22 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (22 जानेवारी 2019)
भारतीय खेळाडूंना मिळणार वर्तणुकीविषयी मार्गदर्शन:
- हार्दिक पंडय़ा आणि लोकेश राहुल यांनी महिलांविषयी केलेल्या अश्लिल शेरेबाजीनंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासकीय समितीने भारतीय संघातील खेळाडूंना आता वर्तणुकीविषयी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्याचे ठरवले आहे.
- भारताचा वरिष्ठ संघ, अ संघ तसेच 19 वर्षांखालील संघातील खेळाडूंसाठी हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. भारतीय खेळाडूंना बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वर्तणुकीविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
- खेळाडूंना वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करण्याचे मार्गदर्शन यात केले जाणार आहे. त्याचबरोबर लैंगिक समानतेविषयीही सत्राचे आयोजन करण्यात येईल, असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने सांगितले.
- तसेच या कार्यक्रमाला पंडय़ा आणि राहुल यांची उपस्थिती असणार नाही. या दोघांसाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनीही युवा खेळाडूंसह वरिष्ठ खेळाडूंसाठी हे मार्गदर्शन शिबीर उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.
भारतातून अन्य देशांना होईल फायटर विमानांची निर्यात:
- एफ-16 फायटर विमान निर्मितीचा प्रकल्प भारतात हलवण्याची तयारी दाखवणाऱ्या लॉकहीड मार्टिन कंपनीची भारतातूनच अन्य देशांना एफ-16 विमाने निर्यात करण्याची योजना आहे.
- भारताला एफ-16 प्रकल्पाचे जागतिक उत्पादन केंद्र बनवून भारतीय हवाई दलासह अन्य बाजारपेठांच्या गरजा पूर्ण करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे असे लॉकहीडच्या रणनिती आणि बिझनेस विभागाचे उपाध्यक्ष विवेक लाल यांनी सांगितले.
- भारताबाहेर अन्य देशांनी एफ-16 च्या 200 पेक्षा जास्त विमानांसाठी मागणी नोंदवली आहे. हा सर्व व्यवहार 20 अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कमेचा आहे असे लाल यांनी सांगितले. एफ-16 चा उत्पादन प्रकल्प भारतात सुरु झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियाला मोठी चालना मिळू शकते. यातून हजारो रोजगार तयार होतील.
- लॉकहीड मार्टिन भारताकडून सर्वात मोठे 114 फायटर विमानांचे कंत्राट मिळवण्याच्या स्पर्धेत आहे. त्यासाठीच त्यांनी एफ-16 चा संपूर्ण प्रकल्प भारतात हलवण्याची तयारी दाखवली आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी त्यांची बोईंग एफ/ए 18, साब ग्रिपेन, राफेल, युरोफायटर टायफून आणि रशियन विमान कंपन्यांबरोबर स्पर्धा आहे.
- एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारताला 42 स्क्वाड्रनची गरज आहे. म्हणजे ताफ्यात 750 फायटर विमाने असणे आवश्यक आहे. 1960च्या दशकातील रशियन बनावटीची मिग-21 विमाने निवृत्त होत आहेत.
काही शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नाही:
- देशातील आठ शिक्षण संस्थांमध्ये खुल्या वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, अशा आशयाचे एक निवेदन विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) यासंबंधी प्रसिद्ध केले आहे.
- देशाच्या कोणकोणत्या शिक्षण संस्थांमध्ये केंद्र सरकारने आणलेले 10 टक्के आरक्षण लागू होईल किंवा नाही, हे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
- युजीसीचे संयुक्त सचिव डॉ. जितेंद्रकुमार त्रिपाठी यांच्याकडून देण्यात आलेल्या सुचनेनुसार, देशातील 40 सरकारी विद्यापीठे, 8 डीम्ड विद्यापीठे, दिल्लीमधील 54 महाविद्यालये, बनारस हिंदू विद्यापीठाशी संलग्न चार महाविद्यालये आणि इलाहाबाद विद्यापीठातील 11 संलग्न महाविद्यालये, उत्तराखंडमधील हेमवती नंदन बहुगुणा गढवाल केंद्रीय विद्यापीठामध्ये आणि गुरुकुल कांगडी विद्यापीठ, हरिद्वारमध्ये 10 टक्के आरक्षणाचा लाभ मिळेल.
- युजीसीकडून आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांना 31 मार्चपूर्वीच वाढलेल्या जागांसह संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व संस्थांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षापासून आरक्षण लागू होणार आहे.
- युजीसीने सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये कोर्सप्रमाणे जागांची माहिती आणि उत्पन्नांच्या साधनांची माहिती 31 जानेवारी 2019 पूर्वी उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे.
शाळांनी जीएसटीची नोंदणी करणे बंधनकारक:
- राज्यातील शाळांना जीएसटी अनिवार्य असून, उर्वरित जिल्हा परिषद आणि महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांनी तत्काळ जीएसटी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे लेखी आदेश राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सहसंचालकांनी दिले आहेत. मात्र, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेसह अनेक शाळांनी याचा निषेध केला.
- राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहसंचालक राजेश लांडे यांनी शाळांना जीएसटी बंधनकारक असल्यासंदर्भातील लेखी आदेश नुकतेच जारी केले आहेत.
- राज्यातील सांगली, सिंधुदुर्ग, जळगाव, नंदुरबार आणि अमरावती या जिल्ह्यातील शाळांची म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीची जीएसटी नोंदणी पूर्ण झाल्याचे लांडे यांनी स्पष्ट केले.
- राज्यातील शाळांना जीएसटी अनिवार्य असून, उर्वरित जिल्हा परिषद आणि पालिका अंतर्गत येणार्या शाळांनी तत्काळ जीएसटी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या शिक्षण संस्था किंवा संघटनांना यात अडचणी येतील, त्यांनी थेट आम्हाला संपर्क साधावा असेही लांडे यांनी स्पष्ट केले.
नेपाळ, बांगलादेशाशी शारदानगरचा करार:
- शारदानगर येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाने नेपाळ व बांगलादेशातील विद्यापीठांबरोबर आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार विद्यार्थी, प्राध्यापकांना परस्परदेशांमध्ये प्रशिक्षणे, कार्यशाळा, चर्चासत्रे, अभ्यास यांचे आदानप्रदान करता येणार आहे.
- कौशल्याधारित शैक्षणिक प्रशिक्षण व परस्पर सहकार्यातून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा या करारामागील हेतू आहे. यामध्ये नेपाळमधील बालकुमारी कॉलेज चितवन आणि बांगलादेशातील राजशाही विद्यापीठाचा या कराराचा संबंध आहे.
- तर यामध्ये बारामती आणि नेपाळ किंवा बारामती व बांगलादेश यांनी एकमेकांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व परिषदांमध्ये सहभागी होणे व विविध अभ्यासक्रमांच्या विकासासाठी योगदान देण्याचा समावेश आहे.
- शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने या सामंजस्य करारांतर्गत इंटरनॅशनल स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रॅम 7 ते 12 जानेवारीदरम्यान घेतला.
- तसेच यामध्ये चितवनच्या बालकुमारी कॉलेजमधील नऊ विद्यार्थी व बांगलादेशातील राजशाही विद्यापीठाच्या जीवरसायन व आण्विक जीवशास्त्र विभागाचे अकरा विद्यार्थी शारदानगर येथे सहभागी झाले होते.
दिनविशेष:
- सन 1947 मध्ये भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.
- डेहराडून येथे सन 1963 मध्ये अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन करण्यात आले.
- सन 1971 मध्ये सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे 13वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
- आय.एन.एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू सन 2001 या वर्षी नौका भारतीय नौदलात दाखल झाली.
- सन 2015 मध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा