19 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 फेब्रुवारी 2019)
संपूर्ण जग शिवरायांच्या कार्याने प्रभावित:
- छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती ही मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहेच. पण आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे आणि जागतिक दर्जाचे योद्धे म्हणूनही शिवरायांची ओळख आहे.
- तर यातील आणखी एक विशेष म्हणजे शिवाजी महाराज ज्यांच्याशी लढले त्यांनीही महाराजांचे श्रेष्ठत्व मान्य केले होते. त्यांच्यातील नेता, धुरंधर सेनानी, जाणता राजा ही आणि अशा असंख्य गुणांची ओळख समाजाला पदोपदी होत होती.
- महाराजांचा काळ लोटून इतकी वर्षं झाली तरीही त्यांचे इतिहासातील स्थान आणि मान याला जराही धक्का लागू शकत नाही. त्यांच्याबाबत जागतिक स्तरावर बोलल्या जाणाऱ्या गोष्टी भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने अभिमानास्पद आहेत.
- अश्या महान छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती.
स्टरलाइट प्रकल्पाला मान्यता नाहीच:
- तामिळनाडूतील तुतिकोरिन येथे असलेला वेदांत कंपनीचा स्टरलाइट प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा आदेश देण्याचा राष्ट्रीय हरित लवादाला अधिकार नाही त्यामुळे लवादाचा हा आदेश रद्दबातल करण्यात येत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले.
- तामिळनाडू सरकारने प्रदूषणाच्या कारणास्तव हा प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले आहे. स्टरलाइट प्रकल्पाच्या मुद्दय़ावर राष्ट्रीय हरित लवादाने निकाल दिला असला तरी हे प्रकरण त्यांच्या न्यायकक्षेत येत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
- न्या. रोहिंटन नरिमन यांच्या नेतृत्वाखालील पीठाने सांगितले, की स्टरलाइट प्रकल्पाच्या मालक असलेल्या वेदांत कंपनीची प्रकल्प बंद करण्याविरोधातील याचिका विचारात घेण्याचा लवादाला अधिकार नाही.
- असे असले तरी वेदांत कंपनी यात मद्रास उच्च न्यायालयात दाद मागू शकते, त्यामुळे आताचा घटनाक्रम बघता स्टरलाइट प्रकल्प बंदच राहणार आहे.
आयुक्तपदावरून राजीव कुमार यांची बदली:
- शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या चौकशीमुळे चर्चेत आलेले कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची बदली करण्यात आली आहे. सीआयडी अर्थात राज्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेत राजीव कुमार यांना पाठवण्याची शक्यता आहे.
- राजीव कुमार यांच्याकडे सीआयडीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचा पदभार दिला जाण्याची शक्यता आहे. यानुसार, राजीव कुमार यांच्यानंतर अनुज शर्मा हे कोलकाता शहराचे नवे पोलीस आयुक्त असू शकतात. नियमानुसारच कुमार यांची बदली झाल्याचेही वृत्त आहे.
- काही दिवसांपूर्वी शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात सीबीआयचे एक पथक कोलकाता येथे राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कोलकात्याच्या स्थानिक पोलिसांनीच सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते.
- सीबीआय अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त काही वेळातच पसरलं आणि देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
- तर यानंतर केंद्र सरकार जाणूनबुजून लक्ष्य करत असल्याचं सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर तुफान टीका केली आणि कारवाईविरोधात धरणे आंदोलनही केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राजीव कुमार यांना अटक करण्यास मनाई केली पण चौकशीसाठी सीबीआयच्या शिलाँग येथील मुख्यालयात त्यांना उपस्थित व्हावं लागलं होतं. अखेर आता राजीव कुमार यांची बदली झाली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन नियमावली जाहीर:
- देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उपलब्ध करुन देण्याबाबत सरकारने नियमावली जारी केली आहे. यानुसार राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी 25 किलोमीटरला एक चार्जिंग स्टेशन आवश्यक आहे.
- याशिवाय मोठ्या अवजड इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रत्येकी 100 किलोमीटरनंतर एक स्टेशन असावे, असे निर्देश प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासीत प्रदेशाच्या प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत.
- केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने हे स्टेशन्स उभारण्यासाठी दिशानिर्देश देणारी नियमावली जाहीर केली आहे. 2030 पर्यंत देशातील रस्त्यांवर धावणाऱ्या एकूण वाहनांपैकी सुमारे 25 टक्के वाहने ही ई-वाहने असतील अशी सरकारला आशा आहे. त्यासाठी आवश्यक सोई सुविधा उभारण्याची गरज असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.
- देशातील प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासीत प्रदेशाच्या प्रशासनाकडे हे निर्देश पाठविण्यात आले आहेत. यानुसार प्रत्येक राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशाने आपापल्या अखत्यारीत चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची परवानगी द्यावी असे सुचविण्यात आले आहे.
- देशात इलेक्ट्रीक वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होतांना दिसत आहे. यातच केंद्र सरकारने ई-वाहनांना प्राधान्य देण्याचे धोरण आखले आहे.
राज्यातील आणखी पाच महाविद्यालयांना स्वायत्तता:
- विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राज्यातील आणखी पाच महाविद्यालयांना स्वायत्तता दिली आहे. त्यांच्यात मुंबईतील तीन महाविद्यालयांसह राज्यातील एकूण पाच महाविद्यालयांचा समावेश आहे.
- यूजीसीने माटुंगा येथील आर.ए. पोदार महाविद्यालय, एम.एम. शाह महाविद्यालय आणि चर्चगेट येथील निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय या मुंबईतील तीन महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा दिला आहे.
- तसेच त्याप्रमाणे अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय आणि नागपूर येथील तिरपुडे महाविद्यालय यांनाही स्वायत्तता दिली आहे. हा स्वायत्त दर्जा पाच वर्षांसाठी असेल. त्यामुळे स्वायत्त महाविद्यालयांची संख्या मुंबईत 23 आणि राज्यांत 74 वर गेली आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक स्वायत्त महाविद्यालये असलेले देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.
- राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेने केलेल्या (नॅक) मूल्यांकनात 3.5 पेक्षा अधिक गुण मिळालेल्या महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याचे धोरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केले आहे.
- त्यानुसार राज्यातील 36 महाविद्यालयांनी स्वायत्ततेची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यापैकी काही महाविद्यालयांना यापूर्वी स्वायत्तता देण्यात आली आहे.
दिनविशेष:
- 19 फेब्रुवारी हा दिवस ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती‘ म्हणून साजरा केला जातो.
- सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ ‘निकोलस कोपर्निकस‘ यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1473 मध्ये झाला होता.
- 19 फेब्रुवारी 1630 रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज‘ यांचा जन्म झाला.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1906 रोजी झाला होता.
- सन 2003 यावर्षी तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा