21 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (21 सप्टेंबर 2018)
29 सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक’ दिवस:
- विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना 29 सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक’ दिवस म्हणून पाळण्याचे आदेश दिले आहेत.
- या दिवशी सशस्त्र दलांतील जवानांच्या बलिदानाबाबत माजी सैनिकांचे संवाद सत्र, विशेष परेड, प्रदर्शनांचे आयोजन तसेच सशस्त्र दलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शुभेच्छा पत्रे पाठवण्यात यावीत, असेही युजीसीने आपल्या आदेशात म्हटले आहे.
- युजीसीने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना पत्र पाठवले असून यात सर्व विद्यापीठांतील एनसीसीच्या कॅडेट्सना 29 सप्टेंबर रोजी विशेष परेड घेण्यास सांगण्यात आले आहे. परेडनंतर एनसीसीचे कमांडर सीमेच्या संरक्षणासंबंधी या कॅडेट्सना संबोधित करतील.
- 29 सप्टेंबर 2016 रोजी भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडे जाऊन दहशतवाद्यांच्या सात तळांवर हल्ले करीत सर्जिकल स्ट्राइक केले होते. विशेष दलाच्या या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीच्या तयारीतील दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले होते.
केंद्र सरकारने केली दहा बँक प्रमुखांची नेमणूक:
- सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांच्या प्रमुखांची नेमणूक केंद्र सरकारने केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामधून (एसबीआय) पाच नेमणुका झाल्या आहेत. यापैकी अनेक जागा सुमारे आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून रिक्त होत्या.
- एसबीआयचे उप-व्यवस्थापकीय संचालक करणाम सेकर यांची देना बँकेच्या प्रमुखपदी नेमणूक झाली आहे. देना बँक, बँक ऑफ बडोदा आणि विजया बँक यांचे विलीनीकरण करण्याची सरकारची योजना आहे.
- दिल्लीत मुख्यालय असलेल्या पंजाब अॅण्ड सिंध बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओपदी परंपरा मोडून पहिल्यांदाच बिगर शीख व्यक्तीची नेमणूक करण्यात आली.
- आयआयएम बंगळुरूचे प्रोफेसर चरण सिंग यांची बँकेच्या चेअरमनपदी, तर अलाहाबाद बँकेचे कार्यकारी संचालक एस. हरी शंकर यांची व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.
- इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक ए.एस. राजीव यांची बँक ऑफ महाराष्ट्राच्या एमडी व सीईओपदी तर युनियन बँकेचे ईडी अतुल गोयल यांची युको बँकेच्या एमडी व सीईओपदी नेमणूक करण्यात आली आहे. राजीव आणि गोयल हे तुलनेने तरुण असून, त्यांना पाच वर्षांपेक्षा जास्त काळ या पदावर काम करता येणार आहे.
- एसबीआयच्या पाच उप-व्यवस्थापकीय संचालकांची राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखपदी नेमणूक करून सरकारने उपलब्ध सर्वोत्तम गुणवत्तेला प्राधान्य देऊन बँक सुधारणा कार्यक्रम राबविण्याचे धोरण स्वीकारल्याचे संकेत दिले आहेत.
- तसेच या धोरणानुसार मृत्युंजय महापात्रा सिंडिकेट बँकेत, पद्मजा चंद्रू यांना इंडियन बँकेत, पल्लव मोहापात्रा यांना सेंट्रल बँकेत आणि जे. पाकिरीसामी यांना आंध्र बँकेत प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. सिंडिकेट बँकेचे ईडी एस. एस. मल्लिकार्जुन राव यांना अलाहाबाद बँकेचे एमडी व सीईओ करण्यात आले. अशोककुमार प्रधान यांना युनायटेड बँकेतच ईडी पदावर पदोन्नत करण्यात आले आहे.
आता पीएफवर आठ टक्के व्याज मिळणार:
- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पीपीएफसह अन्य अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना केंद्र सरकाने गुडन्यूज दिली आहे.
- सरकारने ऑक्टोंबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांवरील व्याजदरात 0.4 टक्के वाढ केली आहे. अल्प बचत योजनांवरील व्याजदरात दर तिमाहीत बदल होत असतात.
- ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याजदरात 7.8, 7.3 आणि 8.7 टक्के वाढ करण्यात आली आहे. पीपीएफ आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा व्याजदर आठ टक्के करण्यात आला आहे. सध्या हा व्याजदर 7.6 टक्के होता.
- किसान विकास पत्रावर 7.7 टक्के व्याज देण्यात येईल. याआधी 7.3 टक्के व्याज मिळायचे. खास मुलींसाठी सुरु करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवर 8.5 टक्के व्याज देण्यात येईल. याआधी हा व्याजदर 8.1 टक्के होता. त्यामध्ये 0.4 टक्के वाढ करण्यात आली आहे. एक ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर 0.3 टक्के जास्त व्याज मिळणार आहे.
आरे मेट्रो कारशेडला हरित लवादाची मंजुरी:
- आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी हरित लवादाने मंजुरी दिली आहे. यामुळे 2700 झाडांवर कुऱ्हाड येणार आहे. आरे वसाहतीत कारशेड उभारण्यास काही शिवसेना, मनसेसहित काही राजकीय पक्षांनी तसेच पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. यावरुन आरोप प्रत्यारोपही झाले होते. मात्र हरित लवादाने हिरवा कंदील दिल्याने मेट्रो कारशेड उभे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा 33.5 किलोमीटर लांबीचा आणि सुमारे 23 हजार कोटी रूपये खर्चाचा मेट्रो रेल्वे प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकार यांच्या भागीदारीतून स्थापन झालेल्या ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’मार्फत राबविला जात आहे.
- तसेच या मेट्रोची कारशेड आरे वसाहतीत उभारण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यासाठी अडीच हजार झाडे तोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही पर्यावरणवाद्यांनी त्या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना आणि मनसेनेही त्यांना पाठबळ दिल्याने पर्यायी जागेचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती नेमली होती.
विराट कोहलीला खेलरत्न पुरस्कार जाहीर:
- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन पुरस्कार समितीने कर्णधार विराट कोहली आणि मीराबाई चानू यांची शिफारस केली होती.
- कर्णधार कोहली याला नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळाला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 4-1 अशा फरकाने पराभूत झाला. परंतु या मालिकेत त्याने फलंदाजीने सर्व क्रिकेटरसिकांना खुश केले. विराट कोहलीने या मालिकेत सर्वाधिक 593 धावा केल्या.
- तर मीराबाई चानू हिचीही प्रगती वाखाणण्याजोगी झाली आहे. मीराबाई चानू हिने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. 48 किलो वजनी गटातील वेटलिफ्टींग प्रकारात आपली छाप पाडत तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
- तसेच याशिवाय, 2017 मध्ये मीराबाई चानू हिने जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली होती. तिने 48 किलो वजनी गटात 194 किलो (स्नॅचमध्ये 85 आणि क्लीन-जर्कमध्ये 109 किलो) वजन उचलून भारताला दोन दशकांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले.
- अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली होती. 22 वर्षांपूर्वी कर्नाम मल्लेश्वरी हिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.
दिनविशेष:
- भारतीय महानगर ग्वेर्घगीस इवानीयो यांचा जन्म 21 सप्टेंबर 1882 मध्ये झाला.
- 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन तसेच आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून पाळला जातो.
- सन 1965 मध्ये गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला.
- रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना सन 1968 मध्ये झाली.
- सन 1971 मध्ये बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा