22 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (22 ऑगस्ट 2018)
बीसीसीआयकडून नव्या घटनेची नोंदणी:
- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू येथे केली. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.
- लोढा समितीच्या काही शिफारशींमध्ये बदल करून सर्वोच्च न्यायालयाने 9 ऑगस्टला नवी घटना तयार करून तिच्या नोंदणीचे निर्देश दिले होते. आता बीसीसीआयने घटनेची नोंदणी केल्यानंतर या घटनेला अनुसरून संलग्न प्रत्येक राज्य संघटनांना महिनाभरात आपल्या घटनेची नोंदणी करावी लागणार आहे.
- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही घटना नोंदणीची कार्यवाही सुरू केली आहे, असे मत प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय आणि सदस्य डायना एडल्जी यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने लोढा समितीतील एक राज्य एक मत आणि प्रशासकांचा कूलिंग काळ या शिफारशींमध्ये बदल केला होता.
भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश:
- नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर गोठलेले पाणी आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे नासाने भारताकडून 10 वर्षांपुर्वी प्रक्षेपित करण्यात आलेल्या अंतराळ यान चांद्रयान-1 कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. नासाने चंद्राच्या सर्वात थंड आणि अंधाऱ्या ध्रुवीय क्षेत्रात गोठलेल्या अवस्थेत पाणी आढळल्याची माहिती दिली आहे.
- ‘पीएनएएस’ जर्नलमध्ये प्रकाशित लेखात बर्फ इकडे तिकडे विखुरलेल्या अवस्थेत असल्याचं सांगण्यात आले आहे. दक्षिण ध्रुवावर सर्वाधिक बर्फ ल्यूनर क्रेटर्सजवळ जमा झालेला आहे. उत्तर ध्रुवावर बर्फाचे प्रमाण जास्त असून तो विखुरलेल्या अवस्थेत आहे. शास्त्रज्ञांनी मून मिनरेलॉजी मॅपरकडून (एम3) प्राप्त झालेल्या आकड्यांचा वापर करत चंद्रावर गोठलेले पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.
- नव्या माहितीनुसार, बर्फ चंद्रावरील ध्रुवीय क्षेत्राजवळ असणाऱ्या खड्ड्यांमध्ये जमा झाला आहे, जेथील किमान तापमान-156 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असत नाही. तिथे सुर्यप्रकाशही पोहोचत नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर योग्य प्रमाणात बर्फ आढळल्याने आता आगामी मोहिमांसाठी, तसेच चंद्रावर राहण्याच्या दृष्टीनेही पाणी उपलब्ध होण्याच्या शक्यतेचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
मराठवाडा विद्यापीठातर्फे जीवनगौरव जाहीर:
- वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवलेल्या आठ जणांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
- तसेच यामध्ये ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक, बुलडाणा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोयायटीचे राधेश्याम चांडक, युनेस्कोचे संचालक राजेंद्र शेंडे, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं. बोराडे, आदर्शग्राम पाटोदाचे सरपंच भास्कर पेरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरक्षारक्षक तुकाराम जनपदकर गुरुजी, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नामदेव कांबळे या मान्यवरांचा समावेश आहे.
- विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्धापनदिनी गुरुवारी (23 ऑगस्ट रोजी) पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल. मानपत्र आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी दिली.
वादाच्या मुद्दय़ांबाबत भारत-चीन संवेदनशील:
- भारत आणि चीन वादाचे मुद्दे संवेदनशीलतेने आणि परिपक्वतेने हाताळत आहेत. हे सीमेवरील शांततेतून प्रतीत होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे संरक्षणमंत्री वी फेंग यांच्या भेटीनंतर केले. चीनचे संरक्षणमंत्री चार दिवस भारताच्या भेटीवर आले असून त्यांनी नवी दिल्लीत मोदींची भेट घेतली.
- भारत आणि चीनमध्ये भूतानमधील डोकलामवरून झालेल्या वादानंतर वातावरण निवळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डोकलाम वादानंतर मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची चीनमधील वुहान, क्विंगडाओ आणि दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे भेट झाली होती. त्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि वी फेंग यांची एप्रिल महिन्यात बीजिंग येथे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत बेट झाली होती. त्यानंतर आता वेई भारतात आले असून ते सीतारामन यांची भेट घेणार आहेत.
- मोदी यांनी वी यांच्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा केली. दोन्ही देशांनी वादांचे रूपांतर प्रत्यक्ष संघर्षांत होऊ देता कामा नये. भारत आणि चीन वादाचे मुद्दे संवेदनशीलतेने आणि परिपक्वतेने हाताळत आहेत. सीमाप्रदेशातील शांततेवरून ते स्पष्ट होत आहे, असे मोदी म्हणाले.
देशात स्थापन होणार व्हॉट्सअॅपचे कार्यालय:
- भारत दौऱ्यावर आलेले व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स यांनी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली.
- केंद्राच्या वतीने मी व्हॉट्सअॅपच्या सीईओंना तीन सूचना केल्या आहेत, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. भारतात व्हॉट्सअॅपचे कार्यालय सुरु करावे, अशी आमची प्रमुख सूचना असल्याचे त्यांनी नमूद केले.
- व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल यांनी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि फेक न्यूज रोखण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला तंबी दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. या अफवांमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले असून या अफवांवर ठोस नियंत्रण मिळवणं गरजेचे असल्याचे सरकारनं स्पष्ट केलं आहे.
- तसेच या भेटीनंतर रविशंकर प्रसाद यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आमच्यात तीन विषयांवर चर्चा झाली आणि व्हॉट्सअॅपने केंद्र सरकारच्या सूचनांची पूर्तता करण्याची तयारी दर्शवली, असे त्यांनी सांगितले.
परदेशात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती:
- खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी राज्य सरकारकडून अशा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याबाबतच्या योजनेस झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लागू असलेल्या परदेशी शिष्यवृत्तीच्या धर्तीवर खुल्या, तसेच अन्य मागास प्रवर्गातील मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
- तसेच योजनेअंतर्गत खुल्या व अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
दिनविशेष:
- ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी’ने 22 ऑगस्ट 1639 रोजी मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.
- सन 1848 मध्ये अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.
- सन 1902 मध्ये कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना झाली.
- हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डॉ. डेंटन कुली यांचा जन्म 22 ऑगस्ट 1920 मध्ये झाला.
- वर्णव्देषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची 22 ऑगस्ट 1972 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा