4 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 फेब्रुवारी 2019)
ऋषी कुमार शुक्ला ‘सीबीआय’चे नवे संचालक:
- सीबीआय संचालकपदाचा तिढा अखेर सुटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आयपीएस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती केली आहे. शुक्ला 1984 बॅचचे अधिकारी असून ते मध्य प्रदेशचे माजी डीजीपी आहेत.
- शुक्ला यांची दोन वर्षांसाठी सीबीआय संचालकपदावर निवड झाली असून संस्थेची विश्वासहर्ता पुन्हा निर्माण करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोन अधिकाऱ्यांच्या वादात सीबीआयच्या विश्वसनीयतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- ऋषी कुमार शुक्ला अशावेळी सीबीआयचा पदभार संभाळत आहे जेव्हा अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय नाहीय तसेच अनेकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हंगामी संचालक एम. नागेश्वर राव यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील.
- मागच्या महिन्यात आलोक वर्मा यांची सीबीआय संचालकपदावरुन गच्छंती झाल्यानंतर नागेश्वर राव यांनी हंगामी संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता.
‘सिमी’वरील बंदीला आणखी पाच वर्षे मुदतवाढ:
- देशामध्ये छुप्या पद्धतीने घातपाती कारवाया केल्याबद्दल स्टुडण्ट इस्लामिक मूव्हमेण्ट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेवरील बंदीची मुदत आणखी पाच वर्षांनी वाढविण्यात आली आहे.
- सिमीकडून देशाला धोका असल्याने बंदीचा कालावधी वाढविण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी 2014 मध्येही सिमीवरील बंदीचा कालावधी वाढविण्यात आला होता.
- सदर संघटना देशासाठी भविष्यातही घातक ठरू शकते, संघटनेमुळे देशाच्या समता आणि एकात्मतेला बाधा निर्माण होऊ शकते, त्यामुळे बंदी वाढविण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
- सिमीविरोधात देशामध्ये 58 नवे गुन्हे दाखल झाल्याची दखल घेत बंदी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदीचा कालावधी 31 जानेवारी 2019 रोजी संपला, बंदी उठवावी की कालावधी वाढवावा यासाठी केंद्राने सर्व राज्यांकडून मते मागविली होती. त्यानंतर 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सिमीवर बंदी घालण्याचे मत नोंदविले.
ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या देशमुखचा पराक्रम:
- भारताच्या दिव्या देशमुखने व्हेलामन-एआयसीएफ महिला आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत दोन विजयांसह नवव्या फेरीअंती एकूण सात गुणांसह एकटीने आघाडी घेतली आहे.
- नागपूरच्या दिव्याने या विजयांसह आंतरराष्ट्रीय मास्टर आणि महिला ग्रँडमास्टर असे दोन्हीचे पहिले नॉर्म प्राप्त केले आहे.
- चेन्नईच्या पी. मिशेले कॅथरिना हिने नऊपैकी साडेसहा गुण मिळवत पहिला ग्रँडमास्टर नॉर्म मिळवला आहे. युक्रेनची ओस्माक लुइल्जासह ती दुसऱ्या स्थानावर आहे.
- मिशेलने आकांक्षा हगवणेविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. दिव्याने युक्रेनची महिला ग्रँडमास्टर ओल्गा बॅबी आणि मोंगोलियाच्या युरिंटुया उरुत्शेखवर विजय मिळवला.
- तर दिव्याची बॅबीविरुद्धची लढत चार तास आणि 20 मिनिटे चालली. 92 चालींनंतर तिला हा विजय प्राप्त झाला.
जम्मू काश्मीरमध्ये 5 नवी वैद्यकीय महाविद्यालये:
- जम्मू काश्मीरमध्ये नवीन पाच वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यासाठी केंद्र शासनाने 750 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
- पंतप्रधानांच्या हस्ते 3 फेब्रुवारी रोजी येथील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यात ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन यांचा त्यात समावेश आहे.
- जम्मू परिसरात सुसज्ज एम्स रुग्णालयाची सुविधा निर्माण व्हावी, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिक रहिवासी आंदोलन करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या वतीनेही आंदोलने करण्यात आली. या पाश्र्वभूमीवर पार पाडलेल्या या सोहळ्यात पंतप्रधानांनी सुसज्ज रुग्णालयामध्ये जम्मूवासीयांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतील, असे सांगितले.
- तर या प्रस्तावित रुग्णालयात 700 खाटांची सुविधा असणार आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या उत्तर विभागीय केंद्राचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.
भारतीय हॉकी महिला संघाचा आयर्लंडवर विजय:
- भारतीय महिलांच्या हॉकी संघाने स्पेन दौऱ्याची सांगता करताना विश्वचषक उपविजेत्या आयर्लंड संघाला 3-0 असे नमवत दमदार कामगिरीची नोंद केली.
- भारताने आयर्लंडशी 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली होती, तर नंतर मोठय़ा फरकाने विजय मिळवण्यात भारताला यश मिळाले.
- भारताच्या आक्रमक फळीने आयर्लंडवर प्रारंभापासूनच धारदार आक्रमणे केली. त्या दबावामुळेच भारताच्या नवजोत कौरला 13व्या मिनिटाला पहिला गोल करता आला. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला.
- मग पहिल्या सत्रानंतरदेखील भारताने हल्ले-प्रतिहल्ले कायम राखत आयर्लंडवर दडपण आणले. नंतरच्या सत्रात आयर्लंडच्या संघाला मिळालेला पेनल्टी कॉर्नरदेखील भारतीय बचावफळीने सफल होऊ दिला नाही.
दिनविशेष:
- 4 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
- शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला होता.
- सन 1944 मध्ये चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच केली होती.
- श्रीलंका देशाला सन 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
- सन 2004 मध्ये मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा