19 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 नोव्हेंबर 2018)
मराठा समाजाला ‘एसईबीसी’ प्रवर्गात आरक्षण मिळणार:
- मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक मागास प्रवर्ग (एसइबीसी) म्हणून स्वतंत्रपणे आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा पत्रपरिषदेत केली.
- मराठा समाजाला नेमके कसे आरक्षण देणार, ओबीसींतर्गतच आरक्षण देणार का, या व अशा शंकाकुशंका दूर करीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिले जाईल.
- मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य मागास वर्ग आयोगाने दिलेला अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला आहे. आता आरक्षणाचे नेमके स्वरूप कसे असेल (ते किती टक्के असेल आदी), हे मंत्रिमंडळाची उपसमिती निश्चित करेल. आयोगाचा अहवाल याच अधिवेशनात मांडला जाईल.
- मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची शिफारस मागास वर्ग आयोगाने केलेली नाही. या समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात असाधारण व अपवादात्मक परिस्थिती आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर असे आरक्षण देता येणार आहे. आम्ही त्याच दृष्टीने पावले उचलत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार चालू विधिमंडळ अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा करणार आहे.
- धनगर समाजासाठी करणार शिफारस धनगर समाजाला व्हीजेएनटीमध्ये 3.50 टक्के आरक्षण आजही आहे, पण ते त्या समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये हवे आहे. ही बाब केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. केंद्राने तसा निर्णय घ्यावा, यासाठीची शिफारस राज्य सरकार लवकरच करेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
चीनकडून कर्ज घेणाऱ्या देशांना अमेरिकेचा इशारा:
- सध्या अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरु असून अमेरिकेने चीनच्या वन बेल्ट, वन रोड प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. पापुआ न्यू गिनी येथे सुरु असलेल्या आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य परिषदेमध्ये दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचे पडसाद उमटले.
- 17 नोव्हेंबर रोजी या आर्थिक सहकार्य परिषदेमध्ये बोलताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुल्क आकारणी आणि पुरवठा साखळीत अडथळा आणणे यामध्ये दूरदर्शितेचा अभाव दिसतो. हे निर्णय यशस्वी होणार नाहीत असे म्हणाले.
- जागतिक व्यापार संघटना अधिक भक्कम झाली पाहिजे हे सांगतानाच त्यांनी आपल्या वन बेल्ट, वन रोड प्रकल्पाचे समर्थन केले. काही देशांनी हा सापळा आहे असे चित्र रंगवले आहे पण ते चुकीचे आहे असे जिनपिंग म्हणाले.
- तर त्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांचे भाषण झाले. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशांना आर्थिक आणि राजनैतिक संबंधांसाठी चीनपेक्षा अमेरिका जास्त चांगला पर्याय आहे असे ते म्हणाले.
वर्ल्ड ज्युनियर बॅटमिटन स्पर्धेत लक्ष्य सेनला कांस्यपदक:
- भारताचा आघाडीची ज्युनिअर बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला कॅनडात सुरु असलेल्या World Junior Badminton Championship स्पर्धेत अखेर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले उपांत्य फेरीत लक्ष्यला जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या कुनलावत वितीद्सरनकडून पराभव पत्करावा लागला. 1 तास 11 मिनीटे चाललेल्या या सामन्यात कुनलावतने 20-22, 21-16, 21-13 अशा 3 गेममध्ये बाजी मारली.
- 17 वर्षीय लक्ष्य सेनने याआधी आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धेत कुनलावतचा पराभव केला होता. मात्र त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे लक्ष्यला जमले नाही. 2011 साली भारताच्या समीर वर्माने या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होटे, यानंतर तब्बल 7 वर्षांनी भारतीय खेळाडूला या मानाच्या स्पर्धेत पदक मिळवणे शक्य झाले आहे.
ट्रायम्फ क्षेपणास्त्र प्रणालीमुळे भारताला संरक्षण:
- एस-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली रशियाकडून खरेदी करण्यात येत असून त्यामुळे भारताला शेजारी देशांच्या प्रादेशिक आकांक्षांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण मिळणार आहे.
- एस-400 प्रणाली ही 400 किलोमीटर क्षेत्रातील हवाई लक्ष्यांना नष्ट करू शकते, असे एअर मार्शल आर. नंबियार यांनी सांगितले.
- पुढील टप्प्यातील ही प्रणाली अतिशय प्रगत असून ती वेगवेगळ्या ठिकाणी हलवता येऊ शकते, असे सांगून ते म्हणाले,की येत्या 23 महिन्यात ही प्रणाली भारताला मिळणार आहे. नंबियार यांनी या क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदी प्रक्रियेत रशियाला भेट दिली होती.
- अमेरिकेच्या र्निबधांना न जुमानता भारताने 5 ऑक्टोबर रोजी हा करार केला होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीवेळी झालेल्या या करारनुसार भारताला 5 अब्ज डॉलर्स किमतीत एस 400 प्रणालीतील पाच संच मिळणार आहेत. भारताच्या शेजारी देशांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे सीमांचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे.
- चीननेही रशियाकडून हीच क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेतली आहे. भारतही प्रोग्रॅम एडी ही स्वदेशी संरक्षण प्रणाली तयार करत आहे. राफेल विमाने ही चीनच्या चौथ्या व पाचव्या पिढीतील चेंगडू जे 20 स्टील्थ बहुउपयोगी विमानांपेक्षा जास्त चांगली आहेत. राफेल विमानांचे उड्डाण आपण स्वत: करून बघितले आहे, असे ही नंबियार म्हणाले.
दिनविशेष:
- 19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन, आंतरराष्ट्रीय पुरूष दिन तसेच महिला उद्योजकता दिन म्हणून मानला जातो.
- आधुनिक स्टेथॅस्कोपचे जनक ‘लिओपोल्ड अॅव्हेल ग्रुबर‘ यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1722 मध्ये झाला होता.
- झाशीच्या राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ ‘राणी लक्ष्मीबाई‘ यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 मध्ये झाला होता.
- ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक ‘केशव चंद्र सेन‘ यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1838 मध्ये झाला होता.
- भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ‘इंदिरा गांधी‘ यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 मध्ये झाला होता.
- मुष्टीयोद्धा आणि अभिनेता ‘दारा सिंग‘ यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1928 मध्ये झाला होता.
- सन 1960 मध्ये 19 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा