20 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (20 सप्टेंबर 2018)
एशिया कप स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा पराभव:
- भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवने रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी निर्णायक घाव घालत 19 सप्टेंबर रोजी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. भारताने आठ गडी राखून विजय मिळवत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केले.
- भारताविरुद्ध सामना जिंकून चॅम्पियन बनायला निघालेल्या पाकिस्तानी फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करतानाच शरणागती पत्करली. त्यांचा डाव 43.1 षटकांतच 162 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताने 29 षटकांतच आव्हानाला गवसणी घालताना 2 बाद 164 धावा केल्या.
- तसेच त्यात रोहित शर्माचे अर्धशतक आणि शिखर धवन (46), अंबाती रायुडू (नाबाद 31), दिनेश कार्तिक (नाबाद 31) यांची उपयुक्त फलंदाजी भारताच्या विजयात निर्णायक ठरली.
भारताच्या सजन भनवालला रौप्यपदक:
- स्लोवाकियात सुरु असलेल्या World Junior Wrestling स्पर्धेत भारताच्या सजन भनवालने रौप्यपदकाची कमाई केली आहे. 77 किलो ग्रेको रोमन प्रकारात रशियाच्या इस्लाम ओपिव्हने सजनवर मात करुन सुवर्णपदकाची कमाई केली.
- या स्पर्धेत मिळवलेल्या रौप्यपदकासह सजन Junior Wrestling मध्ये लागोपाठ पदक मिळवणारा पहिला भारतीय पैलवान ठरला आहे. 2017 साली झालेल्या स्पर्धेत सजनने कांस्यपदकाची कमाई केली होती.
- तसेच या सामन्यात रशियाचा इस्लाम ओपिव्हने सजन भनवालवर चांगलेच वर्चस्व गाजवले. पहिल्या 90 सेकंदांमध्ये ओपिव्हने धडाकेबाज खेळी करुन सजनला मॅटच्या बाहेर फेकले. यानंतर संपूर्ण सामन्यात ओपिव्हने आपले वर्चस्व राखत 8-0 च्या फरकाने बाजी मारली. सजन व्यतिरीक्त 55 किलो ग्रेको रोमन प्रकारात भारताच्या विजयनेही कांस्यपदकाची कमाई केली.
भारत-पाक शांती चर्चेसाठी इम्रान खान यांचे पंतप्रधान मोदींना पत्र:
- भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधली शांती चर्चा पुन्हा सुरू व्हावी यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्याचे समजते आहे.
- भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यात बैठक व्हावी यासाठी इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांकडे शब्द टाकल्याचेही वृत्त आहे.
- न्यूयॉर्कमध्ये पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण बैठक होणार आहे. या बैठकीत सुषमा स्वराज यांनी कुरैशी यांचीही भेट घ्यावी यासाठी इम्रान खान आग्रही असल्याचे समजते आहे.
- गेल्या काही दिवसांपासून संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री एकमेकांना भेटणार नाहीत अशी चर्चा सुरु होती. याबद्दल विविध चर्चा होत होत्या. मात्र इम्रान खान यांच्या पत्रामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांती प्रस्ताव सुरू करण्याच्या दृष्टीने टाकण्यात आलेले हे पहिले पाऊल आहे अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांती चर्चा डिसेंबर 2015 मध्ये सुरु झाली होती. मात्र पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ही चर्चा स्थगित करण्यात आली. आता इम्रान खान यांनी ही चर्चा पुन्हा सुरु व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.
लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांची राष्ट्रीय पातळीवर नोंद:
- देशभरातील लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांवर यापुढे करडी नजर राहणार आहे. 20 सप्टेंबरपासून लैंगिक गुन्हेगारांची राष्ट्रीय पातळीवर नोंद ठेवली जाणार असून, त्यांची अशा प्रकारे सविस्तर नोंद ठेवणारा भारत जगातील नववा देश ठरणार आहे.
- देशातील ‘नॅशनल रजिस्ट्री ऑफ सेक्शुअल ऑफेंडर्स‘मध्ये दोषी ठरलेल्या लैंगिक गुन्हेगारांची नावे, छायाचित्रे, निवासी पत्ता, बोटांचे ठसे, डीएनए नमुने, तसेच पॅन व आधार क्रमांक यांचा समावेश राहील.
- या माहितीत (डेटाबेस) पहिल्यांदाच गुन्हा करणाऱ्या आणि सराईत गुन्हेगार मिळून सुमारे साडेचार लाख गुन्हेगारांची माहिती राहील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी मिळाली आहे.
- ही माहिती देशभरातील तुरुंगांमधून मिळवलेल्या तपशिलावर आधारित राहील. या गुन्हेगारांमुळे समाजाला गंभीर धोका आहे काय, हे निश्चित करण्यासाठी त्यांच्या गुन्हेगारी इतिहासाच्या आधारे त्यांची वर्गवारी करण्यात येईल.
- गृहमंत्रालयांतर्गत येणारा नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरो (एनसीआरबी) हा डेटाबेस ठेवणार असून; तपास आणि कर्मचाऱ्यांची पडताळणी यांसह विविध कारणांसाठी ही माहिती कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना उपलब्ध करून दिली जाईल. केवळ भारतातील अशा संस्थांनाच ती उपलब्ध असेल.
मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझ्झाक यांना अटक:
- मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझ्झाक यांना कोटय़वधी डॉलर्सच्या भ्रष्टाचार प्रकरणी तेथील भ्रष्टाचार विरोधी संस्थेने अटक केली आहे. आता त्यांच्यावर न्यायालयात आरोपपत्र ठेवण्यात येणार आहेत.
- भ्रष्टाचार विरोधी संस्थेने सांगितले, की नजीब यांना त्यांच्या कार्यालयातच अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
- विश्वासघात, भ्रष्टाचार, काळा पैसा जमवून तो पांढरा करणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. देशाच्या विकास निधीचा त्यांनी अपहार केला असून आपण दोषी नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
- एसआरसी इंटरनॅशनलच्या खात्यातून त्यांनी 42 दशलक्ष रिंगिट म्हणजे 10.3 दशलक्ष डॉलर्स स्वत:च्या खात्यावर जमा करून घेतले होते. नजीब व त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा प्रकारे निधीची लूट केली होती.
- नजीब यांनी 2009 मध्ये सत्तेवर आल्यानंतर विकास निधी स्थापन केला होता. त्यानंतर अमेरिकेतही या घोटाळय़ाची चौकशी झाली, कारण यातील काही पैशाची गुंतवणूक तेथे झाली होती.
- नजीब यांनी त्यांच्या सरकारमधील टीकाकारांना काढून टाकले होते. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करून चौकशीला लगाम घातला होता. भ्रष्टाचारामुळे त्यांच्या विरोधात संतापाची लाट होती. त्यामुळे 9 मे रोजी नजीब यांच्या सत्ताधारी आघाडीला पराभवास सामोरे जावे लागले.
वरुण, अनुष्का ‘स्कील इंडिया’ या मोहिमेचे दूत:
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या ‘स्कील इंडिया‘ या मोहिमेचे दूत म्हणून अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’कडून (पीआयबी) देण्यात आली.
- ‘सुई-धागा: मेड इन इंडिया‘ या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांची प्रमुख भूमिका आहे. देशातील प्रगतीवर आधारित हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात भारतातील कुशल आणि प्रभावशाली कारागीरांचे तसेच तळागाळातील कुशल कामगारांचे चित्र रेखाटण्यात आले आहे.
- तसेच याशिवाय या कारागीरांसमोरील प्रश्न आणि समस्या मांडण्यात आल्या आहेत. या समस्यांना हे कारागीर कशाप्रकारे सामोरे जातात, हे दाखविण्यात आले आहे.
- या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर वरूण धवन आणि अनुष्का शर्मा हे दोघेही ‘स्कील इंडिया’साठी काम करणार आहेत. या योजनेंतर्गत देशातील विविध भागातील कुशल कारागीर यांच्यासाठी वेळ देणार आहेत.
दिनविशेष:
- सन 1857 मध्ये (1857चा राष्ट्रीय उठाव) ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.
- भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म 20 सप्टेंबर 1911 मध्ये झाला.
- चरीत्र वाङ्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म 20 सप्टेंबर 1922 मध्ये झाला.
- 20 सप्टेंबर 1933 हा दिवस विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक अॅनी बेझंट यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा