21 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
21 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (21 डिसेंबर 2018)
यशवंतराव चव्हाण पुरस्कारांची घोषणा:
- राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्यातील 32 साहित्यिकांना विविध साहित्य प्रकारात हे पुरस्कार घोषित झाले असून लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.
- यात प्रौढ वाङ्मय पुरस्कार काव्य प्रकारात कवी केशवसूत पुरस्कार शशिकांत हिंगोणेकर यांना ‘ऋतूपर्व‘ पुस्तकासाठी एक लाख रुपये, प्रथम प्रकाशन काव्य प्रकारात अमृत तेलंग यांच्या ‘पुन्हा फुटतो भादवा‘ या पुस्तकासाठी 50 हजार रुपये, प्रौढ वाङ्मय नाटक/एकांकिका या प्रकारात आशुतोष पोतदार यांच्या ‘ऋ1/105 आणि सिंधू‘, ‘सुधाकर, रम आणि इतर‘ पुस्तकास एक लाख रुपयांचा राम गणेश गडकरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- तर प्रौढ वाङ्मय कादंबरी प्रकारात कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण‘ या कादंबरीस एक लाख रुपयांचा हरी नारायण आपटे पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रथम प्रकाशन-कादंबरी प्रकारात रचना यांच्या ‘एका वाडीची गोष्ट‘ या पुस्तकास 50 हजार रुपयांचा श्री.ना. पेंडसे पुरस्कार जाहीर झाला आहे.
- मधुकर धर्मापुरीकर यांना प्रौढ वाङ्मय-लघुकथा प्रकारात ‘झाली लिहून कथा?‘ या पुस्तकास एक लाख रुपयांचा दिवाकर कृष्ण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. याप्रमाणेच, प्रथम प्रकाशन-लघुकथा प्रकारात अविनाश राजाराम यांच्या ‘सेकंड इनिंग‘ या पुस्तकास 50 हजार रुपयांचा ग.ल. ठोकळ पुरस्कार जाहीर झाला आहे.
- प्रौढ वाङ्मय – ललितगद्य प्रकारात इरावती कर्णिक यांच्या ‘बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत‘ पुस्तकास एक लाख रुपयांचा अनंत काणेकर पुरस्कार घोषित झाला आहे. तर प्रथम प्रकाशन – ललितगद्य प्रकारात सुधीर महाबळ यांच्या ‘परतवारी‘ पुस्तकास 50 हजार रुपयांचा ताराबाई शिंदे पुरस्कार जाहीर झाला आहे.
Must Read (नक्की वाचा):
‘UPSC’ची वयोमर्यादा 27 करण्याची शिफारस:
- नागरी सेवा परीक्षेची वयोमर्यादा सर्वसाधारण वर्गवारीसाठी 2022-23 पर्यंत टप्प्याटप्प्याने 30 वरून 27 करावी, अशी शिफारस निती आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे.
- लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये बदल करण्याची आणि अधिकाऱ्यांच्या व्यवस्थेची फेरमांडणी करण्याची गरजही निती आयोगाने व्यक्त केली आहे. ‘स्ट्रॅटजी फॉर न्यू इंडिया @ 75‘ दस्तऐवज जारी करण्यात आला.
- नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षण आणि निवड परीक्षेमध्ये काही बदल करण्याची गरज निती आयोगाने व्यक्त केली आहे. नवीन अधिकाऱ्यांची विविध विभागांमध्ये त्यांच्या वयानुसार नियुक्ती करावी, असे निती आयोगाचे मत आहे.
- अधिकारी तरुण, तडफदार असावे, 2020 नंतर भारतामध्ये 65 टक्के जनतेचे वय 35 हून कमी असेल. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचे सरासरी वय 25 वर्षे सहा महिने आहे. सध्या यूपीएससीसाठी वयोमर्यादा 30 वर्षे आहे. ही बाब लक्षात घेऊन वयोमर्यादा आणि जागा कमी कराव्या, त्याचप्रमाणे ठरावीक विषयामध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांना तेथे जागा द्यावी, असेही निती आयोगाचे म्हणणे आहे. त्याप्रमाणेच परीक्षा प्रक्रियेत बदल करण्याची शिफारस केली आहे. परीक्षेची वयोमर्यादा 27 करावी, अनुभवी व्यावसायिकांना करार तत्त्वावर अधिकारी म्हणून घ्यावे आदी शिफारशी आयोगाने केल्या आहेत.
‘स्टार्टअप’ इंडियात महाराष्ट्र आघाडीवर:
- देशातील सर्वाधिक 2787 नवोदित उद्योग (स्टार्टअप) महाराष्ट्रात आहेत. नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी गुजरात हे सर्वोत्तम राज्य ठरले आहे.
- वाणिज्य मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपी) यासंबंधीची मानांकने घोषित केली. त्यामध्ये गुजरात हे सर्वोत्तम राज्य ठरले असले तरी देशामध्ये स्टार्टअपच्या संख्येत गुजरात अखेरच्या स्थानी आहे. तेथील स्टार्टअपची संख्या अवघी 764 आहे.
- स्टार्टअप क्षेत्रात राज्य सरकारांनी केलेल्या कामाची पाहणी डीआयपीपीने अलिकडेच केली. धोरण आखणे, नवोदित उद्योगांचे हब उभारणे, कल्पकतेला वाव, उद्योगांशी संवाद या माध्यमातून राज्य सरकारांनी स्टार्टअपसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी केलेल्या उपाययोजना यांचा या पाहणीत समावेश होता. 27 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेश यात सहभागी झाले होते. त्यांना सर्वोत्तम, अग्रणी, महत्त्वाकांक्षी, उदयोन्मुख आदी श्रेणीत क्रमांक देण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राला ‘उदयोन्मुख’ हे मानांकन मिळाले.
- तर या सर्वेक्षणात डीआयपीपीच्या चमूने उद्योजक, व्यापारी यांना 40 हजार मोबाइल कॉल्स केले. त्याद्वारे राज्यांमधील स्टार्टअप धोरणाची स्थिती जाणून घेण्यात आली. राज्यात अधिकाधिक स्टार्टअप उद्योग सुरू होण्यासाठी गुजरातने 100 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती. त्याचा 200 उद्योग प्रकल्पांना लाभ झाला. यामुळेच गुजरातला यामध्ये सर्वोत्तम राज्याचा खिताब मिळाला आहे.
पतंजली उद्योग समूह लवकरच चीनमध्ये रोवणार झेंडा:
- योगगुरू रामदेवबाबा यांचा पतंजली आयुर्वेद उद्योग समूह लवकरच ग्लोबल होणार आहे. रामदेवबाबा यांनी सांगितले की, येत्या मार्चमध्ये पतंजली जागतिक बाजारात उतरणार आहे. चीनमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी चीन सरकारने कंपनीला 10 हजार एकर जमीन आणि भांडवली साह्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
- रामदेवबाबा यांनी सांगितले की, नैसर्गिक उत्पादनांत आपला ठसा उमटविण्यात बहुराष्ट्रीय एफएमसीजी कंपन्या अपयशी ठरल्या आहेत. याउलट पतंजलीने या क्षेत्रात प्रचंड काम केले आहे. दरम्यान, आयकर विभागासोबतच्या वादात दिल्ली हायकोर्टाने पतंजलीची याचिका फेटाळून कंपनीला झटका दिला आहे. 2010-11 या आढावा वर्षाचे स्पेशल ऑडिट’ करण्यासाठी आयकर विभागास सहकार्य करा, असे निर्देशही कोर्टाने दिले. पतंजली समूहाने स्पेशल ऑडिटला कोर्टात आव्हान दिले होते.
‘लक्ष्मीकांत’ यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर:
- सिनेसंगीत जगतात ज्यांच्या संगीताने रसिकांना बेधुंद केले, ठेका धरायला लावले असे लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील लक्ष्मीकांत यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे.
- तर प्रसिद्ध गायिका उषा तिमोथी यांना रफी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मोहम्मद रफी यांच्या 93व्या जयंती निमित्त केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली.
- आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
- तसेच पुरस्काराचे हे अकरावे वर्ष असून संगितकार लक्ष्मीकांत कुडाळकर यांना देण्यात येणा-या जीवन गौरव पुरस्कार एक लाख रू. धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे स्वरूप असून, उषा तिमोथी यांना देण्यात येणारा 51 हजार रू. धनादेश आणि स्मृतीचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.
- मोहम्मद रफी यांचे कुटुंबिय आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात वास्तव्यास असून त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो. गेल्या दहा वर्षात मोहम्मद रफी यांच्या सोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याने उत्तरोत्तर या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढत गेली.
दिनविशेष:
- सन 1913 मध्ये ‘ऑर्थर वेन‘ यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
- भारताचे 17वे सरन्यायाधीश ‘पी.एन. भगवती‘ यांचा जन्म 21 डिसेंबर 1921 रोजी झाला.
- भारतीय लेखक, कवी तसेच समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 मध्ये झाला होता.
- ‘रघुनंदन स्वरूप पाठक‘ यांनी सन 1986 मध्ये भारताचे 18वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा