19 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 ऑक्टोबर 2018)
अरुंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्ट्रिजच्या संचालकपदी:
- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने भट्टाचार्य यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली. भट्टाचार्य यांचे पद हे स्वतंत्र संचालक म्हणून असणार आहे.
- भट्टाचार्य यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी असणार असून भागधारकांनी मान्यता दिल्यानंतर 17 ऑक्टोबर 2018 पासून त्यांचा कार्यकाळ सुरु झाला आहे.
- अरुंधती भट्टाचार्य यांना फायनान्शिअल क्षेत्रात सुमारे 40 वर्षांच्या कामाचा अनुभव आहे. त्या एसबीआयच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. गेल्याच आठवड्यात क्रिस कॅपीटल या इक्वीटी फर्मने भट्टाचार्या यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.
युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत आकाशला रौप्यपदक:
- युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये अवघ्या 15 वर्षांच्या आकाश मलिकने तिरंदाजीत रौप्यपदक पटकावले. सामान्य शेतकरी कुटुंबातील या मुलाने केलेली कामगिरी ही भारताची युवा ऑलिम्पिकमधील आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे.
- अमेरिकेच्या ट्रेंटन कॉवेल्ससमवेत झालेल्या अंतिम सामन्यात आकाशला 0-6 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आकाश आणि ट्रेंटनने या तीन सेटमध्ये 10 गुणांचे समान चार नेम साधले.
- मात्र त्यानंतर आकाशचा नेम दोन वेळा पूर्णपणे चुकला. त्या दोन प्रयत्नात त्याला केवळ सहा गुणच मिळू शकल्याने त्याच्या हातून सामना निसटला. पण सामना गमावला असला तरी तोपर्यंत आकाशने रौप्यपदकावर ठसा उमटवला होता.
- आकाशच्या या रौप्यपदकाने भारताची पदकसंख्या तीन सुवर्ण, नऊ रौप्य आणि एका कांस्यपदकासह 13 पर्यंत पोहोचली आहे. यापूर्वी 2014च्या युवा ऑलिम्पिकमध्ये अतुल वर्माने तिरंदाजीमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते.
आधार कार्ड विषयी सरकारचे स्पष्टीकरण:
- आधार कार्डच्या आधारे देण्यात आलेले मोबाईल क्रमांक बंद करण्यात येणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले.
- भारतातील निम्मे मोबाईल फोन अर्थात 50 कोटी मोबाईल फोन क्रमांक बंद होणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. हे वृत्त खोटे असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- 50 कोटी मोबाईल क्रमांक बंद होणार असल्याच्या माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या या खोट्या आणि तार्किक आहेत. सुप्रीम कोर्टाने आधारबाबत दिलेल्या आदेशात असे कुठेही म्हटलेले नाही की, आधार केवायसीव्दारे देण्यात आलेले मोबाईल क्रमांक बंद करावेत. त्यामुळे लोकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्याचे कारण नाही. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) आणि केंद्र सरकारच्या दूरसंचार विभाग (डॉट) यांनी संयुक्त निवेदनाव्दारे हे स्पष्ट केले आहे.
- मात्र, आधारबाबत निश्चित कायदा नसल्याने सुप्रीम कोर्टाने नवे सीमकार्ड हे आधार केवायसीवर देण्यात येऊ नयेत असे म्हटले असले तरी जुन्या मोबाईलचे कनेक्शन बंद करण्याबाबत कोर्टाने काहीही म्हटलेले नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
श्रीलंकेचे पंतप्रधान भारत दौर्यावर:
- श्रीलंकेचे पंतप्रधान राणील विक्रमसिंघे 18 ऑक्टोबरपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. संध्याकाळी ते राजधानी दिल्लीमध्ये पोहोचले. माध्यमांमध्ये आलेल्या वादग्रस्त विधानादरम्यान विक्रमसिंघे यांचा हा दौरा होत आहे.
- श्रीलंकेचे राष्ट्रपती मत्रिपाल सिरीसेना यांनी भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ वर श्रीलंकन पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता, असे वृत्त माध्यमांमध्ये आले होटे. मात्र, श्रीलंका सरकारच्या अधिकृत सुत्रांकडून हे चुकीचे वृत्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
- तसेच या घडामोडींमुळे विक्रमसिंघे यांच्या या दौऱ्याला वेगळे महत्त्व आहे. दुसरीकडे, ‘रॉ’ वर आपण आरोप केलेले नाहीत. हा खोडसाळपणाचा आणि चुकीचा प्रकार असल्याचे स्वत: सिरीसेना यांनी पंतप्रधान मोदींना फोन करुन सांगितले आहे.
रेरा नोंदणी शुल्कात कपात होणार:
- नव्या तसेच प्रगतिपथावर असलेल्या गृहप्रकल्पांची महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे (महारेरा) नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेले किमान 50 हजार रुपये शुल्क दहा हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात येणार आहे. यामुळे कमी आकाराच्या प्रकल्पांची नोंदणी करणाऱ्या विकासकांना फायदा होऊन मोठय़ा प्रमाणात प्रकल्पांची नोंदणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
- रिअल इस्टेट कायद्यानुसार स्थापन झालेल्या महारेराकडे राज्यातील प्रत्येक गृहप्रकल्पाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी महारेराकडून प्रति चौरस मीटर दहा रुपये शुल्क आकारले जाते. किमान 50 हजार रुपये तर कमाल दहा लाख रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते.
- पाच हजार चौरस मीटरपेक्षा कमी प्रकल्पाच्या विकासकांनाही त्यासाठी किमान 50 हजार रुपये शुल्क द्यावे लागत होते. ते दहा हजार करावे, अशी मागणी महारेराकडूनच आल्यानंतर आता गृहनिर्माण विभागाने तसा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावामुळे अनेक छोटय़ा गृहप्रकल्पांना फायदा होऊ शकेल, असे गृहनिर्माण विभागातील सूत्रांनी सांगितले.
दिनविशेष:
- तार्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी 1983 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय-अमेरिकन खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1910 रोजी झाला.
- जर्मनी सन 1933 मध्ये लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.
- भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान सन 1970मध्ये हवाईदलाकडे सुपुर्द.
- पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सन 1993 मध्ये सर सी.व्ही. रामन पदक जाहीर.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
View Comments
👍