18 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
18 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (18 डिसेंबर 2019)
लैंगिक समानतेत भारत 112 व्या क्रमांकावर :
लैंगिक समानतेत भारत जागतिक पातळीवर चार अंकांनी घसरून 112 व्या क्रमांकावर गेला असून महिलांचे आरोग्य, आर्थिक सहभाग या दोन निकषांत भारत खालून पाचव्या क्रमांकावर आहे.
आइसलँड जगात लैंगिक समानतेत पहिल्या क्रमांकावर असून भारत गेल्या वर्षी 108 व्या क्रमांकावर होता तो आता 112 व्या क्रमांकावर गेला आहे.
जागतिक आर्थिक मंचाने लैंगिक समानता अहवाल जाहीर केला असून त्यात चीन 106, श्रीलंका, 102, नेपाळ 101, ब्राझील 92, इंडोनेशिया 85, बांगलादेश 50 या प्रमाणे क्रमवारी आहे. येमेन सर्वात शेवटच्या 153 क्रमांकावर असून इराक 152 तर पाकिस्तान 151 व्या क्रमांकावर आहे.
जागतिक आर्थिक मंचाने म्हटले आहे की, जगात लैंगिक समानता आणण्यासाठी 2019 पासून 99.5 वर्षे लागतील. 2018 मधील क्रमवारीनुसार 108 वर्षे लागतील.
तर याचा अर्थ महिला व पुरूष यांच्यात आरोग्य, शिक्षण, काम, राजकारण यात खूप दरी आहे. या वर्षी लैंगिक समानतेत जी प्रगती झाली आहे ती राजकारणातील महिलांच्या मोठय़ा प्रमाणावरील सहभागामुळे आहे. राजकीय क्षेत्रातील असमानता दूर करण्यासाठी गेल्या वर्षीच्या स्थितीनुसार 107 वर्षे लागली असती तर आता 95 वर्षे लागणार आहेत.
उत्तर प्रदेशात आता पुन्हा एकदा काही जिल्ह्यांची नावं बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये मेरठ जिल्ह्याचे नाव बदलून पंडित नथुराम गोडसे नगर, गाझियाबादचे नाव महंत दिग्विजय नगर आणि हापूड जिल्ह्याचे नाव महंत अवैद्यनाथ नगर असे नामांतर करण्याचे अनेक प्रस्ताव प्रशासनाकडे आले आहेत. या प्रस्तावांवर योगी सरकारने संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तातडीने उत्तर मागवले आहे.
तर उत्तर प्रदेशच्या महसूल विभागामार्फत याबाबत तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले असून यावर तातडीने उत्तर मागवले आहे. या पत्रानुसार, उत्तर प्रदेश सरकारच्या एकिकृत तक्रार निवारण प्रणालीमध्ये (IGRS) हापूडचे नाव महंत अवैद्यनाथ नगर आणि गाजियाबादचे नाव महंत दिग्विजय नगर असे करण्याबाबत म्हटले आहे.
दरम्यान, हापूड जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गुरु महंत अवैद्यनाथ यांच्या नावावरुन जिल्ह्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. मात्र, या पत्रात मुजफ्फरनगरचे नाव कोणाच्या नावाने बदलण्यात यावे याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ची यशस्वी चाचणी :
ओदिशाच्या चांदीपूर तळावर मंगळवारी सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण दलातील सूत्रांनी ही माहिती दिली. चांदीपूरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्पलेक्स 3 मध्ये मोबाइल लाँचरवरुन जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करणाऱ्या ब्रह्मोसच्या आवृत्तीची चाचणी घेण्यात आली.
तर या चाचणीने सर्व निकष पूर्ण केले आहेत असे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) सांगण्यात आले.
ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेले सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. युद्धनौका, पाणबुडी, मोबाइल लाँचर आणि फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते.
ब्रह्मोस हे आजच्या घडीला भारताकडे असलेले सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच फिलीपाईन्स ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेणारा पहिला देश बनू शकतो.
तसेच सध्या भारत आणि फिलीपाईन्समध्ये ब्रह्मोसची विक्री किंमत निश्चित करण्यावरुन चर्चा सुरु आहे. 2020 पर्यँत हा करार प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.
ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे. ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.
मराठमोळ्या स्मृतीला ICC कडून मिळाला बहुमान :
टीम इंडियाची मराठमोळी सलामीवीर स्मृती मंधाना हिला ICC च्या 2019 या वर्षातील एकदिवसीय आणि टी 20 संघात स्थान मिळाले आहे. वर्षभरात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूंचा मिळून ICC वर्षाअखेरीस एक संघ जाहीर करते.
त्यातील एकदिवसीय आणि टी 20 अशा दोनही संघात भारताच्या स्मृती मंधानाचा समावेश करण्यात आला आहे.
स्मृतीने वर्षभरात 51 एकदिवसीय सामने तर 66 टी 20 सामने खेळले. त्यात तिने अनुक्रमे 2 हजार 25 आणि 1 हजार 451 धावा केल्या. तिच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर ICC कडून तिला हा बहुमान मिळाला आहे.
तसेच स्मृतीव्यतिरिक्त शिखा पांडे, झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांचाही वर्षाच्या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. तर दीप्ती शर्मा आणि राधा यादव या दोघींनी टी 20 संघात स्थान मिळवले आहे. ICC ने मंगळवारी दोनही संघ जाहीर केले.
डॉ. श्रीराम लागू यांचे निधन :
‘कुणी घर देता का घर’ अशी आर्त विनवणी करीत रसिकांचे हृदय आपल्या अभिनयातून हेलावून टाकणारा रंगभूमीवरचा ‘नटसम्राट’ मंगळवारी काळाच्या पडद्याआड गेला.
‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘हिमालयाची सावली’ ,‘सूर्य पाहिलेला माणूस’ अशा रंगभूमी तसेच चित्रपटातील एकसे बढकर एक दर्जेदार कलाकृतींमधून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.
1951 पासून सुरू झालेल्या नाट्य व चित्रपट कारकिर्दीमध्ये जवळजवळ पन्नास वर्षात डॉ. लागू यांना अनेक मानसन्मान मिळाले.
भारत सरकारतर्फे 1974 साली ‘पद्मश्री’, महाराष्ट्र शासनातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार, 2000 साली ‘पुण्यभूषण’, त्यामध्ये ‘संगीत नाटक अकादमी’ आदी पुरस्कारांचा समावेश आहे. मराठी चित्रपटांसाठी त्यांना ‘सुगंधी कट्टा’. ‘सायना’ व ‘भिंगरी’ या चित्रपटांतील अभिनयासाठी ‘फिल्मफेअर’ पारितोषिकांनी गौरवले होते. ‘घरोंदा’ या हिंदी चित्रपटासाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
शर्करायुक्त शीतपेयांच्या सेवनात भारत तिसऱ्या क्रमांकावर :
आंतरराष्ट्रीय स्तरावर शर्करायुक्त शीतपेयांच्या सेवनात भारत तिसर्या क्रमांकावर असल्याचे धक्कादायक वास्तव लॅन्सेटच्या वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. परिणामी, यामुळे देशातील स्थूलता व वजन न वाढण्याच्या समस्येचा धोका वाढत असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.
तर आईसक्रीम, शीतपेये व शर्करायुक्त सुगंधित पेये यांच्यामध्ये अति प्रमाणात साखरेचा व रसायनांचा वापर केलेला असतो. त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होत आहे. शीतपेय, एनर्जी ड्रिंकमध्ये असंख्य रसायने वापरली जातात.
तर प्रामुख्याने फॉस्फोरिक अॅसिड, कॅफीन, अस्पारटम, विविध कृत्रिम रंग व कार्बन डायऑक्साइड व अॅल्युमिनियमचा वापर होतो. फॉस्फोरिक ऑसिडच्या परिणामी शीतपेयातील आम्लता वाढते व कार्बन डायऑक्साइडचे शोषण अत्याधिक केले जाते.
शीतपेयांमधील अनावश्यक साखरेने स्थूलता, अनुषंगिक आजार वाढतात. या साखरेने हाडे ठिसूळ होतात, प्रतिकारक्षमता कमी होते. हाडातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. कॉपर, झिंक व क्रोमिअम या धातूंची कमतरता निर्माण होते. यामुळे रक्तवाहिन्या यकृताचे, त्वचाविकार उद्भवू शकतात.
दिनविशेष:
18 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन‘ म्हणून पाळला जातो.
भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर ‘भिखारी ठाकूर‘ यांचा जन्म 18 डिसेंबर 1887 मध्ये झाला होता.
एफ.एम. रेडिओचे संशोधक ‘ई.एच. आर्मस्ट्रॉंग‘ यांचा जन्म 18 डिसेंबर 1890 मध्ये झाला होता.
सव्यसाची मुखर्जी यांनी सन 1989 मध्ये भारताचे 20वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
सन 2016 मध्ये भारतीय ज्युनियर हॉकी टिमने बेल्झियमला हरवून ज्युनियर वर्ल्ड हॉकी कप जिंकला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.