4 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 ऑक्टोबर 2018)
सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश रंजन गोगोई:
- ज्येष्ठ न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 46वे सरन्यायाधीश म्हणून 3 ऑक्टोबर रोजी शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनणारे ते पूर्वेकडील राज्यातील पहिले न्यायाधीश आहेत. त्यांचे वडील आसामचे मुख्यमंत्री होते.
- उच्च न्यायालयातील 21 वर्षाच्या सेवेनंतर माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा निवृत्त झाले आहेत. त्यातील 14 वर्ष त्यांनी देशातील विविध कोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे.
- तर नवे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 28 फेब्रुवारी 2001 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले होते. 23 एप्रिल 2012 रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती.
बजरंग, विनेशला ‘पद्मश्री’चा प्रस्ताव:
- भारताचे नामवंत युवा मल्ल बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांना क्रीडा मंत्रालयाच्या वतीने पद्मश्री पुरस्कार देण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. यापूर्वीदेखील काही खेळाडूंना खेलरत्न मिळण्यापूर्वी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- गेल्या महिन्यात खेलरत्न पुरस्कार न दिला गेल्याने नाराज झालेल्या बजरंग पुनियाने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाविरोधात न्यायालयात जाण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मंत्रालय आणि बजरंग यांच्यात संघर्ष उफाळून आला होता. अखेर खेलरत्न जाहीर झाल्याच्या दिवशीच बजरंगने केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले होते.
- राष्ट्रकुल आणि आशियाईत सुवर्णपदक पटकावूनही अन्याय झाल्याची भावना त्याने बोलून दाखवली होती. तसेच या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन क्रीडामंत्र्यांनी दिले. अखेरीस मार्गदर्शक योगेश्वर दत्त याच्या मध्यस्थीनंतर बजरंगने माघार घेत न्यायालयात न जाण्याचा निर्णय जाहीर केला होता.
रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर:
- उत्क्रांतीच्या शक्तीचा वापर करून नवी प्रथिने निर्माण करणाऱ्या संशोधनाला या वर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या प्रथिनांचा वापर जैवइंधनापासून औषधे आणि इतर उपचारांमध्येही करता येणे शक्य आहे.
- फ्रान्सेस एच. अरनॉल्ड, जॉर्ज पी. स्मिथ आणि सर ग्रेगरी पी. विंटर या तिघांना या वर्षीचे रसायनशास्त्राचे नोबेल रॉयल स्वीडीश ऍकॅडमीने जाहीर केले.
- डार्विन यांचा उत्क्रांतीच्या सिद्धांताचा वापर प्रत्यक्ष परीक्षानळीत करून नवी प्रथिने तयार करण्याचे काम या तिघा शास्त्रज्ञांनी केले, असे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे.
- या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या पद्धतीमुळे नवी एन्झाईम आणि नवी प्रतिपिंड (अँटिबॉडी) तयार करणे शक्य झाले. त्यामुळे पर्यावरणस्नेही रसायन उद्योगाकडे वाटचाल करणे शक्य होईल; तसेच विविध आजारांवर उपचार करून मानवी जीवन अधिक समृद्ध करता येऊ शकेल, असे पुरस्कार समितीने म्हटले आहे.
‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या शाखांचे विलीनीकरण:
- राज्यात सर्वाधिक शाखा असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने देशभरातील 51 शाखांचे विलीनीकरण केले आहे. त्यात महाराष्ट्रातील 35 शाखांचा समावेश आहे.
- खर्च कपातीसाठी तीन विभागीय कार्यालयेसुद्धा विलीन केली आहेत. 9600 कोटींच्या बुडीत कर्जांमुळे बँक 1200 कोटींचा तोटा सहन करीत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी बँकेने खर्च कपात सुरू केली आहे.
- तसेच यातूनच शाखा विलीन केल्या आहेत. त्यात ठाण्यातील सर्वाधिक 7 शाखा, मुंबईतील 6 व पुण्यातील 5 शाखा आहेत.
- जयपूर, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, रायपूर, चेन्नई, गोवा, रायपूर, नॉयडा, कोलकाता, चंदीगड येथील शाखांचाही विलीनीकरणात समावेश आहे. बँकेच्या देशभरात 1900 व राज्यात 450 शाखा आहेत.
आधार सुरक्षेसाठी आता ऑफलाइन व्हेरिफिकेशन:
- आधार कार्ड व्हेरिफिकेशनच्या वेळी वैयक्तिक गोपनीयता, डेटा सुरक्षिततेच्या चिंता सर्वांनाच सतावतात. म्हणूनच आधार कार्ड व्हेरिफिकेशन ऑफलाइन करण्याच्या प्रक्रियेवर केंद्र सरकार विशेष भर देत आहे. या प्रक्रियेत ऑथेंटिकेशनसाठी UIDAI सर्व्हरची आवश्यकता भासणार नाही.
- व्हेरिफिकेशनसाठी सरकार क्यूआर कोड आणि पेपरलेस केवायसी योजना आणत आहे. परिणामी बायोमेट्रिक डिटेल्स शेअर करण्याची तसेच आधारच्या सर्व्हरचा उपयोग करण्याची गरज उरणार नाही. या नव्या योजनेमुळे केवायसी प्रक्रियेतही युजर्सना आपला आधार क्रमांक देण्याची आवश्यकता भासणार नाही.
- खासगी कंपन्यांनी बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशनसाठी करावयाच्या प्रक्रियेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्यांचेही पालन या ऑफलाइन प्रक्रियेत होणार आहे. या ऑफलाइन केवायसीचा वापर सर्वच सेवांमध्ये केला जाऊ शकतो.
- क्यूआर कोड UIDAI च्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून त्याचे प्रिंट घेता येईल. या केवायसी आणि क्यूआर कोडमुळे आधारकार्डधारकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील. यूजर्सना केवळ आपले नाव आणि पत्ता द्यावा लागेल. ई केवायसीमुळे आधार क्रमांक न देताही बँकेत खाते उघडणे किंवा सिम कार्ड घेणे आदी कामे करता येतील.
दिनविशेष:
- 4 ऑक्टोबर हा दिवस राष्टीय एकता दिन तसेच जागतिक प्राणी दिन आहे.
- सन 1824 मध्ये मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.
- भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1884 मध्ये झाला.
- 4 ऑक्टोबर 1904 हा दिवस ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चे रचनाकर ‘फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड‘ यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा