17 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
17 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (17 जुलै 2020)
अमेरिकेत गेल्या 24 तासात 68 हजार 428 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली:
अमेरिकेत गेल्या 24 तासात 68 हजार 428 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
अमेरिकेतील करोनाबाधित रुग्णसंख्या 35 लाख 60 हजार 364 वर पोहोचली आहे. दरम्यान 974 मृत्यूंची नोंद झाली असून मृत रुग्णांची संख्या 1 लाख 38हजार 201 झाली आहे. एएफपीने ही माहिती दिली आहे.
अमेरिकेत फ्लोरिडा हे करोनाचं केंद्र म्हणून समोर आलं आहे. फ्लोरिडामध्ये गुरुवारी 156 रुग्णांचा मृत्यू झाला असून 14 हजार नवे रुग्ण सापडले आहेत.
फ्लोरिडामध्ये एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या 3 लाख 15 हजारांच्या पुढे गेली असून 4782 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
सध्याच्या घडीला इतर राज्यांच्या तुलनेत फ्लोरिडामध्ये दिवसाला सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली जात आहे. यानंतर कॅलिफोर्निया आणि टेक्सास यांचा क्रमांक असून दिवसाला 10 हजार रुग्णांची नोंद होत आहे.
देशातील सर्वात मोठी व्यापारी संघटना असणाऱ्या ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (कैट म्हणजेच CAIT ) आता रक्षाबंधन हे पूर्णपणे भारतीय राखी वापरुनच साजरं करण्याचं आवाहन केलं आहे.
3 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून कोणीही चिनी मालापासून बनवलेल्या राख्या वापरु नयेत असं आवाहन कैटने केलं आहे.
‘भारतीय सामान आमचा अभिमान’ या मोहिमेअंतर्गत 10 जूनपासून कैटकडून बहुआयामी राष्ट्रीय मोहीम सुरु करण्यात आली आहे. ही मोहीम सुरु केल्यानंतर रक्षाबंधन हा पहिला मोठा सण असेल ज्यामुळे चिनी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
कैटने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा चिनी राख्यांवर बंदी घातल्यास चीनला 4 हजार कोटींचे नुकसान होणार आहे.
आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत असल्याची घोषणा- हरदीप पुरी केली:
करोनाच्या आपत्तीनंतर बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा शुक्रवारपासून सुरू होत असल्याची घोषणा नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी पत्रकार परिषदेत केली.
अमेरिका आणि फ्रान्स या दोन देशांसाठी मर्यादित स्वरूपात विमानसेवा पुरवली जाणार आहे.
दिल्ली ते लंडन या हवाई मार्गावर दररोज दोन विमान उड्डाणांबाबत ब्रिटनशीही चर्चा केली जात आहे. जर्मन विमान कंपनी लुफ्थान्साने सेवा द्यावी अशी विनंती जर्मनीला करण्यात आली असून ही चर्चाही अंतिम टप्प्यात आहे.
करोनामुळे 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. द्विपक्षीय संमतीनेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करावी लागेल, असे हरदीप पुरी यांनी सांगितले.
बारावीच्या परीक्षेत 98.2 टक्के गुण मिळून Ivy League University ची दारं खुली केली:
उत्तर प्रदेशातील खेड्यात राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाने बारावीच्या परीक्षेत 98.2 टक्के गुण मिळवले असून थेट अमेरिकेच्या विद्यापीठात प्रवेश मिळवला आहे.
अनुराग तिवारी लखीमपूर जिल्ह्यातील सरसन गावात वास्तव्यास आहे. अनुरागने सीबीएसई बोर्डातून बारावीच्या परीक्षेत 98.2 टक्क्यांसहित घवघवीत यश मिळवलं आहे.
परीक्षेतील यशाने अनुरागसाठी अमेरिकेच्या प्रतिष्ठित Ivy League University ची दारं खुली केली असून पूर्ण स्कॉलरशिप देण्यात आली आहे.
अनुराग तिवारीने कॉर्नेल विद्यापीठासाठी आपली निवड झाली असून तिथे पण अर्थशास्त्रातील उच्च शिक्षण घेणार असल्याची माहिती दिली आहे.
परदेशी विद्यार्थ्यांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय माघारी- ट्रम्प प्रशासन:
ऑनलाइन वर्गात शिकणाऱ्या अमेरिकी विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या मायदेशी पाठवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने रद्द केला आहे.
तर हार्वर्ड, एमआयटी यासह अनेक विद्यापीठांनी या निर्णयाविरोधात स्थलांतर व अंतर्गत सुरक्षा विभागाविरोधात न्यायालयात दावे दाखल केले होते. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता.
तसेच उन्हाळी शैक्षणिक सत्रात जे विद्यार्थी ऑनलाइन वर्गासाठी हजेरी लावणार असतील त्यांना देशातून परत पाठवण्याचा निर्णय अमेरिकेच्या स्थलांतर विभागाने 6 जुलै रोजी घेतला होता.
सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानच्या शैक्षणिक सत्रात करोना संसर्गाच्या भीतीने अनेक विद्यापीठांनी ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले असताना ट्रम्प प्रशासनाने जे परदेशी विद्यार्थी ऑनलाइन वर्गास हजेरी लावणार असतील त्यांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर दोन आठवडय़ांनी या निर्णयावर माघार घेण्यात आली असून एमआयटी, हार्वर्ड विद्यापीठ यांच्यासह एकूण दोनशे शिक्षण संस्थांनी याविरोधात न्यायालयात खटले दाखल केले होते.
तसेच या निर्णयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाली होती. या निर्णयाला विरोध करण्यात 17 राज्ये, गुगल, मायक्रोसॉप्ट, फेसबुक यासारख्या कंपन्याही सहभागी होत्या.
इंडियन प्रीमियर लीगचा कृती आराखडा निश्चित करण्यात येणार:
करोनाची साथ वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शुक्रवारी होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या ऑनलाइन बैठकीत इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.
भारतीय क्रिकेटची सुधारित कार्यक्रमपत्रिका आणि देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम यासह विषयपत्रिकेमधील 11 मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा होईल.
भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाला आधीच कात्री लावण्यात आली आहे. मर्यादित षटकांच्या तीन मालिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. श्रीलंका आणि झिम्बाब्वेचे दौरे आणि मायदेशात होणारी इंग्लंडविरुद्धची मालिका रद्द करण्यात आली आहे.
‘आयपीएल’च्या आयोजनासाठी सर्व पर्यायांचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. पहिला पर्याय हा भारतातच स्पर्धा आयोजनाचा आहे.
करोनाची साथ नियंत्रणात न आल्यास संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंकेचाही विचार करता येईल. पण स्पर्धा देशाबाहेर गेल्यास खर्चही वाढेल, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने दिली.
दिनविशेष :
17 जुलै हा आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन म्हणून पाळला जातो.
सन 1802 मध्ये मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.
दलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्म सन 1930 मध्ये 17 जुलै रोजी झाला.
वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे 17 जुलै 1955 रोजी डिस्नेलँड सुरू केले.
कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म 17 जुलै 1923 रोजी झाला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.