31 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (31 डिसेंबर 2018)
नवे वर्ष खगोलप्रेमींसाठी पर्वणी:
- येत्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नव्या वर्षांमध्ये तीन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे पाहण्याचा योग जुळून आला असून नऊ वर्षांनी भारतातून ग्रहणे पाहण्याची संधी मिळणार असल्यामुळे हे वर्ष खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. तर आगामी वर्षांमध्ये केवळ दोन सुट्टय़ा रविवारी आल्याने चाकरमान्यांची चंगळ होणार आहे.
- नव्या वर्षांत (2019) तीन सूर्य ग्रहणे आणि दोन चंद्र ग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी 16 जुलै रोजी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण आणि 26 डिसेंबर रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे.
- दक्षिण भारताताली कोईम्बतूर, कन्नूर, मंगलोर, उटी या ठिकाणांहून सूर्यग्रहणाच्या कंकणाकृती स्थितीचे दर्शन घडणार आहे. मुंबईमधूनही हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार असून 85 टक्के सूर्य ग्रासित दिसणार आहे.
- तसेच यापूर्वी 15 जानेवारी 2010 रोजी झालेले कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून दिसले होते. मात्र 11 नोव्हेंबर 2019 रोजी होणारे बुधाचे अधिक्रमण भारतातून दिसणार नाही. तथापि, 21 जानेवारी 2019 आणि 19 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री आकाशात सुपरमून दिसणार आहे, असे खगोलअभ्यासक पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले आहे.
‘पीएच.डी.’ प्रवेशासाठी पाच टक्के गुणांची सवलत:
- पीएच.डी. आणि एम. फिल अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्णतेच्या पात्रतेत अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि इतर मागास प्रवर्ग तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना आता तब्बल पाच टक्के गुणांची सवलत मिळणार आहे.
- विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे. त्यामुळे प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या सवलतीचा फायदा होऊ शकणार आहे.
- तर या नव्या निर्णयामुळे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांसाठी गुणांची पात्रता आता 50 टक्क्यांहून 45 टक्के झाली आहे.
- प्रवेश प्रक्रियेत राखीव जागांवर पुरेसे उमेदवार उपलब्ध नसल्याने या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया संपल्यावरही एका महिन्याच्या आत प्रवेशासाठी विशेष मोहीम आखण्याची सूचनाही आयोगाने दिली आहे.
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘पेट’ प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा मिळेल. राखीव प्रवर्गाच्या अधिकाधिक जागांवर प्रवेश होण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे आयोगाने परिपत्रकात नमूद केले आहे.
दीपिका कक्कर ठरली ‘Big Boss 12’ विजेती:
- छोट्या पडद्यावरची ‘आदर्श सून’ आणि ‘ससुराल सिमर का‘ फेम दीपिका कक्कर इब्राहिम ‘बिग बॉस 12‘ ची विजेती ठरली आहे.
- करणवीर बोहरा, दीपक ठाकूर, श्रीशांत या विजेतपदाच्या प्रबळ दावेदारांना मात देत दीपिकाने ‘बिग बॉस 12’ स्पर्धा जिंकली आहे. अंतिम फेरीत दीपिका आणि श्रीसंत या दोघांमध्ये चुरस पाहायला मिळाली अखेर दीपिकाने या खेळात बाजी मारली.
- दिनांक 30 डिसेंबर रोजी ‘बिग बॉस 12’ चा फिनाले रंगला. या पर्वाचा विजेता कोण याची उत्सुकता शोच्या चाहत्यांना लागून होती. अखेर दीपिकाने श्रीसंतला टक्कर देत ‘बिस बॉस’च्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
- सलग 105 दिवस उत्तम खेळी करत दीपिका या घरात टिकून होती. त्यामुळे घरातील इतर मंडळींचाच नाही तर चाहत्यांचाही तिला मोठा पाठिंबा होता.
- दीपिका आणि श्रीसंत यांनी शेवटपर्यंत उत्तम खेळी केली. दीपिका श्रीशांतला तिचा भाऊ मानते, त्यामुळे अंतीम स्पर्धा ही खऱ्या अर्थाने बहिण भावामध्ये रंगली. पण, अखेर या खेळात दीपिकाची सरशी झाली.
आता एसटी कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांची बालसंगोपन रजा:
- मुलांच्या संगोपनासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.
- महिला कर्मचाऱ्यांबरोबरच पत्नी हयात नसलेले कर्मचारी; तसेच पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळलेली असलेल्या कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकेल.
- महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती काळात सहाऐवजी नऊ महिन्यांची रजा देण्याचा निर्णय महामंडळाने यापूर्वीच घेतला आहे. त्याचाच पुढील टप्पा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
- नोकरी करीत असताना महिला कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा मुलांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. विशेषत: परीक्षांच्या काळात मुलांना पालकांची अधिक गरज असते. या बाबी लक्षात घेत महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिनविशेष:
- 31 डिसेंबर सन 1600 मध्ये ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
- आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म 31 डिसेंबर 1871 रोजी झाला होता.
- सन 1879 मध्ये थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले होते.
- युनायटेड किंग्डम सन 1985 मध्ये युनेस्कोचे सदस्य बनले.
- 31 डिसेंबर 1999 मध्ये पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा