19 July 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 जुलै 2018)
युरोपीयन संघाकडून गुगलला 4.3 अब्ज युरोचा दंड :
- आपल्या सर्च इंजिनची मक्तेदारी कायम रहावी यासाठी गुगलने आपल्याच अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचा बेकायदा वापर केल्याप्रकरणी युरोपीअन संघाने गुललला मोठा दणका दिला आहे. यासाठी गुललला 4.3 अब्ज युरोचा अर्थात 34,308 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
- युरोपिअन संघाच्या आरोपनुसार, गुगल सर्च इंजिनला मजबूत करण्यासाठी गुगल आपल्या अँड्रॉईड या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करीत आहे. हे युरोपिअन संघाच्या अँटी ट्रस्ट नियमांनुसार बेकायदा आहे.
- गुगललने हा प्रकार येत्या 90 दिवसांत थांबवावा अन्यथा गुगलला त्यांच्या जागतिक स्तरावरील (अल्फाबेट या मुख्यालयाच्या) रोजच्या सरासरी उत्पन्नाच्या 5 टक्के रक्कम दंड म्हणून दररोज भरावी लागेल. युरोपिअन संघाचे आयुक्त मार्ग्रेथ वेस्टेजर यांनी ही माहिती दिली.
दिवाळीमध्ये लागू होणार राज्याचा सातवा वेतन आयोग :
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असून, त्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. आयोग लागू केल्यानंतर सरकारी तिजोरीवर 21 हजार 530 कोटी रुपयांचा बोजा पडेल.
- केंद्रीय कर्मचार्यांना 1 जानेवारी 2016 पासून वेतन आयोग लागू झाला. त्यानुसार, राज्य कर्मचार्यांना लाभ दिले जातील. त्यासाठी अर्थसंकल्पात 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करताना थकबाकीची रक्कम त्यांच्या पीएफमध्ये जमा होईल, असे वित्तमंत्र्यांनी सांगितले.
- वेतन आयोगामुळे राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज झाल्याचा विरोधी पक्षाचा दावा चुकीचा आहे. मार्च 2019 अखेर राज्यावरील बोजा 4 लाख 61 हजार कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. तसेच महसूल वाढत असताना महसुली खर्च 50 टक्क्यांवरून 45 टक्क्यांवर आणण्यात सरकारला यश आल्याचे त्यांनी सांगितले.
वाहनांवर नंबर प्लेट लावणे सर्वांसाठी बंधनकारक :
- भारतातील उच्च संविधानिकपदे भुषवणारे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वाहनांवरही आता सर्वसाधारण वाहनांप्रमाणे नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिल्ली हाययकोर्टाने याबाबत आदेश दिले आहेत.
- दिल्ली हायकोर्टाने म्हटले की, भारतातील सर्वोच्च संविधानिकपदाधिकारी जसे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि लेफ्टनंट जनरल यांच्या सरकारी वाहनांचीही नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे अशा सर्व वाहनांवर रजिस्ट्रेशन क्रमांक अर्थात नंबर प्लेट लावणे गरजेचे आहे.
- तसेच यापूर्वी रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्यावतीने दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये म्हटले होते की, मंत्रालयाने संबंधित अधिकाऱ्यांच्या वाहनांची नोंदणी करण्यासाठी पत्र पाठवले आहे. त्यावर हाटकोर्टाने आता आदेश दिले की या वाहनांची नोंदणी होणे बंधनकारक आहे.
देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा :
- देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना लवकरच मोफत वाय-फाय सेवेचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे रेल्वेच्या तिजोरीवर या सेवेचा कोणताही आर्थिक भार पडणार नाही याचीही काळजी घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.
- राज्यमंत्री गोहेन यांनी देशातील सर्व रेल्वे स्टेशनांवर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. वर्ष 2016-17 मध्ये 100, 2017-18 मध्ये 200 तर 2018-19 या वर्षात 500 स्टेशनांवर वाय-फाय सुविधा पुरवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते, त्यानुसार आतापर्यंत देशातील 707 स्टेशनांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे, आणि येत्या काळात हे प्रमाण वाढतच राहिल असे त्यांनी नमूद केले.
- रेल्वेवर कोणताही आर्थिक भार येऊ न देता ही सुविधा उपलब्ध केली जात आहे. रेल-टेलने ए-वन आणि ए श्रेणीतील स्टेशनांवर वाय-फाय सुविधा पुरवण्यासाठी मेसर्स महाता इन्फॉर्मेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार केला आहे. ही कंपनी मेसर्स गुगल इन्कार्पोरेटेड कंपनीची उपकंपनी आहे. याच कंपन्या वाय-फाय सुविधेवरील खर्चाचा भार उचलणार आहेत.
जगाच्या नकाशावर आता महाराष्ट्रातील किल्ले :
- युनेस्कोशी संलग्न असलेल्या ‘आयकोफोर्ट इंडिया‘ संस्थेने राज्यातील गड-किल्ले जागतिक नकाशावर ठेवण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, 4 ऑगस्ट 2018 रोजी ‘स्ट्राँगहोल्डस ऑफ वेस्टर्न इंडिया – फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र‘ हे जर्नल (विशेषांक) प्रकाशित होत आहे.
- जर्नलमध्ये अनेक इतिहास अभ्यासक, किल्ल्यांचे लष्करी स्थापत्य अभ्यासक आणिपुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे सचित्र लेख आहेत. हे जर्नल युनेस्कोमधील सदस्य देशांना, संलग्न संस्थांना पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले किल्ले हे जागतिक नकाशावर येणार आहेत.
- युनेस्कोच्या वतीने निसर्ग आणि जैवविविधतेसाठी सह्याद्रीसह पश्चिम घाटांचा ‘जागतिक संरक्षक वारसा’मध्ये समावेश झाला आहे. याचदरम्यान राजस्थानातील पाच किल्ले हे जागतिक संरक्षित स्थळांमध्ये समाविष्ट झाले.
आगाशिवकरांकडून हिमशिखर ‘स्टोक कांगरी’ सर :
- आगाशिवनगर व कडेगाव येथील तीन गिर्यारोहकांनी ‘स्टोक कांगरी‘ हे हिमशिखर 14 तासांत यशस्वीपणे सर केले. 20 हजार 80 फूट उंच खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर त्यांनी तिरंगा फडकावला. चौदापैकी चारच गिर्यारोहकांनी ही मोहीम यशस्वी केली. त्यात या तिघांचा समावेश होता.
- कुणाल घराळ, अभिषेक पाटील (दोघेही रा. आगाशिवनगर) व शिवप्रसाद सगरे (कडेगाव) अशी या धाडसी गिर्यारोहकांची नावे आहेत.
- कुणाल, अभिषेक यांनी आगाशिव डोंगरावर गिर्यारोहण करण्याचा सराव केला. कसलेही इतर मार्गदर्शन नसताना गेल्यावर्षी प्राथमिक स्वरूपात सहज फिरण्यासाठी गेल्यावर हिमालयात 16 हजार फुटांपर्यंत यशस्वीपणे ट्रेकिंग केले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि ‘स्टोक कांगरी’ हे हिमशिखर सर करण्याचे त्यांनी ठरवले.
दिनविशेष :
- सन 1832 मध्ये सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.
- क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म 19 जुलै 1827 मध्ये झाला.
- लॉर्ड कर्झन यांनी 19 जुलै 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली होती.
- सन 1969 मध्ये भारतातील 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
- नेपाळमध्ये सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना 19 जुलै 1976 मध्ये करण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा