26 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (26 सप्टेंबर 2018)
रमाकांत आचरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार:
- वर्षभर सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करून संपूर्ण देशाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या मुंबई आणि पुण्याच्या खेळाडूंना त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ मिळाले आहे.
- यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू राहुल आवारे व नेमबाज तेजस्विनी सावंत, 19 वर्षांखालील विश्वविजेत्या क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि कबड्डीतील महाराष्ट्राचा उगवता तारा रिशांक देवाडिगा यांना मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या (एसजेएएम) पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे.
- तर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे एसजेएएमने निवेदनात म्हटले आहे.
- एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुलमध्ये 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या पुण्याच्या राहुलची ‘वर्षांतील सवरेत्कृष्ट खेळाडू’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे, तर पुण्याच्याच तेजस्विनी आणि मुंबईच्या हीना सिधू या दोघींची ‘वर्षांतील सवरेत्कृष्ट महिला’ खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. तेजस्विनी आणि हीना दोघींनीही राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते, तर हीनाने आशियाई क्रीडा स्पर्धेतही कांस्यपदकाची कमाई केली होती.
प्रिस्क्रीप्शन संबंधी डॉक्टरांना राज्य सरकारचा आदेश:
- डॉक्टर म्हटल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसते. त्यातही डॉक्टरने दिलेले प्रिस्क्रीप्शन (औषधांची चिठ्ठी) म्हणजे रुग्णांसाठी एक कोडच असते.
- बहुतांश वेळा डॉक्टरांनी कोणती औषधे लिहून दिली आहेत. हे रुग्णांना डॉक्टरांचे हस्ताक्षर न समजल्याने कळत नाही. त्यामुळे मेडिकलवाल्यासमोर ते प्रिस्क्रीप्शन टेकवायचे आणि त्याने दिलेली औषधे त्यांने सांगितलेल्या किंमतीला विकत घेण्याशिवाय रुग्णांकडे पर्याय नसतो.
- डॉक्टरांचे अक्षरच कळत नसल्याने लिहीता वाचता येणाऱ्यांनाही डॉक्टरांनी कोणती औषधे लिहून दिली आहेत हे समजत नाही. मात्र आता कमीत कमी झारखंडमधील रुग्णांना तरी या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
- कारण झारखंड सरकारने राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी डॉक्टरांना रुग्णांना देण्यात येणारे प्रिस्क्रीप्शन कॅपीटलमध्ये आणि समजेल अशा अक्षरातच लिहीण्याचे सक्त आदेशच दिला आहे.
महाराष्ट्राची ‘रुसा’ अनुदानात भरारी:
- ‘नॅक’ प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. ‘रुसा‘च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात देशातील 472 महाविद्यालयांत महाराष्ट्रातील 226 महाविद्यालयांचा समावेश आहे.
- अनुदानातून उच्च शिक्षणासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता करण्यात येणार असली, तरीही राज्याच्या हिश्श्याची शिक्षण संस्थांना प्रतीक्षा कायम आहे.
- प्रयोगशाळा, ग्रंथालय, मैदान, जिमखाना, डिजिटायझेशन अशा सुविधांचा विकास साधत महाविद्यालयांना उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवता येणार आहे.
- उच्च शिक्षणाच्या महाविद्यालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी ‘रुसा‘ची 2013 मध्ये स्थापना करण्यात आली. याच महिन्यातील रुसाच्या प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत झालेले अनुदानविषयक निर्णय पाहता, देशात ‘नॅक‘च्या मूल्यमापनात देशातील इतर राज्ये एकीकडे आणि महाराष्ट्र एकीकडे, अशी स्थिती असल्याचे चित्र पाहावयास मिळते.
जिल्हा बॅंकांचे प्रतिनिधित्व घटवले:
- महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या प्रतिनिधींची संख्या घटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
- नव्या दुरुस्तीनुसार जिल्हा बॅंकांमधून बाराऐवजी यापुढे फक्त सातच प्रतिनिधी राज्य बॅंकेवर संचालक म्हणून निवडून येणार असल्याची माहिती राज्य बॅंकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.
- वार्षिक सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य बॅंकेवरील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची मक्तेदारी संपुष्टात आणण्याच्या दिशेने राज्य शासनाने ही खेळी केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
- अनास्कर म्हणाले, की बॅंकेने सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या रचनेत्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यासाठी बॅंकेच्या उपविधीतील दुरुस्तीला सभेत मंजुरी देण्यात आली आहे. याआधीच्या संचालक मंडळात जिल्हा बॅंकांचे बारा प्रतिनिधी होते. त्यांची संख्या सातपर्यंत घटविण्यात आली आहे. प्रत्येक महसूल विभागातून एक अशी नवी रचना राहणार आहे. एक तज्ज्ञ संचालक जिल्हा बॅंकांतून मतदानाव्दारे निवडला जाईल.
- नागरी सहकारी बॅंकांमधून आता चार प्रतिनिधी नियुक्त होणार आहेत. साखर कारखाने, सूतगिरण्यांमधून एक प्रतिनिधी निवडला जात होता. त्यांची संख्या दोन इतकी करण्यात आली आहे.
- राज्यात गृहनिर्माण सहकारी संस्थांची संख्या मोठी आहे. मात्र त्यांचा एकही प्रतिनिधी बॅंकेत नव्हता. त्यासाठी त्यांना एक जागा राखून ठेवण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंक आणि ‘नाबार्ड’च्या निकषांच्या आधारे बॅंकिंग आणि कृषी क्षेत्रातील दोन तज्ज्ञ संचालक मतदानाव्दारे बॅंकेवर येणार आहेत.
भारताच्या मंगळयानास चार वर्षे पूर्ण:
- भारताच्या मंगळ मोहिमेला चार वर्षे पूर्ण झाली असून भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ही मोहीम कमी काळात यशस्वी केली होती.
- इस्रोने 5 नोव्हेंबर 2013 रोजी सोडलेले यान 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळाच्या कक्षेत स्थापित केले होते. मंगळयानाचा आयुष्यकाल सहा महिने होता पण गेली चार वर्षे हे यान मंगळावरून संदेश पाठवत आहे.
- इस्रोच्या मार्स ऑर्बिटर ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, मंगळयानाला चार वर्षे झाली आहेत. यात मंगळावरील ऑलिंपस पर्वताची छायाचित्रे असून तो सौरमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी पर्वत आहे.
- मंगळयानाचा संपर्क काही काळ तुटला होता पण नंतर तो परत प्रस्थापित करण्यात आला. नंतर त्यात काही अडचणी आल्या नाहीत. मार्स ऑर्बिटर मिशन (मॉम) यानाची बांधणी भारतातच करण्यात आली होती.
- एकाच फ्रेममध्ये मंगळाचा पूर्ण वेध घेणारे हे पहिलेच यान ठरले. मंगळाच्या एकदम टोकाला असलेल्या डिमॉस या नैसर्गिक उपग्रहाची छायाचित्रेही यानाने टिपली आहेत.
- तसेच मंगळावर पाठवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने 980 छायाचित्रे पाठवली होती. मंगळाचा संपूर्ण नकाशा तयार करण्यात ‘मॉम’ने यश मिळवले होते.
दिनविशेष:
- मिस वर्ल्ड चे संस्थापक एरिक मॉर्ली यांचा जन्म 26 सप्टेंबर 1918 मध्ये झाला.
- भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923 मध्ये झाला.
- भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 मध्ये झाला.
- 1990 या वर्षी रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे 21 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा