19 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 मार्च 2019)
Federation Cup 2019 मध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा विक्रम:
- पंजाबमध्ये सुरू असलेल्या #FedCup2019 मध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने धमाकेदार कामगिरी केली. पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात त्याने सुवर्णपदकाची कमाई केली.
- तर याचबरोबर त्याने 8 मिनिटे 28 सेकंद 94 मिलिसेकंद अशी वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम केला. या विक्रमासह त्याने स्वतःच्याच नावावर असलेला आधीच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आणि नवा विक्रम प्रस्थापित केला.
- त्याच्या या विक्रमी कामगिरीमुळे चीनमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याची पात्रता निश्चित झाली आहे. अविनाशने गेल्या वर्षी 8 मिनिटे 29 सेकंद 80 मिलीसेकंदाची वेळ नोंदवताना तब्बल 37 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला होता.
- 1981 साली गोपाळ सैनी नावाच्या धावपटूने या प्रकारातील विक्रम केला होता. हा विक्रम मोडण्यासाठी तब्बल 37 वर्षे लागली. पण अविनाशने याच प्रकारातील स्वतःचा विक्रम एका वर्षात पुन्हा मोडीत काढला.
गोव्याचे नवे मुख्यमंत्री ‘प्रमोद सावंत’:
- गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
- प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
- तसेच मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
- मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची निवड झाली आहे. रविवारचा (17 मार्च) संपूर्ण दिवस गोव्यात वेगवान राजकीय घडामोडींचा ठरला.
- भाजपाचे सहयोगी पक्ष महाराष्ट्र गोमंतक, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांबरोबर दिवसभर मुख्यमंत्रिपदासाठी काथ्याकूट सुरु होता. अखेर अपेक्षेप्रमाणे सावंत यांच्या नावावर एकमत झाले.
जागतिक स्पर्धेसाठी गोपी थोनाकल पात्र:
- आशियाई मॅरेथॉन स्पर्धेचा विजेता गोपी थोनाकल याने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दोहा येथे रंगणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान पटकावला आहे. रविवारी झालेल्या सोल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये गोपीने 11वा क्रमांक प्राप्त केला.
- भारताचा अव्वल धावपटू गोपी याने 2 तास 13 मिनिटे 39 सेकंद अशी आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना जागतिक स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी 2 तास 16 मिनिटे हा निकष ठेवण्यात आला होता.
- सोल मॅरेथॉन ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन महासंघाची (आयएएएफ) सुवर्ण दर्जा लाभलेली मॅरेथॉन आहे. गोपीने 2017मध्ये चीन येथील डोनगुआन येथे झालेल्या आशियाई मॅरेथॉन शर्यतीचे जेतेपद पटकावले होते. त्याचबरोबर 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने २५वा क्रमांक प्राप्त केला होता.
- तसेच त्यानंतर लंडन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गोपीने 28व्या क्रमांकावर झेप घेतली होती. आता जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा गोपी हा भारताचा दुसरा धावपटू ठरला आहे.
- चार दशकांपूर्वी शिवनाथ सिंग यांनी 2 तास 12 मिनिटे ही वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रमासह जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याचा मान पटकावला होता.
SBIच्या एटीएममधून काढता येणार FDतले पैसे:
- बँकांत मुदत ठेवी (FD)मध्ये पैसे गुंतवणं हे सर्वाधिक सुरक्षित आणि सोयीस्कर मानलं गेलं आहे. त्यामुळेच बरेच लोक एफडीमध्ये पैशांची गुंतवणूक करतात.
- परंतु या धकाधकीच्या जीवनात बँकांमध्ये जाऊन एफडी करणं आणि त्या पुन्हा मोडून पैसे काढणं फारच वेळखाऊ काम आहे. या समस्येचं समाधान देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली एबीआय घेऊन आली आहे.
- SBI मल्टी ऑप्शन डिपॉजिट (MOD)च्या नावे एक FDची सुविधा देते. यात आपल्याला गरज असेल तेव्हा 1000हून अधिकची रक्कम काढता येणार आहे.
- विशेष म्हणजे ही रक्कम एटीएमच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. पण SBI मल्टी ऑप्शन डिपॉजिट (MOD)मध्ये किमान मासिक ठरावीक पैसे असणे बंधनकारक आहे.
1 एप्रिलपासून स्मार्ट होणार आपले वीज मीटर:
- 1 एप्रिलपासून अनेक गोष्टींमध्ये अनेक छोटे-मोठे बदल होणार आहेत. या बदलांसंदर्भात आपणही सजग राहिले पाहिजे. भारतात वीजचोरी मोठ्या प्रमाणात होते, ही वीजचोरी रोखण्यासाठीही अनेक उपाय योजण्यात आले.
- परंतु त्यात अद्याप यश आलेलं नाही. वीजचोरी रोखण्यासाठी आता केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं प्रभावी उपाय आणला आहे. त्याच पार्श्वभूमीवर विजेची चोरी रोखण्यासाठी 1 एप्रिलपासून प्रत्येक घरात प्रीपेड मीटर लावणे गरजेचे होणार आहे.
- केंद्र सरकारने 2022 पर्यंतची मुदत दिली असून, पुढील तीन वर्षांत ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’नेच वीजपुरवठा करणे सक्तीचे होणार आहे.
- मोबाइलच्या प्रीपेड सिमकार्डसारखेच विजेचे प्रीपेड मीटर असेल. त्यात शिल्लक रक्कम असेपर्यंत वीज वापरता येईल. ती संपताच वीजपुरवठा बंद होईल आणि कार्ड रीचार्ज करताच तो सुरू होईल. मागेल त्याला वीज योजनेखाली वर्षभरात 2.26 कोटी नव्या ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या.
- ग्राहकांची संख्या दररोज वाढत आहे. मीटर तपासून, त्यानुसार बिले पाठविणे व वसुली करणे आता वीज कंपन्यांना अवघड होत आहे.
- बिले विलंबाने गेल्याने वसुलीही वेळेत करता येत नाही. त्यामुळे वीज कंपन्यांचा तोटाही वाढत आहे. त्यातून चुकीची व प्रचंड बिले आल्याच्या तक्रारी येतात. स्मार्ट मीटरमुळे मोठ्या प्रमाणात वीजचोरी रोखणं शक्य होणार आहे.
उत्तेजकांविरोधात ‘बीसीसीआय’चा पुढाकार:
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 18 मार्च रोजी उत्तेजकांविरोधात कडक कारवाई करण्याच्या उद्देशाने ठोस पावले उचलली आहेत. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेसोबत (नाडा) सहा महिने काम करून बीसीसीआय यापूर्वी जागतिक उत्तेजक विरोधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करण्याच्या चूकीवर पडदा घालणार आहे.
- बीसीसीआयचे अधिकारी आणि प्रशासकीय समितीचे सदस्य यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला.
- ‘आयसीसी, बीसीसीआय व ‘नाडा’ पुढील सहा महिने उत्तेजक प्रतिबंधकांविरोधात एकत्रितपणे काम करणार असून यामध्ये नोंदणी केलेल्या खेळाडूंना ‘नाडा’च्या उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेत चाचणीसाठी नेण्यात येईल,’ असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगितले.
- दरम्यान, ‘नाडा’चे संचालक नवीन अगरवाल यांनी यासंदर्भात आपल्याला काहीही सूचित केले नसल्याचे म्हटले आहे. ‘मला उत्तेजक प्रतिबंधक चाचणीसंदर्भात बीसीसीआयकडून लेखी स्वरूपात अधिकृतपणे सूचना आल्याशिवाय मी यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही,’ असे अगरवाल म्हणाले.
दिनविशेष:
- 19 मार्च सन 1674 रोजी शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे निधन झाले.
- लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र सन 1848 मध्ये मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
- मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचा जन्म 19 मार्च 1900 मध्ये झाला होता.
- सन 1931 मध्ये अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.
- 1932 यावर्षी सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा