28 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
28 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 डिसेंबर 2018)
तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर:
- ‘तिहेरी तलाक’ दिल्यास तीन वर्षांच्या कारावसाची शिक्षा देणारे सुधारणा विधेयक 27 डिसेंबर रोजी चार तासांच्या लोकसभेत मंजूर झाले.
- ‘तिहेरी तलाक’मधील फौजदारी तरतुदीवर काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. हे विधेयक मुस्लीम महिलांचे सबलीकरण करण्याऐवजी अन्याय करणारे असून यावर सखोल चर्चा होण्याची गरज आहे. त्यामुळे हे विधेयक संयुक्त निवड समितीकडे सोपवावे अशी मागणी विरोधकांनी केली. या विधेयकात विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणा अमान्य करण्यात आल्या. विधेयकाचा निषेध करत काँग्रेस आणि अण्णा द्रमुक यांनी सभात्याग केला.
- केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत तिहेरी तलाकविरोधी सुधारणा विधेयक सभागृहात मांडले. यापूर्वीही लोकसभेत ‘तिहेरी तलाक’ विधेयक संमत झाले आहे. मात्र, राज्यसभेत त्याला मंजूर मिळण्यात अडचणी आल्यानंतर केंद्र सरकारने यासंदर्भात वटहुकूम काढला होता.
- मूळ विधेयकानुसार गुन्हा अजामीनपात्र असला तरी त्यात सुधारणा करून न्यायदंडाधिकाऱ्यांकडून जमीन मंजूर करण्याची तरतूद समाविष्ट केली आहे. शिवाय, फक्त पत्नीचे जवळचे नातेवाईकांनाच तक्रार दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या सुधारणांसहित हे विधेयक लोकसभेत चर्चेला आले.
- सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक घटनाबाह्य़ असल्याचा निकाल दिल्यानंतरही वर्षभरात 400 हून अधिक मुस्लीम महिलांना तिहेरी तलाक दिला गेला. हे वास्तव लक्षात घेऊनच विधेयक आणले गेले आहे.
Must Read (नक्की वाचा):
लवकरच शनीची सर्व कडी नष्ट होणार:
- ‘ज्या ग्रहाभोवती कडे आहे तो ग्रह म्हणजे शनी‘, असे आपल्यापैकी सर्वांनाच सूर्यमालेमधील शनी ग्रह कसा ओळखावा हे शिकवताना सांगितले गेले आहे.
- शनी ग्रहापासून दोन लाख 80 हजार किलोमीटवर असणारी ही कडी शनीला इतर ग्रहांपासून वेगळे ठरवते. मात्र शनीची ओळख असणारी ही कडी लवकरच नष्ट होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
- हो हे वृत्त खरे आहे. वैज्ञानिकांनी अंदाज बांधलेल्या त्याहून अधिक वेगाने शनी भोवतालची ही कडी नष्ट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या शनी ग्रहाच्या भूपृष्ठभागावर या कड्यांमधून दर सेकंदाला दहा हजार किलो वजनाचा बर्फ, खडक आणि धुलिकण पडत आहेत. हा खडकांचा पाऊस म्हणजे शनीच्या कडी नष्ट होत असल्याचे संकेत आहेत.
- शनीभोवतालच्या कडी ही खडक, बर्फ आणि धुलिकणांनी बनलेली आहेत. सुर्याची युव्ही किरणे तसेच अंतराळातील इतर खगोलिय गोष्टींचा सतत मारा होत असल्याने या कडांमधील घटकांचे तुकडे होऊन ते शनीच्या भूपृष्ठभागावर पडत आहेत.
99वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूरमध्ये:
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 99वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूरमध्ये रंगणार आहे. 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान नागपूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने संमेलन पार पडणार आहे.
- संमेलनाचे यजमानपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर नागपूरला हा मान मिळाला आहे. प्रेमानंद गज्वी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आहेत. संमेलनाची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.
- 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या यजमानपदाची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. लातूर आणि नागपूर यांच्यात स्पर्धा असल्याने नेमका हा मान कोणाला मिळतोय याची सर्वांनाच उत्सुकता होती.
- एकही संमेलन न झालेल्या लातूरला हा मान मिळेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र लातूरमधील दुष्काळामुळे नागपूरचे पारडं जड होते. अखेर नागपूरला हा मान मिळाला आहे.
युवा नेमबाज मनू भाकरची दुहेरी चमक:
- राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या अंतिम फेरीत युवा नेमबाज मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल गटात कनिष्ठ आणि महिला गटात चमक दाखवीत दोन्ही स्पर्धाचे विजेतेपद पटकावले.
- युवा ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि नेमबाजी विश्वचषकात सुवर्णपदकाची कमाई केलेल्या मनूने तिची लय कायम राखली आहे. कनिष्ठ गटात मनूने 13 वर्षांच्या ईशा सिंगवर दोन गुणांच्या फरकाने मात केली. मनूने 242.1 गुणांसह प्रथम, ईशाने 240.4 गुणांसह व्दितीय तर अनुराधाने 219.3 गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
- महिलांच्या 10 मीटर पिस्तूल गटात हिना सिधूने विश्वविक्रमाची बरोबरी करीत अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे महिलांच्या स्पर्धेत हिनाच बाजी मारेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अंतिम फेरीत तिला तो चमत्कार पुन्हा करता आला नाही.
- अंतिम फेरीत हिनाला 197.3 गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर पात्रता फेरीत व्दितीय स्थानी असलेल्या मनूने अंतिम फेरीत 244.5 गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला.
प्रा. डॉ.एन.डी. पाटील यांना कणबरकर पुरस्कार:
- शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार यंदा जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ.एन.डी. पाटील यांना जाहीर झाला आहे.
- माजी केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांच्या हस्ते 12 जानेवारीला या पुरस्काराचे वितरण होईल. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रमास सुरवात होणार आहे. अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- एक लाख 51 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापुर्वी तो ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी.एन.आर राव, रयत शिक्षण संस्था, जेष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला आहे.
दिनविशेष:
- सन 1836 मध्ये स्पेनने मेक्सिको या देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा राजकीय पक्ष सन 1846 मध्ये स्थापन झाला.
- प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स चे संस्थापक आणि चेयरमन ‘धीरूभाई अंबानी‘ यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी झाला होता.
- टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला.
- सन 1948 मध्ये मुंबई मध्ये कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा