23 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
23 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (23 नोव्हेंबर 2018)
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच करार:
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी 22 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी परस्पर सामरिक संबंध वाढविण्याबाबत व्यापक चर्चा केली आणि गुंतवणुकीला चालना देण्याबाबत परस्पर सहकार्य वाढविण्याबाबत ऑस्ट्रेलियाशी पाच करारही केले.
- कोविंद यांचे सिडनी येथे आगमन झाले. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री मॅरिस पायने आणि कौशल्यविकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांच्या उच्चायुक्तांनी पाच करारांवर स्वाक्षऱ्या केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.
- पहिला करार दिव्यांगांना सेवा देण्याबाबत तर दुसरा करार दोन्ही देशांमधील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया आणि ऑस्ट्रेड यांच्यात करण्यात आला. तिसरा करार रांचीतील सेंट्रल माइन प्लानिंग अॅण्ड डिझाइन इन्स्टिटय़ूट आणि कॅनबेरातील कॉमनवेल्थ सायण्टिफिक अॅण्ट रीसर्च ऑर्गनायझेशन यांच्यात करण्यात आला.
- कृषी क्षेत्रातील सहकार्यासाठीचा चौथा करार गुंटूर येथील आचार्य एन.जी. रंगा कृषी विद्यापीठ आणि पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ यांच्यात करण्यात आला. तर पाचवा करार संयुक्त पीएच.डी.बाबत दिल्लीतील इंद्रप्रस्थ माहिती तंत्रज्ञान संस्था आणि ब्रिस्बेनमधील क्वीन्सलॅण्ड तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात करण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):
आता मोफत ‘इनकमिंग कॉल’ बंद होणार:
- भारतीय दूरसंचार क्षेत्रात रिलायंस जिओ आल्यापासून बऱ्याच कंपन्या डबघाईला लागल्या, तर अनेक कंपन्या कशाबशा बाजारात तग धरुन आहेत. परिणामी अनेक दूरसंचार कंपन्या लवकरच मोबाइल धारकांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
- जिओने स्वस्त इंटरनेट पॅक उपलब्ध करून दिल्याने आपला ग्राहक वर्ग टिकवण्यासाठी इतर सर्वच कंपन्यांनीही स्वस्त दरात इंटरनेट पॅक उपलब्ध करुन दिले.
- जिओने डेटा आणि दरयुद्ध छेडल्यानंतर इतर कंपन्यांनीही कॉल दर कमी केले. पण यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी आता या कंपन्यांनी ‘इनकमिंग कॉल’साठी शुल्क आकारण्याची तयारी सुरु केल्याचे समजते.
- जिओच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रवेशामुळे व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि बीएसएनएल सारख्या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता मोफत इनकमिंग कॉल सुविधा न देण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत या कंपन्या आहेत.
- सध्या तरी अनेक युजर्स असे आहेत की, फक्त इनकमिंग कॉलसाठी मोबाईल वापरतात. एके काळी मोबाईल कंपन्या आऊटगोइंगच नव्हे, तर इनकमिंगसाठी शुल्क आकारत होत्या. आता ग्राहकांना इनकमिंग कॉलसाठी महिन्याला (28 दिवस) 35 रुपयांचा रिचार्ज करावा लागण्याची शक्यता आहे. अन्यथा आउटगोइंगच नव्हे, तर इनकमिंग सेवाही बंद केली जाऊ शकते.
भारतात सर्वाधिक वेतन मिळते बंगळुरू शहरात:
- लिंक्ड इन या संस्थेने केलेल्या वेतनमान सर्वेक्षणात सर्वाधिक वेतन देणारे शहर ठरण्याचा मान बंगळुरू शहराला मिळाला आहे.
- सर्वाधिक वेतन देणा-या हार्डवेअर व नेटवर्किंग, सॉफ्टवेअर व आयटी सेवा आणि ग्राहक (कंझ्युमर) या क्षेत्रांनी बंगळुरूला हा मान मिळवून दिला आहे. बंगळुरूनंतर मुंबई आणि दिल्लीचा क्रमांक लागला.
- अभ्यासातील निष्कर्षानुसार, बंगळुरूत सरासरी 12 लाख वार्षिक वेतन मिळते. मुंबई आणि दिल्ली-एनसीआरमध्ये प्रत्येकी 9 लाख रुपये सरासरी वार्षिक वेतन मिळते. हैदराबादेत 8.5 लाख, तर चेन्नईत 6.3 लाख सरासरी वार्षिक वेतन मिळते.
- तंत्रज्ञान उद्योग हे सर्वाधिक वेतन देणारे क्षेत्र ठरले आहे. हार्डवेअर व नेटवर्किंग क्षेत्रात सरासरी 15 लाख वार्षिक वेतन दिले जाते. सॉफ्टवेअर क्षेत्रात 12 लाख, तर ग्राहक क्षेत्रात 9 लाख वार्षिक वेतन मिळते.
- हार्डवेअर क्षेत्रातील चीप डिझाईन व नेटवर्किंग क्षेत्रातील जाणकारांना सर्वाधिक वेतन मिळते. चीप डिझायनिंग अभियंत्यांच्या वेतनात प्रचंड वाढ झाली आहे.
ब्रेग्झिटोत्तर संबंधांबाबत ब्रिटनकडून करार सादर:
- ब्रेग्झिटनंतर अर्थात युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर उभयतांमधील संबंध नेमके कसे राखले जातील, याबाबतच्या कराराच्या मसुद्यावर दोघांचे एकमत झाले.
- आता युरोपीय समुदायातील 27 देशांचे प्रतिनिधी होणाऱ्या बैठकीत या कराराबाबत निर्णय घेतील. या करारानुसार व्यापक, दृढ, महत्त्वाकांक्षी आणि लवचिकतेला वाव देणारे संबंध राखण्यास वाव मिळणार आहे, असे अधिकारी गोटातून सांगण्यात आले.
- युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनमधील युरोपीय देशांच्या नागरिकांना ब्रिटनबाहेर पडण्यासाठी तसेच ब्रिटनच्या नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी इ.स. 2020ची मुदत आहे. मात्र गरजेनुसार ती एक ते दोन वर्षांनी वाढविण्यावरही एकमत झाले.
- आता ब्रेग्झिटोत्तर संबंधांबाबतच्या राजकीय कराराचा मसुदा युरोपीय समुदायातील अन्य 27 देशांना पाठविण्यात आला आहे, असे युरोपीय मंडळाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितले. येत्या 25 नोव्हेंबर रोजी ब्रुसेल्स येथे समुदायातील देशांच्या प्रतिनिधींची बैठक होत आहे. त्यावेळी या करारांबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.
ग्रॅच्युईटीसाठी आता तीन वर्षे नोकरीची मुदत होणार:
- ग्रॅच्युईटी व पेन्शन संदर्भात लोकसभेच्या निवडणुकांआधी सरकार काही मोठे निर्णय घेण्याच्या विचारात आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (इपिएफओ) नवनियुक्त सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत नोकरदार वर्गाच्या प्रलंबित मागण्यांवर विचार होणार आहे.
- ग्रॅच्युईटी हा कर्मचार्याच्या वेतनाचाच भाग आहे. नोकरी सोडल्यावर वा निवृत्तीनंतर ग्रॅच्युईटीचे लाभ कर्मचार्याला मिळावेत, हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. हे लाभ मिळण्यासाठी कर्मचार्याला सध्या 5 वर्षांच्या नोकरीचा कालखंड आवश्यक असतो. तो 3 वर्षे करण्याचा तसेच विशिष्ट काळासाठी नेमलेल्या कर्मचार्यांनाही तो लाभ देण्याच्या प्रस्तावाबाबत चर्चा अपेक्षित आहे.
- फिक्स्ड् टाइम कर्मचार्यांना त्यांच्या नोकरीच्या वर्षांच्या प्रमाणातच ग्रॅच्युईटी मिळण्याची शक्यता आहे. सध्या नोकरदार वर्ग एकाच नोकरीत 5 वर्षे राहात नाही. कंपन्यांही कामगार कपात करीत आहेत. त्यामुळे ग्रॅच्युईटीसाठी आवश्यक असलेला कालावधी तीन वर्षे करावा, ही मागणी कामगार संघटना करीत आहेत.
दिनविशेष:
- सन 1924 मध्ये एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले होते.
- आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1926 मध्ये झाला होता.
- सन 1992 मध्ये आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
- नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल सन 1999 मध्ये अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा