27 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (27 फेब्रुवारी 2019)
सनथ जयसूर्यावर आयसीसीची कारवाई:
- श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्यावर आयसीसीने कारवाई केली आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. जयसूर्याने आपल्यावरील सर्व आरोप मान्य केल्यानंतर आयसीसीने जयसूर्याला ही शिक्षा सुनावली आहे.
- श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत असताना, जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते. या आरोपांच्या तपासासाठी आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी पथक श्रीलंकेत आले होते.
- मात्र जयसूर्याने या पथकाला चौकशीत सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चौकशीला असहकार्य केल्याचा ठपका ठेवत जयसूर्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मराठी विश्वकोशमध्ये दीड हजार नव्या शब्दांची भर:
- मराठी भाषेच्या वैभवामध्ये लवकरच दीड हजार नव्या शब्दांची भर पडणार आहे. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने पूर्वी प्रकाशित केलेल्या 20 खंडांतील नोंदींच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले असून त्याचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे.
- मंडळाने विश्वकोश मुद्रित माध्यमामध्ये प्रकाशित न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असल्यामुळे यापुढील काळात विश्वकोश, कोशातील नव्या नोंदी आणि कुमार विश्वकोशाचे तीन खंड www.marathivishwakosh.org या नव्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.
- ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आणि मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी ही माहिती दिली.
- विश्वकोशातील जुन्या नोंदींच्या अद्ययावतीकरणाचे काम मंडळाने हाती घेतले आहे. हे काम सातत्याने सुरू राहणार असून गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांमध्ये 47 विषयनिहाय ज्ञानमंडळांची स्थापना करण्यात आली आहे.
- तर यामध्ये प्रामुख्याने मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद अशा संस्थांचा समावेश आहे.
- पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने विज्ञान, अभिजात भाषा आणि साहित्य, अर्थशास्त्र, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती, वैज्ञानिक चरित्रे आणि विज्ञान संस्था, सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा, संगीत अशा विविध विषयांमधील नोंदी आहेत.
आनंदवन स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित:
- चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने आयोजित आदर्श ग्राम पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा ग्रामसेवक व सरपंच यांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडला. यावेळी अनेक ग्रामपंचायतनींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आनंदवनला स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- आनंदवन हे गाव सर्व निकषांच्याही पुढे आहे. स्वच्छता, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, जलसुविधा, आरोग्य, याबाबत गावात विशेष उपक्रम राबविले जात आहेत. पाळणाघर ते पदवीधरपर्यंतचे शिक्षण व्यावसायिक शिक्षणही येथे आहे.
- तर यासोबतच अपंगाचे प्रशिक्षण केंद्र, अंध विद्यालय, मुकबधीर विद्यालय, कृषी तंत्र निकेतन व कृषी महाविद्यालय, बँकींग सेवा आदींचे प्रशिक्षणही दिले जाते. गावात शौचालयाच्या वापर शंभर टक्के केला जातो.
- आनंदवन ही पेपरलेस ग्रामपंचायत असून आंतरजातीय व आंतर विकलांग विवाह सोहळे दरवर्षी आयोजित केले जातात. एकूणच सर्व सुविधांनी समृध्द असलेले आनंदवन हे स्मार्ट ग्राम ठरले आहे.
- आनंदवन ग्रामपंचायतीला वरोरा पंचायत विभागातून सर्वात जास्त गुण मिळाविल्यामुळे स्मार्ट ग्राम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सरपंच सुधारकर कडू व ग्रामसेविका विद्या गिलबिले यांनी हा सन्मान स्वीकारला.
टी-20 क्रिकेटमध्ये सुरेश रैनाचा विक्रम:
- सुरेश रैनाने टी-20 क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा सुरेश रैना पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
- सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत उत्तर प्रदेशकडून खेळत असताना रैनाने पद्दुचेरीविरुद्ध हा विक्रम केला. या सामन्यात 12 वी धाव घेत रैनाने हा अनोखा विक्रम साधला. योगायोगाने रैनाचा हा 300 वा टी-20 सामना होता. धोनीनंतर टी-20 क्रिकेटमध्ये 300 सामने खेळणारा रैना दुसरा खेळाडू ठरला आहे.
- या यादीमध्ये विराट कोहली रैनाच्या पाठीमागे आहे. विराट कोहलीच्या नावे टी-20 क्रिकेटमध्ये 7833 धावा जमा आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये सुरेश रैना या यादीमध्ये सहाव्या स्थानावर आहे.
- तर या यादीत ख्रिस गेल पहिल्या, ब्रँडन मॅक्युलम दुसऱ्या, कायरन पोलार्ड तिसऱ्या, शोएब मलिक चौथ्या, डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानावर आहे. सध्याच्या घडीला सुरेश रैनाचे भारतीय संघातले पुनरागमन कठीण मानले जात आहे. आगामी आयपीएल क्रिकेटमध्ये रैना चेन्नई सुपर किंग्जकडून पुन्हा एकदा मैदानात उतरताना दिसेल.
लष्करी कारवाई करा पण दहशतवाद्यांवर:
- भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली असतानाच अमेरिकेने पाकिस्तानचे कान टोचले आहेत. दोन्ही देशांमधील तणाव कमी करणे गरजेचे असल्याने भारताविरोधात लष्करी कारवाई टाळावी आणि दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, असे अमेरिकेने पाकला सुनावले आहे.
- भारताच्या हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पहाटे पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे 350 दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीनंतर इम्रान खान यांनी भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर देणार, असे सांगितले होते.
- सध्या भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करुन याबाबतची माहिती दिली.
- भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली. संरक्षणसंदर्भातील सहकार्य आणि या भागातील शांतता कायम रहावी, यासंदर्भात चर्चा केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दिनविशेष:
- 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन तसेच जागतिक स्वयंसेवी संस्था दिन आहे.
- सन 1900 या वर्षी ब्रिटन मध्ये मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना झाली.
- ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये झाला, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा