21 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (21 ऑगस्ट 2018)
‘गगनयान’ मोहिमेची धुरा महिला वैज्ञानिक सांभाळणार:
- अंतराळवीरासह अवकाशात उपग्रह पाठविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी केली. आता या मोहिमेची जबाबदारी एका महिलेच्या हाती सुपूर्द करण्यात येणार असून इस्रोच्या या प्रकल्पाचे नेतृत्व डॉ. व्ही.आर. ललिथंबिका या कंट्रोल रॉकेट इंजिनीयर करणार आहेत. त्या गेल्या 30 वर्षांपासून इस्रोमध्ये काम करीत आहेत.
- गगनयान मोहिमेपूर्वी जीएसएलव्ही-3च्या आधारे दोन मानवरहित मोहिमा हाती घेण्यात येणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.
- गगनयान मोहिमेसाठी डॉ. ललिथंबिका त्यांच्यासोबत काम करणाऱ्या चमूची लवकरच निवड करणार असून कामाची आखणीही करणार आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत पहिला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
- गगनयान मोहिमेअंतर्गत पाठविण्यात येणार अवकाशयान चार ते पाच टन वजनाचे असेल, या प्रकल्पासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, या प्रकल्पामध्ये विविध संघटना, तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील मंडळी सहभागी असतील.
- या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती होणार असल्याचेही बोलले जात आहे. ही मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे.
बजरंग आणि विनेश फोगाट आशियाई स्पर्धेत सुवर्णविजेता:
- इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या 18व्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटला हरयाणा सरकारने 3 कोटी रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.
- तसेच यासोबत ट्रॅप नेमबाजीत रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या लक्ष्य शेरॉनलाही इनामाची घोषणा करण्यात आली आहे. लक्ष्यला 1.5 कोटींचे इनाम घोषित करण्यात आलेले आहे. हरयाणा सरकारचे क्रीडामंत्री अनिल विज यांनी ही माहिती दिली आहे.
- विनेश फोगाटने अंतिम फेरीत जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर 6-2 ने मात करत सुवर्णपदकाची कमाई केली. या कामगिरीसोबत विनेश आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
- तर लक्ष्य शेरॉननेही पदार्पणातचे रौप्य पदकाची कमाई करण्याचा पराक्रम केला आहे. पहिल्या दिवशी बजरंगने जपानी प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत सुवर्णपदक पटकावले होते.
स्वदेशी हेलिना क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी:
- भारताने 19 ऑगस्ट रोजी राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये हेलिकॉप्टरवरून डागता येणाऱ्या रणगाडाविरोधी हेलिना या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
- हेलिना हे संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र असून त्यामुळे भारताची संरक्षण क्षमता अनेक पटींने वाढणार आहे. जैसलमेरच्या चंदन रेंजवर घेण्यात आलेली गाइडेड बॉम्बची चाचणीही यशस्वी ठरली आहे.
- चीन आणि पाकिस्तान यांच्याविरोधात ही दोन्ही शस्त्रे मोक्याच्या क्षणी महत्त्वपूर्ण ठरू शकतात, हेलिना क्षेपणास्त्राने अत्यंत अचूकतेने आपले लक्ष्य भेदली.
- टेलिमेण्ट्री स्टेशनपासून या क्षेपणास्त्राच्या संपूर्ण प्रवासावर लक्ष ठेवण्यात आले होते. सध्या जगातील हे सर्वात अत्याधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे.
- डीआरडीओ आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या चाचणीच्या वेळी हजर होते. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन्ही यशस्वी चाचण्यांबद्दल डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. यामुळे भारतीय सैन्यदलाची ताकद मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे.
हृदयविकाराच्या निदानासाठी सोपी पद्धत विकसित:
- रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याच्या लक्षणांचे त्वरेने निदान करता येणे शक्य होईल, अशी अत्यंत साधी प्रयोगशाळेतील पद्धत शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे.
- कॅनडातील वैद्यकीय असोसिएशन जर्नलमध्ये ही पद्धत प्रसिद्ध झाली असून रुग्णाला घरी पाठविण्यात आल्यानंतर त्याला हृदयाशी संबंधित प्रश्नांबाबतचा कितपत धोका आहे तेही ओळखता येणे या पद्धतीमुळे शक्य होणार आहे.
- रुग्णाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी-अधिक प्रमाणात आहे किंवा मृत्यू येण्याची शक्यता आहे यासाठी केवळ ट्रोपोनीनहून अधिक सोपी पद्धत आम्ही विकसित केली आहे, असे कॅनडातील मॅकमास्टर विद्यापीठातील पीटर काव्हास्क यांनी म्हटले आहे.
- छातीत दुखत असलेल्या रुग्णांचा आपत्कालीन विभागात वाया जाणारा वेळ आणि रक्ताच्या अनेक चाचण्या या नव्या पद्धतीमुळे कमी होण्यास मदत होणार आहे, असे मॅकमास्टर विद्यापीठातील अण्ड्र वोर्स्टर यांनी म्हटले आहे.
दिनविशेष:
- भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य ‘गोपाळ कृष्ण देवधर‘ यांचा जन्म 21 ऑगस्ट 1871 मध्ये झाला होता.
- जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेन्द्रे यांचा जन्म 21 ऑगस्ट 1910 मध्ये झाला.
- सन 1911 मध्ये पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
- जमैकाचा प्रख्यात धावपटू उसेन बोल्ट यांचा जन्म 21 ऑगस्ट 1986 मध्ये झाला.
- सन 1991 मध्ये लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा