28 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 जानेवारी 2019)
विश्वनाथन आनंदची डिंग लिरेनशी बरोबरी:
- पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या 12व्या फेरीत चीनच्या डिंग लिरेनशी बरोबरी पत्करली. त्यामुळे आनंदने संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले आहे.
- आनंदने शानदार चाली रचून आपला बचाव अभेद्य ठेवला, त्यामुळे लिरेनला बरोबरी पत्करणे भाग पडले. आता फक्त एक फेरी शिल्लक राहिल्यामुळे आनंदच्या जेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
- नॉर्वेचा जगज्जेता मॅग्नस कार्लसन याने पोलंडच्या यान क्रिस्तॉफ डय़ुडा याच्यावर विजय मिळवत 8.5 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. दुसऱ्या क्रमांकावरील हॉलंडचा अनिश गिरी कार्लसनपेक्षा अध्र्या गुणाने मागे आहे. त्यामुळे या दोघांमध्येच जेतेपदाची चुरस रंगणार आहे. आनंदसह इयान नेपोमनियाची आणि लिरेन हे सात गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत.
- रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकने आपल्याच देशाच्या व्लादिमिर फेडोसीव्ह याचा पाडाव करत सलग दुसरा विजय नोंदवला. भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी सहाव्या स्थानी असून त्याची अखेरची लढत आनंदशी होणार आहे. विदितला सलग तिसऱ्या विजयाची संधी होती, मात्र हंगेरीच्या रिचर्ड रॅपोर्टविरुद्ध त्याला या संधीचे सोने करता आले नाही.
अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा भाजपामध्ये प्रवेश:
- बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरने 27 जानेवारी रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत षण्मुखानंद सभागृहात ईशाचा भाजपामध्ये प्रवेश झाला.
- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बॉलिवूडमधील कलाकारांना पक्षात घेऊन प्रचारात स्टार कॅम्पेनेर म्हणून वापरण्यावर भाजपाचा भर असणार आहे. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश केल्याचा मला आनंद आहे. या परिवारासोबत जोडले जाणे ही खरच अभिमानाची गोष्ट असल्याचे ईशा यावेळी बोलताना म्हणाली.
- षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात भाजपाच्या नवे भारतीय शिववाहतूक संघटनेची घोषणा करण्यात आली. यावेळी शिववाहतूक संघटनेची सदिच्छा दूत आणि महिला कार्याध्यक्ष म्हणून ईशाची निवड करण्यात आली. सदिच्छा दूत आणि महिला कार्याध्यक्ष अशा दुहेरी भूमिकेत ईशा काम पाहणार आहे.
देशातील ‘नारी शक्ति’ला नवी ओळख:
- भारतामधील नारी शक्ती या शब्दाला आता जागतिक स्तरावर स्थान मिळाले आहे. महिलांच्या सशक्तिकरणासाठी ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2018 मधील ‘वर्ड ऑफ द ईयर‘ म्हणून ‘नारी शक्ती‘ या शब्दाची निवड केली आहे.
- तर महिला सशक्तीकरणासाठी सरकारने केलेले प्रयत्न आणि मीटू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या शब्दाचा डिक्शनरीत समावेश करण्यात आल्याचे ऑक्सफर्डकडून सांगण्यात आले.
- जयपूर येथे आयोजित साहित्य महोत्सवात याबाबत घोषणा करण्यात आली आहे. तज्ञांनी नारी शक्ती या शब्दाच्या निवडीवर चर्चा केली. बऱ्याच मंथनानंतर ‘नारी शक्ती‘ या शब्दाचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. या आधी ऑक्सफर्डने 2017 मध्ये ‘आधार‘ या शब्दाचा डिक्शनरीत समावेश केला होता.
- महिलांचे अधिकार आणि प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या प्रतिनिधीत्वासंदर्भात ‘नारी शक्ती‘ या हिंदी शब्दाचा उपयोग केला जातो. स्वत:च्या मनाप्रमाणे जगणाऱ्या महिलांसाठी नारी शक्ती हा शब्द वापरला जातो, असे मत ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या आहे.
पंतप्रधानांनी केले सोनाली हेळवीचे कौतुक:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या 21 वर्षांखालील महिला कबड्डी संघाची कर्णधार सोनाली हेळवी हिचा आकाशवाणीवरील प्रसारित ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख केला. त्याचप्रमाणे खेलो इंडियातील चांगली कामगिरी करणार्या खेळाडूंचेही मोदी यांनी कौतुक केले.
- पंतप्रधान मोदी म्हणाले, न्यू इंडियाच्या निर्माणात फक्त मोठ्या शहरांतील लोकांचेच नव्हे, तर छोटे शहर, खेड्यापाड्यांतून येणारे युवा, मुलांच्या क्रीडा गुणवत्तेचेदेखील खूप मोठे योगदान आहे, हेच खेलो इंडियातून स्पष्ट होत आहे.
- तसेच पुढे त्यांनी सांगितले की, जानेवारीत पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 18 खेळांत जवळपास 6 हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला. जेव्हा स्थानिक पातळीवर खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतो तेव्हा तो जागतिक पातळीवरही सर्वोत्तम कामगिरी करील. या वेळेस ‘खेलो इंडिया’ प्रत्येक राज्यातील खेळाडूंनी आपापल्या पातळीवर चांगली कामगिरी केली आहे.
- पदक जिंकणार्या अनेक खेळाडूंचे जीवन जबरदस्त प्रेरणादायक ठरले आहे. याविषयी पंतप्रधानांनी बॉक्सिंगमध्ये रौप्यपदक जिंकणारा खेळाडू आकाश गोरखा याचा उल्लेख केला. आकाश याचे वडील पुणे येथे एका कॉम्प्लेक्समध्ये गार्डचे काम करीत आहेत आणि ते आपल्या कुटुंबासह एका पार्किंग शेडमध्ये राहतात.
दिनविशेष:
- स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 मध्ये झाला होता.
- स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म 28 जानेवारी 1899 मध्ये झाला होता.
- शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे 4थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म 28 जानेवारी 1925 मध्ये झाला होता.
- एच.एम.टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना सन 1961 मध्ये बंगलोर येथे सुरू झाला.
- सन 1977 मध्ये मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे 15वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा