4 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 ऑगस्ट 2018)
ललिता बाबर बनणार उपजिल्हाधिकारी:
- माणची वायुकन्या ऑलिंपिक खेळाडू ललिता बाबर-भोसले या उपजिल्हाधिकारी होणार, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले.
- ललिता बाबर-भोसले यांनी रिओ ऑलिंपिकमध्ये 3000 मीटर स्टिपलचेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून पहिल्या दहामध्ये येण्याचा मान पटकावला होता. या खेळात नवीन राष्ट्रीय विक्रमही आपल्या नावे केला आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- राज्य शासनाच्या सचिवस्तरीय समितीने शासकीय सेवेत घेण्याबाबत ललिता यांच्या नावाची शिफारस केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या शिफारशीस मान्यता दिली.
- तसेच यामुळे ललिता यांची उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती होणार आहे. महसूल विभागाच्या मान्यतेनंतर अंतिम नियुक्तीचा आदेश निघणार आहे.
‘कॉग्निझंट’ कंपनी कर्मचारी कपात करणार:
- कॉग्निझंट या आयटी क्षेत्रातल्या अमेरिकी मल्टीनॅशनल कंपनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार आहे. वरिष्ठांना दिल्या जाणाऱ्या वेतनातून 3.5 कोटी डॉलर वाचवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. सरत्या तिमाहीत कॉग्निझंटने निकाल अपेक्षेप्रमाणे लागलेले नाहीत. कंपनीचे मुख्यालय न्यु जर्सी येथे आहे.
- कॉग्निझंटने 2017 साली 4,000 कर्मचाऱ्यांची कपात केली होती. त्याहीआधी कंपनीने 400 वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घ्यायला लावली होती.
- कंपनीने वरच्या पदावरील जागा रिक्त करण्याचे धोरण स्विकारले असून ही स्वेच्छा निवृत्ती नसून वरिष्ठ पदे रिक्त करून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे मत कॉग्निझंटचे अध्यक्ष राज मेहता यांनी व्यक्त केले आहे.
- मात्र नेमके किती वरिष्ठ पदे रिक्त होणार आहेत हे मेहता यांनी स्पष्ट केले नाही. कंपनीच्या जगभरातल्या कार्यालयामधून हे धोरण अवलंबले जाणार असून फक्त एखाद्या विभागापुरतेच ते मर्यादित नाही, असेही मेहता यांनी सांगितले. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ पातळीवरील कमर्चाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी हे धोरण अवलंबण्यात येणार आहे.
- चालू तिमाहीमध्ये कॉग्निझंटमधल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत 7,500 कर्माचाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन ती आता 2,68,900 वर पोचली आहे. कंपनीच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि पदोन्नती तिसऱ्या तिमाहीत दिली जाणार आहे. तर वरिष्ठ कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि पदोन्नती चौथ्या तिमाहीत दिली जाणार असल्याची माहीती कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी केरन मॅकलाफलीन यांनी दिली आहे.
आरबीआयने 104 वित्त संस्थांची नोंदणी केली रद्द:
- रिझर्व्ह बँकेने जेमतेम एका आठवड्यात 104 वित्त संस्थांची नोंदणी रद्द केली आहे. या संस्था बिगर बँकिंग वित्त पुरवठा (एनबीएफसी) श्रेणीतील आहेत. वित्त पुरवठा क्षेत्राबाबत रिझर्व्ह बँकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
- बँकिंग व वित्त क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब जोमाने सुरू झाला आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेनेही ‘नो यूअर कस्टमर'(केवायसी) ची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना बँका व वित्त संस्थांना दिले आहेत. त्याअंतर्गत वित्त साह्य घेणार्या प्रत्येक ग्राहकाची इत्यंभूत माहिती संस्थेकडे असावी, असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश आहेत. हे निर्देश न पाळणार्या संस्थांवर बँकेने कडक कारवाई सुरू केली आहे.
- बँकेने 27 जुलै ते 3 ऑगस्ट या एका आठवड्यात देशभरातील 104 वित्त संस्थांचे व्यवहार करण्याचे अधिकार काढून घेतले. त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे. यामध्ये प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, पंजाब, हरयाणा, पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील वित्तिय संस्थांचा समावेश आहे.
- तसेच रिझर्व्ह बँकेने मागील महिन्यातही 23 जुलैपर्यंत जवळपास 65 एनबीएफसींचे प्रमाणपत्र रद्द केले होते. त्यामध्ये 27 संस्था राज्यातील होत्या.
बांधकाम उद्योगातही आता सिनेस्टार सदिच्छादूत:
- बांधकाम उद्योगाने आतापर्यंत घरांच्या विक्रीसाठी ग्राहकांना विविध प्रलोभने देत आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. क्वचितच एखाद्या सिनेतारकेकडून गृहप्रकल्पाची जाहिरात केली जात आहे. परंतु आता काही बांधकाम कंपन्यांनी गृहप्रकल्पांच्या विपणनासाठी ब्रँड अॅम्बेसिडर नेमले आहेत.
- अभिनेता अक्षय कुमार याच्यासह अनुष्का शर्मा तसेच कंगना रानावत या अभिनेत्री सध्या आघाडीवर आहेत. मुंबई तसेच महानगर परिक्षेत्रातील गृहप्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये ते झळकू लागले आहेत.
- निश्चलनीकरणानंतर आधीच मंदीत असलेला बांधकाम उद्योग पार कोलमडला होता. त्यातच रिएल इस्टेट कायद्यानुसार महारेरा या नियामक प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर बांधकाम उद्योग ठप्प झाला होता. आता हळूहळू हा उद्योग कात टाकू लागला आहे.
- महारेरामध्ये आपल्या गृहप्रकल्पांची नोंदणी करून अनेक विकासकांनी आता घरांच्या विक्रीवर भर दिला आहे. घरांच्या किमती आणखी कमी होतील याच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकाला आपल्याकडे खेचण्यासाठी काही कंपन्यांनी ब्रँड अॅम्बेसिडर नियुक्त केले आहेत.
दिनविशेष:
- कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म 4 ऑगस्ट 1845 मध्ये झाला.
- पतंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म 4 ऑगस्ट 1863 मध्ये झाला.
- साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना.सी. फडके यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 मध्ये झाला.
- सन 1956 मध्ये भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
- मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सन 2001 मध्ये 4 ऑगस्ट रोजी स्थापन झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा