25 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 मे 2019)
सर्वाधिक भारतीय गिर्यारोहकांना माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची परवानगी :
- जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी सर्वाधिक भारतीय गिर्यारोहकांना संधी मिळणार आहे. 78 भारतीय गिर्यारोहकांना नेपाळच्या पर्यटन खात्याने हे शिखर सर करण्याची परवानगी दिली आहे.
- तर नेपाळने 14 मेपासून एव्हरेस्टवर जाण्यासाठीचा मार्ग खुला केला आहे. हे शिखर सर करण्यासाठी या वर्षी देश-विदेशातील 381 गिर्यारोहकांना परवानगी देण्यात आली असून, सर्वाधिक म्हणजे 78 भारतीय गिर्यारोहकांना एव्हरेस्ट सर करण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे नेपाळच्या पर्यटन खात्याच्या संचालक मीरा आचार्य यांनी सांगितले.
- भारताच्या खालोखाल अमेरिकेच्या 75 गिर्यारोहकांना परवानगी देण्यात आली आहे. मागील काही वर्षांत युरोपियन गिर्यारोहकांनी मोठय़ा प्रमाणात हे शिखर सर करण्याचे प्रयत्न केले होते, तर भारतीय गिर्यारोहकांची संख्या कमी होती,
असेही आचार्य यांनी सांगितले. - तसेच या हंगामात जवळपास 600 हून अधिक जणांनी एव्हरेस्ट सर केले आहे. यात विदेशी गिर्यारोहक, नेपाळी गिर्यारोहकांसह, शेर्पा आदींचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयात नियुक्त चार न्यायाधीशांना शपथ :
- सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शपथ दिली. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या मंजूर क्षमतेइतकी म्हणजे 31 झाली आहे.
- न्या. बी. आर. गवई, न्या. सूर्यकांत, न्या. अनिरुद्ध बोस, न्या. ए. एस. बोपन्ना यांना न्यायालय क्रमांक 1 च्या कक्षात सरन्यायाधीश गोगोई यांनी विद्यमान न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथ दिली.
- सर्वोच्च न्यायालयातील 31 न्यायाधीशात तीन महिला असून त्यात न्या. आर. बानुमती, न्या. इंदू मल्होत्रा, न्या. इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश आहे.
- 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 26 वरून 31 करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रथमच न्यायालयात पूर्ण क्षमतेने न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी चार न्यायाधीशांच्या नेमणुकीस मान्यता दिली.
भारताने बनवला 500 किलोचा गाईडेड बॉम्ब :
- संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओने 500 किलो वजनाच्या इनर्शिअली गाईडेड बॉम्बची यशस्वी चाचणी केली.
- राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण रेंजवर ही चाचणी करण्यात आली. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने डीआरडीओचे हे महत्वपूर्ण यश आहे.
- संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचा हा गाईडेड बॉम्ब डीआरडीओने विकसित केला आहे. या गाईडेड बॉम्बने 30 किलोमीटरवरील लक्ष्याचा अत्यंत अचूक वेध घेतला.
- तर दोन महिन्यांपूर्वी डीआरडीओने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. अत्यंत मोजक्या देशांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
- तसेच भारताच्या आधी चीन, रशिया आणि अमेरिका या देशांनी उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.
- या चाचणीद्वारे भारताने अवकाश क्षेत्रातील अत्यंत कठीण समजले जाणारे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. ‘मिशन
शक्ती’द्वारे भारताने अवकाशतही युद्ध लढण्यास समर्थ आहोत हे दाखवून दिले होते.
मेघालय उच्च न्यायालयाचे हिंदू राष्ट्राबाबतचे निरीक्षण रद्द :
- पाकिस्तानने स्वत:ला इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित केले तसे भारतानेही स्वत:ला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावयास हवे होते, मात्र भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्रच राहिले, असे निरीक्षण डिसेंबर 2018 मध्ये मेघालय उच्च न्यायालयाचे
न्यायाधीश एस. आर. सेन यांच्या एकसदस्यीय पीठाने नोंदविले होते, ते मेघालयचे मुख्य न्यायाधीश मोहम्मद याकूब मिर आणि न्या. एच. एस. थंगखिइव यांच्या खंडपीठाने अमान्य केले. - तर न्या. सेन यांचे निरीक्षण कायदेशीरदृष्टय़ा दोषपूर्ण, घटनेतील तत्त्वांशी विसंगत आणि देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा अपमान करणारे आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
- तसेच न्या. सेन यांनी मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांच्या ‘माय पीपल अपरुटेड : दी एक्सोड्स ऑफ हिंदूज फ्रॉम इस्ट पाकिस्तान अॅण्ड बांगलादेश’ या पुस्तकाचा हवालाही दिला होता.
- पकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील बिगर-मुस्लीम आणि खासीसारख्या आदिवासी समाजाला कोणत्याही मुदतीची अट न घालता भारतामध्ये वास्तव्याची मुभा द्यावी आणि कोणत्याही दस्तऐवजाविनाच त्यांना नागरिकत्व देणारा कायदा केंद्र सरकारने करावा, असे निरीक्षण न्या. सेन यांनी अधिवास प्रमाणपत्राबाबत करण्यात आलेली याचिका निकाली काढताना म्हटले होते.
- आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये चुका असल्याचेही न्या. सेन यांनी म्हटले होते. अनेक परदेशी नागरिक भारताचे नागरिक झाले आणि मूळ भारतीयांना बाहेर काढण्यात आले हे क्लेशदायक आहे, असेही सेन म्हणाले
होते.
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची राजीनाम्याची घोषणा :
- ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी शुक्रवारी कंझर्व्हेटीव्ह पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. सात मे रोजी त्या आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.
- तर त्याचदिवशी त्या कंझर्व्हेटीव्ह पक्षाच्या नेतेपदाचाही राजीनामा देणार आहेत.
- युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट कराराच्या मुद्यावर खासदारांचा पाठिंबा मिळवण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे.
- ब्रेक्झिट डीलवर तीनवेळा त्या ब्रिटीश संसदेची मंजुरी मिळवण्यात अपयशी ठरल्या.
दिनविशेष :
- 25 मे : आफ्रिकन मुक्ती दिन
- शिवाजी महाराज आग्रा येथे 25 मे 1666 मध्ये नजरकैदेत होते.
- क्रांतिकारक रास बिहारी घोष यांचा जन्म सन 1886 मध्ये 25 मे रोजी झाला.
- स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचा 25 मे 1899 रोजी जन्म झाला.
- कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर प्रथमच 25 मे 1955 मध्ये जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.
- चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी 25 मे 1977 रोजी उठवली. सुमारे 10 वर्षे ही बंदी अमलात होती.
- विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना 1991चा ज्ञानपीठ पुरस्कार 25 मे 1992 रोजी जाहीर झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा