26 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (26 नोव्हेंबर 2018)
जिम्नॅस्टिक विश्वचषकात दीपा कर्माकरला कांस्यपदक:
- भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने कलात्मक जिम्नॅस्टिक विश्वचषकातील वॉल्ट स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. जर्मनीतील कोटबस येथे सुरु असलेल्या विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी दीपाने वॉल्ट स्पर्धेत 14.316 गुण मिळवत पदक आपल्या नावे केले.
- ब्राझीलची रिबेका एंड्रेडने सुवर्ण आणि अमेरिकेच्या झेड कारे ने रौप्य पदक मिळवले. त्रिपुराच्या 25 वर्षीय दीपाने पात्रतेत 16 खेळाडूंमध्ये सहावे स्थान पटकावले होते.
- दीपाने तुर्की येथे जुलैत झालेल्या कलात्मक जिम्नॅस्टिक विश्व स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती आशियाई स्पर्धेमध्ये वॉल्ट अंतिम सामन्यात खेळू शकली नव्हती.
- बॅलन्स बीम वर्गात दीपाचे गुण 11.066 होता. ती 23व्या स्थानी राहिली होती. तर पुरुष वर्गात राकेश पात्रा पॅरलल बार पात्रता सामन्यात 13.033 गुणांबरोबर 29 जिम्नॅस्टच्या यादीत तो 16व्या स्थानावर राहिली.
- पुरुष वॉल्ट पात्रता सामन्यात आशीष कुमारलाही चांगली कामगिरी करता आली नाही. तो 27 जणांच्या यादीत 23व्या स्थानावर राहिला. अरुणा रेड्डी पहिल्या दिवशी गुडघ्याच्या दुखापतीमुळे फ्लोअर स्पर्धेत सहभागी होऊ शकली नव्हती.
काळ्या पैशाची माहिती देण्यास पीएमओचा नकार:
- परदेशातून किती काळा पैसा परत आणला याचा तपशील देण्यास पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशानंतरही वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
- चौकशी व गुन्हेगारांवरील खटल्यात अडथळे ठरू शकणारी माहिती देऊ नये अशी तरतूद माहिती अधिकार कायद्यात आहे, त्यानुसार काळ्या पैशाबाबत माहिती नाकारण्यात येत आहे, असे सांगून पंतप्रधान कार्यालयाने माहिती देण्याचे टाळले आहे.
- 16 ऑक्टोबरला केंद्रीय माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला परदेशातून आणलेल्या काळ्या पैशाबाबतचा तपशील पंधरा दिवसांत देण्याचा आदेश दिला होता त्यावर पंतप्रधान कार्यालयाने असे सांगितले, की विशेष चौकशी समिती याबाबत स्थापन करण्यात आली असून परदेशातील काळ्या पैशाची चौकशी सुरू आहे. अशी माहिती देण्याने कलम 8 (1) (एच) चे उल्लंघन होत असून त्यामुळे चौकशीच्या कामात अडथळे येऊ शकतात. सनदी अधिकारी संजीव चतुर्वेदी यांनी माहिती अधिकारात याबाबत माहिती मागितली होती.
- अशा चौकशीची कामे सरकारच्या वेगवेगळ्या गुप्तचर यंत्रणा व सुरक्षा संस्था यांच्या अखत्यारीत येते, त्यामुळे ती माहिती देणे माहिती अधिकार कायद्यात बसत नाही, असे सांगण्यात आले. 1 जून 2014 पासून किती काळा पैसा परदेशातून भारतात आणला याचा तपशील देण्यात यावा, असा अर्ज चतुर्वेदी यांनी केला होता.
- तसेच तो पंतप्रधान कार्यालयाने कलम 2 (एफ) अनुसार ही माहिती पारदर्शकता कायद्यातील माहितीच्या व्याख्येत बसत नाही असे सांगून फेटाळला होता, त्यावर चतुर्वेदी यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे दाद मागितली होती.
- सन 2005-2014 या काळात 770 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका काळा पैसा भारतात आला आहे, असे ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी या संस्थेच्या अभ्यासात म्हटले असून त्याच काळात 165 अब्ज डॉलर्स देशाबाहेर गेल्याचे सांगण्यात आले आहे.
शरयू नदीच्या किनारी श्रीरामाची भव्य मूर्ती उभी राहणार:
- उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक शरयू नदीच्या किनारी प्रभू श्रीरामाची 151 मीटर उंचीची मुर्ती उभारण्यात येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी याची घोषणा केली. विशेष म्हणजे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हे ही मुर्ती साकारणार आहेत.
- श्रीरामाच्या या भव्य मूर्तीसाठी पाच मूर्तीकारांनी आपले मॉडेल सादर केले होते. यांपैकी मराठी असलेले प्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या मॉडेलला मंजूरी देण्यात आली.
- राम सुतार हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार आहेत. भारतीय संसदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी यांचा पुतळाही राम सुतार यांनी साकारला आहे.
- रामाची ही प्रस्तावित मूर्ती त्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित अशा प्रकारे साकारण्यात येणार आहे. यामध्ये धनुर्धारी राजा, मर्यादा पुरुषोत्तम या रामाच्या प्रतिमेचा यातून आभास निर्माण होईल.
ऑस्ट्रेलियन महिलांचा टी-20 विश्वविजेतेपदाचा चौकार:
- अंतिम सामन्यात इंग्लंड महिला संघाचा 8 गड्यांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने महिला टी-20 वर्ल्डकपवर चौथ्यांदा नाव कोरले आहे.
- गार्डनसच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाचा 8 गड्याने पराभव केला. गार्डनसने प्रथम गोलंदाजी करताना तीन फलंदाजांना बाद केले तर फलंदाजी करताना 33 धावांचे योगदान दिले.
- यजमान विंडीजला पराभवाचा धक्का देत ऑस्ट्रेलियन महिला संघाने कॅरेबियन बेटांवर सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. तर इंग्लंडने बलाढ्य भारताचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
- अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे इंग्लंड महिला संघाचे फलंदाज अपयशी ठरले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकांत सर्वबाद 105 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन महिला संघाने 15.1 षटकांत 106 धावा करत अजिंक्यपद आपल्या नावे केले.
ब्रेक्झिट कराराला युरोपीय महासंघाची मान्यता:
- ब्रिटनने युरोपीय महासंघातून (युरोपियन युनियन) बाहेर पडण्याच्या (ब्रेक्झिट) कराराला युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांच्या नेत्यांनी मान्यता दिली.
- युरोपीय महासंघाच्या ब्रिटन सोडून उर्वरित 27 देशांच्या नेत्यांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला. त्यामुळे त्यावर मतदान झाले नाही. आता ब्रिटिश पार्लमेंटमध्ये या काराराला मान्यता मिळणे गरजेचे असून त्यासाठी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी सर्व राजकीय शक्ती पणाला लावली आहे.
- युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या प्रश्नावर ब्रिटनमध्ये जून 2016 मध्ये सार्वमत घेण्यात आले. त्यात बहुसंख्य नागरिकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान केले. त्यानंतर ब्रिटनने लिस्बन कराराचे 50 वे कलम लागू करून ब्रेक्झिटच्या औपचारिक प्रक्रियेला सुरुवात केली.
- तर ही प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडावी आणि ब्रेक्झिटनंतर ब्रिटनचे उर्वरित युरोपीय महासंघाशी सौहार्दपूर्ण संबंध राहावेत यासाठी करार केला जात आहे. त्या कराराला अतिम स्वरूप देण्यासाठी युरोपीयन काऊन्सिलची ब्रसेल्स येथे नुकतीच बैठक झाली. त्यात युरोपीय महासंघाच्या 27 देशांच्या नेत्यांनी सर्वानुमते ब्रेक्झिटच्या कराराला मान्यता दिली. युरोपीयन काऊन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी त्याची ट्विटरवरून अधिकृत घोषणा केली.
दिनविशेष:
- 26 नोव्हेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण दिन‘ तसेच ‘भारतीय संविधान दिन‘ म्हणून पाळला जातो.
- भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1890 मध्ये झाला.
- कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1926 मध्ये झाला.
- 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारताची घटना मंजूर झाली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.
- सन 1997 मध्ये शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
- सन 2008 मध्ये हा दिवस महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा