2 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
2 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 सप्टेंबर 2018)
टपाल जाळ्याद्वारे वित्तीय सेवा :
- देशातील टपाल जाळ्याला बळकटी देणाऱ्या आणि या टपाल जाळ्याचा वापर करून सर्वसामान्यांच्या दारात वित्तीय सेवा पोहोचवत बचतीला चालना देणाऱ्या ‘इंडियन पोस्ट पेमेन्टस् बँके’चे (आयपीपीबी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. विशेष म्हणजे या बँकेची स्थापना 17 ऑगस्ट 2016 रोजीच झाली होती.
- तर 30 जानेवारी 2017 रोजी प्रायोगिक तत्त्वावर या बँकेच्या रायपूर आणि रांची येथील दोन शाखांचे उद्घाटनही झाले होते. त्यामुळे याआधीच प्रत्यक्षात आलेली ही योजना आता देशाच्या सर्व जिल्ह्य़ात पंतप्रधानांच्या हस्ते कार्यान्वित झाली आहे.
- तसेच टपाल कार्यालयांचे जाळे आणि जवळपास तीन लाख पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवकांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या दारात बँकिंग सेवा त्याद्वारे पोहोचविण्यात येणार आहे. अर्थात दारपोच सेवेसाठी शुल्क आकारले जाईल आणि जीएसटीही आकारला जाईल, असे या बँकेच्या संकेतस्थळावर नमूद आहे.
- आयपीपीबी ही अन्य कोणत्याही बँकेप्रमाणेच आहे, मात्र या बँकेची कार्यकक्षा छोटय़ा प्रमाणावरील आणि कोणतीही पतजोखीम नसलेली आहे. या बँकेत अनामत ठेवी स्वीकारण्यात येणार आहेत, मात्र ही बँक अग्रिम कर्ज अथवा क्रेडिट कार्ड देणार नाही.
- तर दळणवळणमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले की, 650 शाखा आणि 3250 संपर्ककेंद्रांद्वारे आयपीपीबीची सेवा देशभर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोणत्याही खात्यामध्ये एक लाख रुपयांहून अधिक रक्कम भरल्यास त्याचे
आपोआप टपाल कार्यालय बचत खात्यामध्ये रूपांतर होणार आहे, असे सिन्हा म्हणाले. त्यासाठी टपाल बचत बँकांमधील (पीएसबी) तब्बल 17 कोटी खाती संलग्न करण्याची परवानगीही या नव्या बँकेला देण्यात आली आहे. - आणि विमा यासाठी आयपीपीबी पीएनबी, बजाज अलिअन्स लाइफ इन्शुरन्स फॉर थर्ड पार्टीसारख्या आर्थिक सेवांशी जोडण्यात येणार आहे.
- तर या बँकेचा मोबाइल अॅपही उपलब्ध राहील. एकदा ‘केवायसी’ म्हणजे ग्राहकाने आपली ओळख निश्चितीकरणाची प्रक्रिया पार पाडली की हा अॅप त्याला पूर्णपणे कार्यान्वित करता येईल.
टपाल बँकेची वैशिष्टय़े:
- आयपीपीबी 100 टक्के सरकारी आणि टपाल खात्याच्या अखत्यारित स्थापन.
- एअरटेल आणि पेटीएमनंतर ‘पेमेन्ट बँक’ म्हणून परवाना लाभलेली तिसरी सेवा.
- तब्बल 100 हून अधिक देयकांचा भरणा आणि आर्थिक व्यवहार पार पाडण्याची सोय.
- बचत आणि चालू खात्यांची सेवा उपलब्ध.
- निधी हस्तांतरण, लाभार्थी अनुदान हस्तांतरण, गॅस, दूरध्वनी, वीज आदी देयकांचा भरणा, सेवामूल्यांचा भरणा,एटीएम आणि डेबिट कार्ड, नेटबँकिंग आदी सेवा उपलब्ध.
- खाते उघडण्यासाठी आधारचा वापर, तर वैधता, व्यवहार आणि पैसे भरण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणेचा वापर.
- खात्यात किमान ठेवीची अट नाही.
- कमाल ठेवीची मर्यादा एक लाख रुपयांपर्यंतच.
- त्यापुढील ठेवी या थेट टपाल कार्यालय बचत खात्यांत जमा होणार.
- बचत खात्यावर चार टक्के व्याजदर.
- मायक्रो एटीएम, मोबाइल बँकिंग अॅप, संदेश आदींद्वारे सेवा.
न्या. रंजन गोगोई होणार भारताचे नवे सरन्यायाधीश :
- भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची शिफारस सध्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
- तर ‘एएनआय’ने सूत्रांमार्फत या संबंधी माहिती दिली असून 3 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश म्हणून गोगोई शपथ घेण्याची शक्यता आहे.
- तसेच या पदावर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींना संधी देण्याची परंपरा आहे. यात न्या. गोगोई यांचे नाव सर्वात आघाडीवर असून त्यांच्याच नावाची सरन्यायाधीशांनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिफारस केल्याचे सूत्रांनी नमूद केले आहे.
- न्या. गोगोई हे 28 फेब्रुवारी 2001 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. त्यानंतर 12 फेब्रुवारी 2011 रोजी ते पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तर एप्रिल 2012 पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत.
- न्या. गोगोई हे आसाममधील असून सध्या त्यांच्यावर एनसीआर (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन) अपडेट करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे, त्या प्रक्रीयेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):
भारतीय महिला स्क्वॉशपटूंना रौप्यपदक :
- इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये भारतीय महिलांना अखेर रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. उपांत्य फेरीत मलेशियावर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर भारतीय महिलांकडून पदकाची आशा केली
जात होती. मात्र हाँग काँग विरुद्ध खेळताना भारतीय महिलांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हाँग काँगने 2-1 च्या फरकाने सामना जिंकत सुवर्णपदक कमावलं. - भारतीय संघातील जोश्ना चिनप्पा, दिपीका पल्लीकल, सुनयना कुरुविल्ला आणि तन्वी खन्ना जोडीने अंतिम फेरीत प्रयत्नांची पराकाष्टा केली, मात्र हाँग काँगवर मात करणं त्यांना जमलं नाही.
- तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी भारतीय पुरुषांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं.
Bridge क्रीडा प्रकारात भारतीय जोडीला सुवर्णपदक :
- इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे.
- Bridge क्रीडा प्रकारात भारताची पुरुष जोडी प्रणब बर्धन आणि शिबनाथ डे यांनी सुवर्णपदकाची कमाई केली.
या स्पर्धेतलं भारताचं हे 15 वं सुवर्णपदक ठरलं आहे. - भारतीय जोडीने अंतिम फेरीपर्यंत 384 गुणांसह आपलं अव्वल स्थान कायम राखलं.चीनच्या लिक्सीन यँग आणि चेन वोन जोडीला रौप्य तर इंडोनेशियाच्या जोडीने कांस्यपदकाची कमाई केली.
बॉक्सर अमित पांघलचा गोल्डन पंच:
- इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या अखेरच्या दिवशी भारताने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
49 किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर अमित पांघलने अंतिम फेरीत उझबेगिस्तानच्या हसनबॉय दुस्तमतॉवचा पराभव करुन सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. - अखेरच्या दिवसात अमितने भारतासाठी मिळवलेलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. याचसोबत यंदाच्या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा अमित एकमेव बॉक्सर ठरला आहे.
- तसेच जागतिक क्रमवारी आणि अनुभवामध्ये हसनबॉय हा अमितपेक्षा कित्येकपटीने उजवा खेळाडू होता, मात्र अमितने अंतिम सामन्यात हसनबॉयला आश्चर्यचकीत करुन टाकलं. पहिल्या डावात हसनबॉय अमितवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अमितने सुरक्षित अंतर राखत बचाव करण्याचा प्रयत्न केला. यामुळे हसनबॉयला गुण कमावता आले नाहीत. मात्र मधल्या वेळेत अमित संधी साधत हसनबॉय चांगले प्रहार केले. दुसऱ्या डावात अमितच्या आक्रमक खेळामुळे हसनबॉय थोडासा दडपणाखाली आलेला पहायला मिळाला.
दिनविशेष :
- 2 सप्टेंबर 1916 मध्ये पटणा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन 2 सप्टेंबर 1920 मध्ये झाले.
- व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून 2 सप्टेंबर 1945 मध्ये स्वतंत्र झाला.
- 2 सप्टेंबर 1946 मध्ये भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
- केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक 2 सप्टेंबर 1960 मध्ये झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा