितीतरी संदर्भात वापरला गेल्याचा मुद्दा पुढे आला.
- या वर्षांतील राजकीय नेत्यांची वाक् शैली विषारी झाली आहे, वातावरणाचा दर्जा विषारी झाला आहे आणि ‘मी टू’चा जन्म ज्या लिंगविखारी प्रवृत्तीविरोधात झाला त्या प्रवृत्तीतून बोकाळलेला विषारी मनोभाव.. अशा सर्वच पातळ्यांवर ‘टॉक्सिक‘ हा शब्द अमर ठरला.
मुळशीच्या युवकाने केले अमा दब्लाम शिखर सर:
- मुळशीचा युवक एव्हरेस्टवीर भगवान चवले यांनी नेपाळमधील खुंबू व्हॅलीमधील चढाईस अत्यंत अवघड असणारे 22500 फुटाचे अमा दब्लाम शिखर सर करुन भारताचे नाव उंचावर नेले आहे. त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
- नेपाळमधील खुंबू व्हॅलीमधील चढाईस अत्यंत अवघड असणारे 22500 फुटाचे अमा दब्लाम शिखर एक आव्हानच मानले जाते. जगभरातून दिग्गज गिर्यारोहक या शिखरावर चढाई करण्यास येतात.
- तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि शारीरिक दृष्ट्या कणखर असणारेच या शिखरावर चढाईस योग्य ठरतात. भगवान चवले यांनी याच वर्षी मे महिन्यात एव्हरेस्ट सर केले आहे. या दरम्यान हे शिखर कधीतरी आपणही सर करायचे असा विचार मनात घोळत होता. पण मनात एक भीती पण होती. कारण या शिखराने भल्या भल्यांना आपला रूद्र अवतार दाखवला आहे.
- तसेच भारतातून आतापर्यंत फक्त 4 जणांनी या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. त्यामुळे मनात शंकांचे काहूर होते. तरी पण शिखर चढाईचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. आणि ते यशस्वी करुन दाखवले.
‘रक्षा’ मोबाइल ऍप महिलांचा सुरक्षारक्षक:
- ‘टॅग मी टू‘ चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्न उभा ठाकला तो राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा. या समस्येचे खरे निराकरण नागपूर शहर पोलिसांकडे आहे. ते म्हणजे ‘रक्षा‘ ऍप. विशेष म्हणजे हे ऍप गुगल ऍपवर असल्याने त्याला राज्यव्यापी प्रतिसाद मिळतो.
- राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांनी महिला सुरक्षेसाठी ऍप तयार केले आहे, त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहान पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
- महिलांच्या सुरक्षेसाठी विविध नियम, कायदे, अधिकार असताना त्यांचे पालन शंभर टक्के होताना दिसत नाही. या कायद्यांबाबत लोकांमध्ये अनभिज्ञता दिसते. पोलिस ठाण्याची पायरी चढण्यापेक्षा प्रसंग विसरण्यातच महिला धन्यता मानतात, असा बऱ्याच अंशी अनुभव आहे.
- कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी ‘अधिनियम, 2013′ अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापण्याची तरतूद आहे. बहुतांश संस्थांमध्ये समितीच नाही. अनेक ठिकाणी ती केवळ कागदावरच असल्याने, महिलांना पुरेसा न्याय मिळत नाही. असाच आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेला आहे. मात्र, त्यालाही महविद्यालयांनी केराची टोपली दाखवली आहे.
- या समस्येवर नागपूर पोलिसांचे ‘रक्षा‘ ऍप गुणकारी असल्याने त्याची राज्यात मागणी वाढते आहे. अवघ्या सहा महिन्यांत हे ऍप 7 हजारांहून अधिक जणांनी डाउनलोड केले. अनेकांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली.
- तसेच याची निर्मिती ‘मॉडर्न व्ही आर सिक्युरिटी फोर्स’ने केली असून, ऍप डाउनलोड केल्यानंतर स्वतःचा आणि आपल्या विश्वासातील दोघांचा क्रमांक त्यात नोंदवावा लागतो. संकटात पोलिसांची मदत पाहिजे, असे तुम्हाला वाटल्यास ऍपमधील एमर्जन्सी बटन दाबा. त्यानंतर सेकंदाभरात नोंदवलेल्या दोघांनाही तुम्ही संकटात असल्याचा संदेश जातो.
पृथ्वी शेजारील आणखी एका ग्रहाचा शोध:
- खगोल शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या नव्या शेजाऱ्याचा शोध लावला आहे. हा नवा ग्रह पृथ्वीपासून अवघी सहा प्रकाश वर्षे दूर आहे. तो सूर्यमालेबाहेर असला तरी सूर्याच्या कक्षेजवळ आहे. हा ग्रह अतिशीत आहे. त्यावर बर्फाचे जाड आवरण आणि त्या खाली पाण्याचा थर आहे. तेथील वातावरण अतिशीत असले तरी तेथे जीवसृष्टी असावी, अशी आशा संशोधकांना आहे.
- या ग्रहाचा आकार पृथ्वीपेक्षा 3.2 पटीने जास्त आहे. परंतु, ज्या सूर्याभोवती हा ग्रह फिरतो त्याचे वय आपल्या सूर्यापेक्षा दुप्पट असल्याने तो या ग्रहाला पुरेसा प्रकाश देऊ शकत नाही.
- या ग्रहाला बर्नार्ड स्टार बी या नावाने संबोधले जाते. तो पृथ्वीपासून जवळ असलेला दुसरा ग्रह आहे. त्याच्याविषयी माहिती देताना ‘इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस स्टडिज ऑफ कॅटालोनिया अॅण्ड स्पेन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स‘च्या इग्नासी रिबास म्हणाले की हा ग्रह आपला शेजारी आहे. त्यावर जीवसृष्टीची शक्यता नाही. तेथे वायू किंवा पाणी घनरूपात आहे.
- खगोल शास्त्रज्ञांनी 1995 मध्ये या ग्रहाविषयी संशोधन सुरू केले होते. त्याचा अभ्यास करण्यासाठी 50 संशोधक आणि 25 खगोल शास्त्रज्ञांच्या चमूने 20 वर्षे संशोधन केले. विविध देशांतील दुर्बीणींनी घेतलेल्या छायाचित्रांनंतर या ग्रहाची गुपिते उलगडण्यात शास्त्रज्ञांना यश आले.
दिनविशेष:
- 16 नोव्हेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन‘ म्हणून पाळला जातो.
- सन 1893 मध्ये डॉ. अॅनी बेझंट यांचे भारतात आगमन झाले होते.
- केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी ‘धोंडो वासुदेव गद्रे‘ यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1894 मध्ये झाला.
- सन 1945 मध्ये युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
- 16 नोव्हेंबर 1996 रोजी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ झाला.
- सन 1997 मध्ये अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा