28 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
28 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 नोव्हेंबर 2018)
हॉकी विश्वचषक स्पर्धा 2018:
- मायदेशातील क्रीडारसिकांच्या साक्षीने भारतीय हॉकी संघ 28 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीने विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. गेल्या 43 वर्षांची विश्वविजेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे. पहिल्या दिवशी बेल्जियम आणि कॅनडा यांच्यातील लढतसुद्धा होणार आहे.
- आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाने 1975 मध्ये अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची किमया साधली होती. त्यानंतर मात्र भारताचा हॉकीचा सुवर्णकाळ हरपला.
- नेदरलँड्स, जर्मनी या युरोपियन संघांसह ऑस्ट्रेलियाच्या मक्तेदारीला प्रारंभ झाला. गेली चार दशके या संघांचे हॉकीमधील जागतिक स्पर्धावर वर्चस्व दिसून आले आहे. आता कलिंगा स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेत क-गटात समाविष्ट असलेल्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावरील भारताकडून पुन्हा सुवर्णकामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
- मागील दोन वेळा विश्वविजेतेपदावर वर्चस्व असणारा ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, जर्मनी आणि ऑलिम्पिक विजेता अर्जेटिना संघ या स्पर्धेत असल्यामुळे भारताला अब्जावधी क्रीडारसिकांच्या अपेक्षांची पूर्तता करणे सोपे जाणार नाही.
Must Read (नक्की वाचा):
बॉक्स ऑफिसवर ‘मुळशी पॅटर्न’ चा बोलबाला:
- प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित बहुचर्चित, काल्पनिक कथेवर आधारीत ‘मुळशी पॅटर्न‘ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड सुरु केली.
- विकेंड संपल्यानंतर ही ‘मुळशी पॅटर्न‘ ची जादू कायम असल्याचे बघायला मिळाले. मोठ्या शहरामधील मल्टीप्लेक्ससह छोट्या शहरात आणि ग्रामीण भागातील सिंगल स्क्रीनवर सुद्धा हा चित्रपट प्रेक्षकांची तुफान गर्दी खेचत आहे.
- पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचे खेड्यापाड्यातील प्रेक्षक खास चित्रपट पहाण्यासाठी वाहनेकरून जवळचे थिएटर गाठत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे, यामुळे अनेक ठिकाणी बल्क बुकिंग मोठ्या प्रमाणावर होत असून रिपीट येणारा प्रेक्षक मोठा आहे व तो कलाकारांसोबत संवाद म्हणतो.
- ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा विषय वास्तवाच्या जवळ जाणारा आहे, त्याची मांडणी दमदार झाली आहे. चित्रपटातील अनेक संवाद विचार करायला भाग पाडतात, कलाकारांचा अभिनय उत्तम आहे, गाणी सुंदर आहेत, तांत्रिकदृष्ट्या चित्रपट उच्चदर्जाचा आहे, समाजाला सकारात्मक संदेश देत हा चित्रपट मनोरंजन करतो अशी प्रतिक्रिया सामान्य प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
- तसेच हा सामाजिक विषय मांडणारा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्रित पहावा असे मत प्रेक्षक सोशल मिडीयावर नोंदवत आहेत.
केशव गिंडे यांना भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर:
- भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांची निवड झाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
- दर वर्षी राज्य सरकारतर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रांत प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराला भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.
- सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांची शिफारस केली होती. या समितीत उस्मान खान, सदानंद नायमपल्ली, शाम गुंडावार, भारती वैशंपायन, बाळ पुरोहित आणि शुभदा पराडकर या मान्यवरांचा समावेश आहे.
एटीएममधून पैसे काढणे महाग पडणार:
- बँकेतून चेकबुक मागवणे, एटीएमधून पैसे काढणे, बँकेत रक्कम जमा करण्यासाठी तसेच जनधन खात्यांसाठीही बँकेला शुल्क देण्याची वेळ येऊ शकेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरलंय सरकारच्याच एका खात्याचा निर्णय.
- बँकांकडून देण्यात येणाऱ्या मोफत सेवांवरील सेवाकरापोटी 40 हजार कोटी रुपये भरण्याची नोटीस जीएसटी संचलनालयाने बँकांना दिली आहे. ही नोटीस मागे न घेतल्यास बँकांनी आता या सुविधा मोफत देणे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा वाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत जाऊन पोचला आहे.
- एप्रिल महिन्यात जीएसटी संचलनालयाने बँकांमार्फत ग्राहकांना देण्यात येणाऱ्या मोफत सेवांवरील सेवाकरापोटी 40 हजार कोटी रुपये भरण्याची नोटीस दिली होती. चालू आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये महसूल विभागाने संबंधित बँकांवर सेवा कर चुकता करण्यासाठी दबाव टाकला होता.
- वेळेत सेवा कर सरकारी तिजोरीत न जमा केल्यास दंड आणि व्याज आकारण्याचीही भीती त्यांना दाखविण्यात आली. 12 टक्के सेवा कराची रक्कम न चुकवल्यास एकूण रकमेवर 18 टक्के कर आणि 100 टक्के दंड आकारण्यात येणार असल्याचेही महसूल विभागाने स्पष्ट केले. यानंतर, या प्रकरणी केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि बँकांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून, त्यामध्ये अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
- बँकांच्या मते याप्रकरणी तोडगा न निघाल्यास ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या मोफत सेवा दिल्या जाणार नाहीत. एका खासगी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार आता हे प्रकरण पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय निर्णय घेतात यावर पुढचा निर्णय अवलंबून आहे.
ज्येष्ठ गायक मोहम्मद अझीझ यांचे निधन:
- बॉलिवूडमधील ज्येष्ठ गायक मोहम्मद अझीझ यांचे 27 नोव्हेंबर रोजी नानावती रुग्णालयात निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. बॉलिवूडसह बंगाली व ओडिया चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली होती.
- मोहम्मद अझीझ यांचा कोलकता येथे गाण्याचा कार्यक्रम होता. 27 नोव्हेंबर रोज दुपारी मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी त्यांना नानावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
- मोहम्मद अझीझ यांचा जन्म 2 जुलै 1954 रोजी पश्चिम बंगालमधील अशोकनगर मध्ये झाला होता. 1980-90 दरम्यान त्यांनी सुपरहिट गाणी गायली. ‘आपके आ जाने से…’ हे गाणे आजही प्रसिद्ध आहे.
- ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, गोविंदा, ऋषी कपूर, मिथून चक्रवर्ती व अन्य अभिनेत्यांसाठी त्यांनी प्रामुख्याने गायन केले. गायिका लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पोडवाल व कविता कृष्णमुर्ती यांच्यासोबत त्यांनी अनेक गाणी गायली. विविध भाषांमधील 20 हजारहून अधिक गाणी त्यांनी गायली आहेत.
दिनविशेष:
- पनामाला स्पेनपासुन सन 1821 मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते.
- डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला ‘हेलन व्हाईट‘ यांचा जन्म 28 नोव्हेंबर 1853 मध्ये झाला होता.
- 28 नोव्हेंबर 1890 हा दिवस श्रेष्ठ समाजसुधारक ‘जोतिराव गोविंदराव फुले‘ ऊर्फ ‘महात्मा फुले‘ यांचा स्मृतीदिन आहे.
- जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी सन 1967 मध्ये पल्सार तार्यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.
- तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना सन 2000 मध्ये जाहीर झाला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा