26 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (26 डिसेंबर 2020)
चार राज्यांत पुढील आठवडय़ात करोना लसीकरण सराव फेऱ्या :
कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी जी यंत्रणा उभारण्यात आली आहे त्याच्या सुसज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने 28 आणि 29 डिसेंबर रोजी पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये सराव फेऱ्यांचे आयोजन केले आहे.
तसेच लशीच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठीचा ऑनलाइन मंच को-विनमध्ये आवश्यक ती नोंदणी करणे, चाचणीपत्र आणि त्याचे वितरण, पथकातील सदस्य तैनात करणे, सायंकाळच्या बैठका आणि अहवाल यांचा सराव फेऱ्यांमध्ये अंतर्भाव करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे कोविड-19 लशी ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या शीतकरण व्यवस्थेची चाचणी, चाचणीसाठी येणाऱ्या गर्दीचे शारीरिक अंतर ठेवून व्यवस्थापन करणे यांचाही सराव फेऱ्यांमध्ये समावेश करण्यात येणार आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
तर प्रत्येक राज्याने दोन जिल्ह्य़ांत अशा फेऱ्या आयोजित करावयाच्या आहेत. जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण भाग येथे मुख्यत्वे फेऱ्यांचे आयोजन अपेक्षित आहे.
भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिच्यासह तिचे वैयक्तिक प्रशिक्षक वुलर अकोस तसेच सहकारी प्रियांका फोगट आणि फिजियोथेरपिस्ट पूर्णिमा रामन यांच्या हंगेरी आणि पोलंडमधील 40 दिवसांच्या प्रशिक्षणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली.
तर ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’(टॉप्स) योजनेंतर्गत या शिबिराला मान्यता देण्यात आली आहे.
हंगेरीतील बुडापेस्ट येथे 28 डिसेंबर ते 24 जानेवारीदरम्यान तसेच पोलंड येथील ऑलिम्पिक सराव केंद्रात 5 फेब्रुवारीपर्यंत हे शिबीर रंगणार आहे.
सीरमने बनविली पहिली स्वदेशी न्यूमोनिया लस :
न्यूमोनिया तापाविरोधात सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेली पहिली स्वदेशी बनावटीची लस येत्या आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे.
भारतामध्ये न्यूमोनियामुळे अर्भके मरण पावण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यासाठी सीरमची स्वदेशी लस वरदान ठरणार आहे.
फायझर व ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या विदेशी कंपन्यांनी न्यूमोनियावर बनविलेल्या लसी सध्या बाजारात उपलब्ध असून त्यापेक्षा सीरमच्या लसीची किंमत खूपच कमी आहे.
सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या न्यूमोनियावरील स्वदेशी लसीची बाजारपेठेत विक्री करण्यास औषध महानियंत्रकांनी जुलैमध्ये परवानगी दिली होती.
तर या लसीच्या मानवी चाचण्यांचे तीन टप्पे सीरम इन्स्टिट्यूटने भारत तसेच आफ्रिकेतील गाम्बिया या देशात पार पडले होते.
FASTag नसेल तर थर्ड पार्टी विमाही मिळणार नाही :
1 जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे फास्टॅग आत प्रत्येक वाहनाला लावावा लागणार आहे.
तसेच जर तुमच्या वाहनाला फास्टॅग नसेल तर तुम्हाला थर्ड पार्टी विमाही काढता येणार नाहीय. एप्रिल, 2021 पासून हा नियम लागू होणार आहे. याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे.
जानेवारीपासून फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे जुन्या गाड्यांनाही फास्टॅग लावावा लागणार आहे. 2017 पासूनच्या वाहनांना फास्टॅग अनिवार्य होते.
फास्टॅग खरेदी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसनची फोटो कॉपी, वाहनाचे आरसी बुक लागणार आहे. फोटो आयडीसाठी आधार कार्ड, पासपोर्ट किंवा पॅनकार्ड द्यावे लागणार आहे.
एनएचएआयनुसार तुम्ही फास्टॅग कोणत्याही बँकेकडून खरेदी करू शकतात. यासाठी 200 रुपये घेतले जातात.
फास्टॅगवर कमीत कमी 100 रुपये रिचार्ज करता येणार आहे. सरकारने बँक आणि पेमेंट वॉलेटमधून रिचार्ज करण्य़ासाठी अतिरिक्त चार्ज लावण्यासाठी सूट दिलेली आहे.
दिनविशेष:
आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचा जन्म 26 डिसेंबर 1893 रोजी झाला होता.
कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक ‘डॉ. मुरलीधर देवीदास’ उर्फ बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 मध्ये झाला होता.
स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री ‘डॉ. सुशीला नायर‘ यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 मध्ये झाला होता.
सन 1976 मध्ये कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना करण्यात आली.
विंदा करंदीकर यांना सन 1997 मध्ये महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार जाहीर झाला होता.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.