18 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (18 मार्च 2019)
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन:
- गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने 17 मार्च रोजी निधन झाले, ते 63 वर्षांचे होते.
- अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेले पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या एक वर्षापासून पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. यावर त्यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालय, अमेरिका आणि दिल्लीच्या एम्समध्ये उपचार घेतले होते.
- मुंबईतील आयआयटीतून मेटलर्जीमध्ये त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. 1994 मध्ये पर्रिकर पहिल्यांदा गोवा विधानसभेवर निवडून गेले.
- ऑक्टोबर 2000 मध्ये ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, जून ते नोव्हेंबर 1999 या काळात विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर 2014-17 या काळात त्यांच्यावर संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
- तर त्यांच्या या कार्यकाळातच सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय घेण्यात आला होता. मार्च 2017 मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा देत ते पुन्हा गोव्यात परतले आणि पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री बनले.
जम्मू-काश्मीरचे शाह फैजल यांची नव्या पक्षाची घोषणा:
- जम्मू-काश्मीर येथील रहिवासी असलेले माजी आयपीएस अधिकारी शाह फैजल यांनी आपल्या ‘जम्मू आणि काश्मीर पिपल्स मुवमेंट’ या नव्या राजकीय पक्षाची 17 मार्च रोजी श्रीनगर येथे घोषणा केली.
- तसेच प्रशासकीय सेवेतून बाहेर पडल्यानंतर सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याचे त्यांनी यापूर्वी संकेत दिले होते.
- शाह फैजल यांनी ‘जम्मू आणि काश्मीर पिपल्स मुवमेंट’ पक्षाची घोषणा केल्यानंतर दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्षा शेहला रशीद हीने या पक्षात प्रवेश केला आहे.
देशाचे पहिले लोकपाल माजी न्यायाधीश पी.सी. घोष:
- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांची देशाच्या पहिल्या लोकपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- मात्र, याची अधिकृत घोषणा 18 मार्च रोजी होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांकडून कळते. घोष यांनी आंध्र प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश म्हणून काम केले आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि विरोधकांच्या टीकेनंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
- लोकपाल नियुक्तीच्या निवड समितीने ही नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य न्यायाधीश किंवा त्यांच्याद्वारे नियुक्त न्यायाधीश, विरोधी नेता, लोकसभा अध्यक्ष आणि एक निवड सदस्य असतो.
- सुप्रीम कोर्टात विरोधी नेता नसल्याने अशा स्थितीत विरोधी पक्षाच्या नेत्यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात येणार होते.
- मात्र, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकपाल समितीच्या बैठकीत सहभाग घेण्यास नकार देताना सरकारवर मनमानी कारभाराचा आरोप केला होता. त्यानंतर मोठ्या विरोधानंतर मोदी सरकारने निवडणुकीपूर्वीच लोकपालची नियुक्ती केली आहे.
- देशाचे पहिले लोकपाल नियुक्त करण्यात आलेले न्या.पी.सी. घोष हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश होते. तसेच आंध्र प्रदेश हायकोर्टाचे ते मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्यही आहेत.
- न्या. घोष आपल्या निर्णयांमध्ये मानवाधिकारांचे संरक्षणाबाबत वारंवार भाष्य करत असत. न्या. घोष यांना मानवाधिकार कायद्याचे विशेषतज्ज्ञ म्हणून ओळखले जाते.
मतदानाच्या दोन दिवस आधी जाहीरनामा प्रसिद्धीस बंदी:
- मतदानाच्या 48 तास आधी पक्षांनी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करू नये, असे निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी स्पष्ट केले आहे.
- निवडणूक आयोगाने आता जाहीरनामा प्रसिद्ध करणे हा आचारसंहितेचाच एक भाग केला आहे. एका किंवा अनेक टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असल्यास जाहीरनामा प्रतिबंधात्मक कालावधीत प्रसिद्ध करू नये, असे सुधारित आचारसंहितेमध्ये म्हटले आहे.
- आतापर्यंत जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या वेळेबाबत कोणताही नियम नव्हता. गेल्या निवडणुकीत भाजपने पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. काँग्रेसने तेव्हा तक्रारही केली होती, मात्र त्या वेळी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबाबत आचारसंहिता नियम करण्यात आला नव्हता.
- तर त्यामुळे आयोग कोणतीही कारवाई करू शकला नाही. मतदानापूर्वी 72 तास अगोदर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यास राजकीय पक्षांना मज्जाव करावा, अशी शिफारस निवडणूक आयोगाने स्थापन केलेल्या पथकाने अलीकडेच केली होती.
टोक्यो ऑलिम्पिकसाठी के.टी. इरफान पात्र ठरला:
- जपानमधील नोमी येथे झालेल्या आशियाई चालण्याच्या शर्यतीमधील 20 किलोमीटर प्रकारात राष्ट्रीय विक्रमवीर के.टी. इरफान हा चौथा क्रमांक पटकावून टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. अॅथलेटिक्समधून 2020च्या ऑलिम्पिकची पात्रता मिळवण्यात यशस्वी ठरलेला तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
- या शर्यतीत इरफानने 20 किलोमीटरचे अंतर 1 तास 20 मिनिटे आणि 57 सेकंदांत पूर्ण केले. ऑलिम्पिक पात्रतेसाठी 1 तास 21 मिनिटे हे पात्रता निकष निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार इरफानने तीन सेकंद शिल्लक ठेवून ही पात्रता पूर्ण केली आहे. त्यामुळे इरफान आता दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
- तसेच यापूर्वी इरफान 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. त्या वेळी ऑलिम्पिकच्या शर्यतीत इरफानने 1 तास 20 मिनिटे 21 सेकंद ही त्याची सर्वोच्च वेळ नोंदवली होती. मात्र तरीदेखील इरफानला 10व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यापूर्वी केरळच्या इरफानने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत 1 तास 26 मिनिटे 18 सेकंद अशी कामगिरी नोंदवली होती.
- तर या शर्यतीत जपानच्या तोशिकाझू यामनिशीने 1 तास 17 मिनिटे 15 सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल स्थान गाठले. कझाकस्तानच्या जॉर्जि शायकोने 1 तास 20 मिनिटे 21 सेकंद तर कोरियाच्या बायोंगवांग चोई याने 1 तास 20 मिनिटे 40 सेकंद अशा वेळेसह तृतीय क्रमांक पटकावला.
फिफा महिला फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार:
- भारतातील फुटबॉल रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताला आणखी एका फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. भारताला 2020 मध्ये होणाऱ्या फिफाच्या अंडर-17 महिला फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. अलीकडेच फिफाकडून ही घोषणा करण्यात आली.
- मियामीमध्ये झालेल्या फिफाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधी भारताने पुरुषांच्या फिफा अंडर-17 फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. भारतात महिलांची अंडर-17 फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा होत असल्याने फुटबॉलच्या जागतिक नकाशावर भारतीय महिला फुटबॉल संघाला छाप उमटवण्याची संधी आहे.
- स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने गत अंडर-17 वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. 2018 साली उरुग्वेमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत स्पेनच्या संघाने मेक्सिकोच्या महिला संघाचा पराभव करुन जेतेपद मिळवले होते. त्यावेळी न्यूझीलंड आणि कॅनडाचा संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिला होता.
दिनविशेष:
- शहाजी राजे भोसले यांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी झाला होता.
- 18 मार्च 1867 रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म झाला होता.
- स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म 18 मार्च 1881 रोजी झाला.
- सन 1922 मध्ये महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल सहा वर्षे तुरूंगवास झाला.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन सन 1944 मध्ये भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा