29 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (29 मार्च 2019)
मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे नवे मॅनेजर ‘सोल्सजार’:
- मँचेस्टर युनायटेड हा संघ फुटबॉल क्लब इतिहासातील सर्वात नामांकीत संघांपैकी एक म्हणून ओळखला जातो. ओले गुन्नर सोल्सजार मँचेस्टर युनायटेड फुटबॉल संघाचे नवे व्यवस्थापक झाले आहेत. याआधी ते नॉर्वे नॅशनल फुटबॉल संघाचे मॅनेजर म्हणून कार्यरत होते.
- 48 वर्षीय ओले गुन्नर सोल्सजार 1996 ते 2007 दरम्यान इंग्लिश प्रिमिअर लीगमध्ये मँचेस्टर युनायटेड क्लबचा खेळाडू म्हणून खेळत होते. या संघाकडून खेळताना त्यांनी 235 सामन्यांत 91 गोल मारले आहेत. आज 11 वर्षानंतर पुन्हा एकदा ते मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये परतले आहेत.
- लहानपणापासूनच त्यांना प्रशिक्षक म्हणून नाव कमवायचे होते. प्रशिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली आणि ते मँचेस्टर युनायटेड संघाचे मॅनेजर झाले आहेत.
- तर याआधी त्यांनी Molde, Cardiff City, व Norway national football फुटबॉल संघांचे मॅनेजर म्हणून काम केले आहे. मँचेस्टर युनायटेड फुटबॉल संघाचा मॅनेजर झाल्याचा मला अभिमान वाटत आहे. मी माझा संघाला आणखी उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करेन अशी व्यवस्थापक बनल्यानंतर ओले गुन्नर सोल्सजार यांनी या भावना व्यक्त केल्या.
10 टक्के आरक्षणावर 8 एप्रिलला सुनावणी:
- समाजाच्या सर्व वर्गातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ लोकांना नोकऱ्यांमध्ये, तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय 8 एप्रिलला सुनावणी करणार आहे.
- या याचिकांची सुनावणी करतानाच, या मुद्दय़ावर घटनापीठाने निर्णय द्यायला हवा होता, या याचिकाकर्त्यांपैकी काही जणांनी केलेल्या युक्तिवादाचाही आम्ही विचार करू, असे न्या. शरद बोबडे व न्या.एस.ए. नझीर यांच्या खंडपीठाने सांगितले.
- आपल्यासह अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल हे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे हजर राहणार असल्यामुळे याचिकांची सुनावणी पुढे ढकलावी, असे केंद्र सरकारच्या वतीने युक्तिवाद करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुरुवातीलाच सांगितले.
- याचिकाकर्त्यांपैकी एकाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 11 मार्चला दिलेल्या आदेशाचा संदर्भ देताना, या याचिका घटनापीठाकडे सोपवाव्यात की, नाही या मुद्दय़ावर विचार व्हायला हवा असे सांगितले.
- 103व्या घटनादुरुस्तीनुसार रेल्वे 10 टक्के आरक्षणासह भरती करणार असल्याचे धवन यांनी सांगितले. त्यावर, हा मुद्दा या प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या आधीन राहील, असे न्यायालयाने तोंडी सांगितले.
आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांना सुवर्ण:
- तैपेईमधील ताओयुआन येथे सुरू असलेल्या आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई केली.
- रवी कुमार आणि ईलाव्हेनिल व्हालारिव्हान जोडीने 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवले. पात्रता फेरीत रवी आणि ईलाव्हेनिल यांनी 837.1 गुणांसह आघाडी मिळवली होती.
- मात्र पाच संघांचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत पार्क सुनमिन आणि शिन मिन्की या कोरियाच्या जोडीने त्यांच्यावर सरशी साधली.
- कोरियाने 499.6 गुणांसह सुवर्णपदक मिळवले, भारतीय जोडीच्या खात्यावर 498.4 गुण जमा होते. चायनीज तैपेईच्या जोडीला कांस्यपदक मिळाले. दीपक कुमार आणि अपूर्वी चंडेला या दुसऱ्या भारतीय जोडीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
- तसेच स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सौरभ चौधरी आणि मनू भाकर जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. याचप्रमाणे विजयवीर सिधू आणि ईशा सिंग जोडीने कनिष्ठ गटात सुवर्णपदक पटकावले. आता पाच पदकांची कमाई असणारा भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
श्वेतवर्णीय वर्चस्ववादाबाबतच्या संदेशांवर फेसबुकची बंदी:
- समाजात व्देष पसरवणाऱ्या मजकुराला लगाम घालण्यासाठी श्वेतवर्णीय वर्चस्ववाद आणि अलिप्ततावादाचे समर्थन वा पुरस्कार करणाऱ्या मजकुरावर बंदी घालण्याची घोषणा फेसबुकने केली.
- वंशभेदाला प्रोत्साहन देणाऱ्या मजकुरावरील बंदी पुढील आठवडय़ापासून अमलात येईल. ही बंदी फेसबुकच्या इन्स्टाग्राम या छायाचित्रकेंद्रित समाज माध्यमावरील मजकुरालाही लागू असेल. वंशभेदविषयक मजकूर व्देष पसरवणाऱ्या गटांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला आमच्या समाजमाध्यम सेवांवर थारा नाही, असे फेसबुकच्या प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे.
- लोकांमध्ये धर्म-वंशाधारित व्देष पसरवणाऱ्या संदेशांना प्रतिबंध करण्यासाठी फेसबुकने श्वेतवर्णीय कट्टरतावादाचे समर्थन करणाऱ्या संदेशांवर यापूर्वीच बंदी घातली आहे.
- परंतु व्यापक राष्ट्रवाद आणि राजकीय स्वातंत्र्याच्या अभिव्यक्तीचे कारण देत फेसबुकने काही संदेशांना या बंदीतून वगळले होते. असे असले तरी, तज्ज्ञ आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिकांशी केलेल्या चर्चेतून श्वेतवर्णीय वर्चस्ववाद आणि अलिप्ततावादाचा संबंध व्देष पसरवणाऱ्या गटांशी असल्याचे आढळून आले आहे.
- ‘दुर्दैवाने लोक आमच्या यंत्रणेचा वापर समाजात व्देष पसरवण्यासाठी करतात, परंतु आम्ही श्वेतवर्णीय वर्चस्ववाद आणि अलिप्ततावादाचे समर्थन वा त्याला प्रोत्साहन देण्याचे प्रकार सहन करणार नाही,’ असे फेसबुकतर्फे यासंदर्भात स्पष्ट करण्यात आले आहे.
दिनविशेष:
- सन 1849 मध्ये ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले होते.
- अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक ‘पाडुरंग लक्ष्मण‘ तथा ‘बाळ गाडगीळ‘ यांचा जन्म 29 मार्च 1926 मध्ये झाला होता.
- 1968 या वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना झाली.
- सन 1982 मध्ये एन.टी. रामाराव यांनी तेलगू देसम या पक्षाची स्थापना केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
View Comments
Very useful and interesting news.
Super