21 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (21 जानेवारी 2019)
राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी आता स्वतंत्र निवडप्रक्रिया:
- 1957 पासून शौर्य पुरस्कारासाठी साहसी बालकांची निवड करणारी स्वयंसेवी संस्था अनियमितता प्रकरणात अडकल्याने सरकार आता स्वतंत्रपणे शौर्य पुरस्काराची निवडप्रक्रिया राबवणार आहे. त्याअनुषंगाने सरकारने तयारी केल्याची माहिती सूत्राने दिली.
- प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस अगोदर देशातील निवडक मुलांची साहसी कामाबद्दल निवड करण्यात येऊन त्यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येते.
- 1957 पासून देशातील साहसी मुलांची निवड स्वयंसेवी संस्थेमार्फत करण्यात येते. कौन्सिल फॉर चाइल्ड वेलफेअर (आयसीसीडब्ल्यू) असे त्या संस्थेचे नाव असून, त्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप लावण्यात आले आहेत.
- दिल्ली उच्च न्यायालयात या संदर्भात दाखल असलेल्या याचिकेवर आयसीसीडब्ल्यूच्या अनियमिततेबद्दल विचारणाही करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने या स्वयंसेवी संस्थेला निवड प्रक्रियेतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असून स्वतंत्ररीत्या मुलांची निवड करण्याची प्रक्रिया राबवणार आहे.
जगातील सर्वात वृद्ध पुरूषाचे निधन:
- जगातील सर्वात वयोवृद्ध असलेले जपानचे मसाझो नोनाका यांचे निधन झाले आहे. वयाच्या 113 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जपानमधील ओशोरे येथे ते राहात होते. नोनाका यांचा जन्म 25 जुलै 1905 मध्ये झाला होता.
- 10 एप्रिल 2018 रोजी मसाझो यांनी आपल्या वयाची 112 वर्षे आणि 259 दिवस पूर्ण केले आणि त्यांना जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दिले होते.
- जपानच्या उत्तरेकडील होकायडो बेटावर नोनाका कुटुंबियासोबत वास्तव्यास होते. मसाझो यांची सात भावंडे, पत्नी आणि पाचपैकी चार मुलांचंही वृद्धापकाळाने यापूर्वीच निधन झाले आहे.
- मसाझो यांना 20 जानेवारी रोजी झोपेतच नैसर्गिक मृत्यू आला. वयाच्या 113व्या वर्षीही मसाझो गोड पदार्थ खात होते. त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्यदेखील गोड खाणे असल्याचे त्यांनी म्हटले होते.
- जपान हा देश दीर्घायुषी लोकांसाठी प्रसिद्ध असून तेथील जेरोमॉन किमोरा यांचे 2013 मध्ये वयाच्या 116व्या वर्षी निधन झाले होते. जपानमध्ये शंभरी ओलांडलेले किमान 68000 लोक आहेत, असे सरकारी आकडेवारीतून दिसून आले आहे.
डिफेन्स कॉरिडॉरचे तमिळनाडूत उद्घाटन:
- संरक्षणमंत्री निर्मला सीताराम यांनी तमिळनाडू डिफेन्स इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचे उद्घाटन केले. स्वदेशी बनावटीची संरक्षण सामग्री निर्माण करण्यास यामुळे बळकटी येणार आहे.
- या डिफेन्स कॉरिडॉरमध्ये 3,038 कोटी रुपयांची गुंतवणूक उद्घाटनावेळीच जाहीर झाली आहे. यातील बहुतांशी गुंतवणूक ही सार्वजनिक क्षेत्रातून आली असून, ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांनी अनुक्रमे 2,305 कोटी, 140.5 कोटी आणि 150 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
- टीव्हीएस, डेटा पॅटर्न आणि अल्फा डिझाइन्स या खासगी कंपन्यांनीही अनुक्रमे 50 कोटी, 75 कोटी आणि 100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. लॉकहिड मार्टिन या जागतिक स्तरावरील बड्या कंपनीनेही गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
- तर हा कॉरिडॉर चेन्नई, होसूर, सालेम, कोइमतूर आणि तिरुचिरापल्ली या शहरांदरम्यान असणार आहे. स्थानिक उद्योगांचा या कॉरिडॉरला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे सीतारामन यांनी या वेळी सांगितले.
मध्य रेल्वेच्या सुधा सिंगचा स्पर्धाविक्रम:
- कमी-अधिक प्रमाणात प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभागी झालेल्या हौशे-नवशे तसेच अव्वल धावपटूंच्या सळसळत्या उत्साहासह मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीचे 16वे पर्व 20 जानेवारी रोजी पार पडले.
- भारतीय महिलांच्या गटात मध्य रेल्वेच्या सुधा सिंगने स्पर्धाविक्रमाची नोंद करत दोहा येथील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान पटकावला.
- पुरुषांमध्ये मात्र नितेंद्र सिंग रावतने विजेतेपद पटकावले असले तरी त्याची जागतिक स्पर्धेसाठी पात्र होण्याची संधी अवघ्या काही सेकंदांनी हुकली.
- मुंबई मॅरेथॉनवर नेहमीप्रमाणेच केनिया आणि इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व पाहायला मिळाले.
- पुरुषांमध्ये केनियाच्या कॉस्मोस लागटने तर महिलांमध्ये इथिओपियाच्या वर्कनेश अमेलूने विजेतेपदावर नाव कोरले.
वैष्णवी मांडेकरची लिम्काबुकमध्ये नोंद:
- जागतिक महिला दिनानिमित्त मागील वर्षी मुळशी तालुक्यातील चांदे गावची सुकन्या आणि राष्ट्रीय कराटेपट्टू वैष्णवी मांडेकर हिने केलेल्या विश्वविक्रमाची लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे.
- वैष्णवी हिने खिळ्यांच्या फळीवर झोपून पाच मिनिटे 24 सेकंदांत एक टन वजनाच्या फरश्या फोडण्याचा विक्रम केला होता.
- वैष्णवीने तिची पुण्यातील मैत्रीण अस्मिता जोशी हिच्यासमवेत हा विक्रम प्रस्थापित केला होता. लिम्का बुक ऑफ रेकार्डने त्या विक्रमाबद्दलचे पाठविलेले प्रमाणपत्र तिला नुकतेच मिळाले. क्रीडा प्रशिक्षक विक्रम मराठे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
- आतापर्यंत तिने मातोल कराटे क्रीडा प्रकारातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नावलौकिक कमावला आहे. ती सध्या पुण्यातील मॉर्डन महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. तसेच बालेवाडी येथे झालेल्या नॅशनल रूरल चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळविले.
दिनविशेष:
- सन 1761 मध्ये थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या 16व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
- कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचा जन्म 21 जानेवारी 1882 मध्ये झाला होता.
- गीतकार, लेखक आणि दिगदर्शक शांताराम आठवले यांचा जन्म 21 जानेवारी 1910 मध्ये झाला होता.
- सन 1972 मध्ये मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा