3 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
3 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 जानेवारी 2019)
सचिनला घडवणारे भीष्माचार्य ‘रमाकांत आचरेकर’ कालवश:
- भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचे लहानपणीचे प्रशिक्षक रमांकात आचरेकर यांचे 2 जानेवारी रोजी निधन झाले आहे. वयाच्या 87व्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
- आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जाणाऱ्या आचरेकर सरांनी भारतीय क्रिकेटमधल्या एका पिढीला घडवण्यात मोठा वाटा उचलला आहे.
- सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू अशा अनेक खेळाडूंना आचरेकर सरांनी मार्गदर्शन केले. आचरेकर सरांच्या दोन मुली आजही क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून नवीन मुलांना प्रशिक्षण देत आहेत.
- बीसीसीआयनेही यानंतर ट्विट करुन रमाकांत आचरेकर यांना आदरांजली वाहिलेली आहे. काही दिवसांपूर्वी आपली क्रिकेट अकादमी सुरु करायच्या आधी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी आचरेकर सरांची भेट घेतली होती. त्यांची ती भेट अखेरची ठरली. आचरेकर सरांच्या निधनावर क्रीडा जगतातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
Must Read (नक्की वाचा):
देशातील 123 कोटी नागरिक झाले आधार कार्डधारक:
- देशातील 123 कोटी नागरिकांपर्यत आधार कार्ड पोचवण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. जवळपास 123 कोटी नागरिक आधार कार्डधारक झाले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी राज्यसभेत दिली आहे.
- एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना हंसराज अहीर यांनी सांगितले की 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी 8 लाख 54 हजार 977 इतकी आहे.
- युआयडीएआयने 30 नोव्हेंबर 2018 पर्यत आतापर्यत एकूण 122 कोटी 90 लाख आधार कार्डची नोंदणी केली आहे. यातील 6 कोटी 71 लाख इतक्या पाच वर्षांखालील लहान मूलांची आधार कार्डसाठी नोंदणी करण्यात आली आहे. तर 5 ते 18 वयोगटातील 29 कोटी 2 हजार आधार कार्डची नोंदणी झाली आहे. देशातील सध्याचा जन्मदर 20.4 असून मृत्यूदर 6.4 इतका आहे.
विजया, देना आणि बँक ऑफ बडोदाच्या विलीनीकरणाला केंद्राची मंजुरी:
- केंद्रीय मंत्रिमंडळाने विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. आता विजया बँक आणि देना बँकेचे लवकरच बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्यात येईल.
- बँक ऑफ बडोदाने (बीओबी) नुकताच ‘शेअर स्वॅप रेशो’ निश्चित केला आहे. त्यानुसार विजया बँकेच्या 1,000 शेअरच्या बदल्यात बीओबीचे 402 शेअर देण्यात येणार आहे. तर देना बँकेच्या शेअरधारकांना 1,000 शेअरच्या बदल्यात बीओबीचे 110 शेअर मिळतील.
- गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सरकारने विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण जाहीर केले होते. त्यामुळे एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेनंतर बँक ऑफ बडोदा ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी बँक ठरणार आहे.
- दि. 2 जानेवारी रोजी मुंबई शेअर बाजारात बँक ऑफ बडोदाचा शेअर 3.16 टक्क्यांच्या घसरणीसह 119.40 रुपयांवर व्यवहार करत स्तिरावला. तर, विजया बॅंक आणि देना बँकेचा शेअर अनुक्रमे 51.50 आणि 17.95 रुपयांवर बंद झाला.
रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्काराचे वितरण:
- तामिळनाडूतील समुद्र किनाऱ्यावरील वाळूउपशाचा प्रश्न, पंजाबमधील महिला क्रिकेटपटूंच्या मनात रुजत असलेली महत्त्वाकांक्षेची बीजे, आपल्या शहरांच्या स्वच्छतेचा वसा घेतलेल्या कामगारांचे जिणं आणि त्यांच्या जीवनाची अखेर.. या आणि अशाच काही मुद्दय़ांना निर्भीड स्पर्श करणाऱ्या बातम्या आणि छायाचित्रं यांचा 13व्या ‘रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ या पत्रकारितेतील प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने नवी दिल्लीत 4 जानेवारीला गौरव केला जाणार आहे.
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांच्याहस्ते देशभरातील वर्तमानपत्रे, नियतकालिके, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांतील 18 विविध गटांत 2017 मध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या 29 पत्रकारांचा गौरव केला जाईल.
‘आधार’ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर:
- कोणावरही आधार क्रमांकासाठी सक्ती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे केंद्र सरकारने लोकसभेत आधारविषयक सुधारणा विधेयक सादर केले. या विधेयकानुसार टेलिफोन कंपनी वा बँकांना ग्राहकांना स्वत:हून आधारचे प्रमाणीकरण करता येईल.
- केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर देताना स्पषट केले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी सुसंगत सुधारणा विधेयकात केल्या असल्यामुळे नागरिकांच्या खासगी हक्कांवर गदा येणार नाही. आधारच्या प्रमाणीकरणाची सक्ती कोणावरही केली जाणार नाही. शिवाय, आधारमधील माहिती उघड केली जात नाही. माहितीच्या गोपनीयतेची काळजी घेतली जात असल्याचे न्यायालयानेही मान्य केले आहे.
- आधारची माहिती अत्यंत सुरक्षित असल्याचा दावा प्रसाद यांनी केला. आधारमुळे थेट रोख रक्कम लाभार्थीना देणे शक्य झाले असून त्यामुळे सरकारचे 96 हजार कोटी रुपये वाचले आहेत.
- आधार योजना जागतिक बँक तसेच आंतरराष्ट्रीय नाणनिधीनेही वाखाणली आहे. ज्या नागरिकांना आधार क्रमांक उघड करायचा नसेल त्यांना पर्यायी क्रमांक देण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे खासगी हक्क अबाधित राहू शकेल. शिवाय, या प्रक्रियेवर सरकारचे नियंत्रण राहणार असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.
- तसेच आधारची माहिती सुरक्षित राहावी या दृष्टीने माहिती सुरक्षा विधेयकही लवकरात लवकर संसदेत मांडले जाणार असल्याची माहितीही प्रसाद यांनी दिली.
दिनविशेष:
- 3 जानेवारी हा दिवस ‘बालिकादिन‘ तसेच ‘अॅक्युपेशन थेरेपी दिन‘ म्हणून पाळला जातो.
- पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारकसावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.
- हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म 3 जानेवारी 1921 मध्ये झाला होता.
- सन 1950 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.
- 3 जानेवारी 1952 रोजी स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
- नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर सन 2004 मध्ये राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा