4 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
4 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 सप्टेंबर 2018)
भारताच्या अंजुम आणि अपूर्वीला ऑलिम्पिक पात्रता:
- जपानमध्ये 2020 साली होणाऱ्या ऑलिम्पिकच्या नेमबाजीमध्ये सर्वप्रथम पात्रता पटकावण्याचा मान भारताच्या अपूर्वी चंदेला आणि अंजुम मुदगिल यांनी पटकावला आहे. जागतिक नेमबाजी स्पर्धेत अंजुमने व्दितीय स्थानासह रौप्यपदक, तर अपूर्वीने चौथे स्थान पटकावत ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्यात यश मिळवले आहे.
- या दोघींनी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (आयएसएसएफ) जागतिक चॅम्पियनशिपच्या 10 मीटर रायफलच्या प्रकारात हे यश पटकावले आहे. या स्पर्धेत अंजुमने 248.4 गुणांची कमाई करीत रौप्यपदक पटकावले.
- कोरियाच्या हॅना इम हिने 251.1 गुणांसह सुवर्णपदक, तर कोरियाच्याच इनुहेआ जुंग हिने 228 गुणांसह कांस्यपदक पटकावले, तर अपूर्वी चंदेलाला 207 गुण मिळवता आल्याने चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
- टोकियोतील स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्यासाठीची ही पहिलीच नेमबाजी स्पर्धा आयएसएसएफने भरवली होती. त्यात नेमबाजीच्या 15 प्रकारांमध्ये प्रत्येकी 4 याप्रमाणे 60 नेमबाज ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकणार आहेत. त्यामध्ये या दोघींनी जरी ऑलिम्पिक पात्रता मिळवली असली तरी या गटात अन्य जे नेमबाज पुढेदेखील पात्र होतील, त्यातील सर्वोत्तम गुण मिळवलेल्या नेमबाजांमधून भारताच्या राष्ट्रीय रायफल संघटना अंतिम स्पर्धकांची निवड करणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
‘दलित’ शब्द वापरू नका, केंद्र सरकारची सूचना:
- ‘दलित’ शब्दाचा वापर खासगी वाहिन्यांनी करु नये अशी सूचना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व खासगी वाहिन्यांना करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर ही सूचना देण्यात आली आहे.
- दलित शब्दाऐवजी अनुसूचित जाती असा शब्दप्रयोग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचं पत्र सात ऑगस्ट रोजी सर्व खासगी वाहिन्यांना पाठवण्यात आले आहे. पंकज मेश्राम यांच्या याचिकेवर जून महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबतचा निर्णय दिला होता.
- दलित शब्दाचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला जावा आणि याबाबतचे निर्देश सर्व वाहिन्यांना देण्याबाबत विचार केला जावा असे खंडपीठाने म्हटले होते. त्यानुसार सात ऑगस्ट रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व खासगी वाहिन्यांना ‘दलित’ शब्दाचा वापर खासगी वाहिन्यांनी करु नये अशा आदेशाचे पत्र पाठवले.
- मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही 15 जानेवारी रोजी एका निकालात अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या व्यक्तींसाठी दलित शब्द वापरता येणार नसल्याचे म्हटले होते.
ठाणे वर्षां मॅरेथॉनमध्ये रंजितकुमार आणि मोनिकाची बाजी:
- ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने 2 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या 29व्या महापौर वर्षां मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात रंजितकुमार पटेल आणि महिला गटात नाशिकची मोनिका आथरे या दोघांनी बाजी मारली.
- रंजितकुमारला 75 हजार आणि मोनिकाला 50 हजार रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. रंजितकुमार याने 1 तास 07 मिनिटे 41 सेकंदात 21 कि.मी. अंतर पार केले तर मोनिकाने 56 मिनिटे 52 सेकंदात 15 किमीचे अंतर पार केले. यंदा बारा गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे शहरातील खड्डे बुजवण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने राबवली होती.
- तसेच प्लास्टिक मुक्ती आणि अवयव दानाचा संदेश देत यंदाच्या वर्षी 29व्या महापौर वर्षां मॅरेथॉनमध्ये राज्यभरातील 21 हजार 700 स्पर्धक सहभागी झाले होते.
पुणे विमानतळाची मालवाहतुकीत भरारी:
- देशांतर्गत हवाई मालवाहतुकीत पुणे विमानतळाने सहाव्या स्थानी मजल मारली आहे. पुणे विमानतळावरून चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत तब्बल 72 टक्क्यांनी मालवाहतूक वाढली आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी दिली आहे.
- देशांतर्गत हवाई मालवाहतुकीत दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई आणि बंगळूरपाठोपाठ पुण्याने स्थान मिळविले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहा महिन्यांत तब्बल 72 टक्यांनी हवाई मालवाहतूक वाढली आहे. इतर विमानतळांच्या तुलनेत ही वाढ सर्वाधिक आहे.
- देशातील 28 विमानतळांमध्ये सर्वाधिक उत्पन्नाच्या गटात पुणे विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ अहमदाबाद आणि गोव्याचा समावेश आहे.
- पुणे विमानतळाचे उत्पन्न मागील आर्थिक वर्षात 160 टक्के वाढले. पुणे विमानतळाचे उत्पन्न आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 56 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये ते 146 कोटी रुपयांवर गेले.
नेट, जेईईच्या परीक्षा फीमध्ये कपात:
- मेडिकल, इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी स्थापन करण्यात आलेल्या टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नेट, जेईई परीक्षा देणाऱ्यांसाठी दुहेरी भेट दिली आहे. ही परीक्षा पूर्वीच्या तुलनेत तीनपट अधिक शहरात आयोजित करण्यात आली आहे. तर, फीमध्ये 20 ते 50 टक्के कपात करण्यात आली आहे.
- एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी सांगितले की, ही परीक्षा कॉम्युटरवर होणार आहे. त्यामुळे कागदाचा उपयोग शून्यावर आला आहे. याचा लाभ परीक्षार्थींना दिला जाणार आहे. पूर्वी यूजीसी नेट परीक्षा 91 शहरांत होत होती. आता ही परीक्षा 273 शहरात होणार आहे.
- एनटीएचे महासंचालक जोशी यांनी सांगितले की, या केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन मोफत टेस्ट सीरिजचे आयोजन 8 सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. यासाठी मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे टेस्ट घेण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांना कॉम्युटर बेस्ड परीक्षेचा अनुभवही येईल. याशिवाय 7 सप्टेंबर रोजी एनटीएच्या वेबसाईटवर ऑनलाइन टेस्ट सीरिज अपलोड करण्यात येईल.
- विद्यार्थी घरी बसूनही कॉम्युटरवरील परिक्षेचा अभ्यास करु शकतील. यूजीसी नेट परीक्षेची फी सामान्य श्रेणीसाठी 1000 रुपयांवरुन कमी करुन 800 रुपये करण्यात आली आहे. नॉन क्रिमिलेअर, ओबीसीसाठी 400 रुपये, एससी, एसटी, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांसाठी 200 रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे.
- तसेच त्यांनी सांगितले की, जेईई मुख्य परीक्षा जवळपास 80 टक्के परीक्षार्थी पेन पेपरने देत होते. याचे परीक्षा शुल्क 1000 रुपये होते. कॉम्युटर बेस्ड परीक्षेचे शुल्क सामान्य आणि ओबीसी श्रेणीच्या विद्यार्थ्यांसाठी एका पेपरसाठी 500 आणि दोन पेपरसाठी 900 निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थीनींसाठी एका पेपरचे शुल्क 250 आणि दोन्ही पेपरचे शुल्क 450 ठेवण्यात आले आहे.
दिनविशेष:
- महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1221 मध्ये झाला.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 मध्ये झाला.
- थॉमस एडिसन यांनी 4 सप्टेंबर 1882 मध्ये इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले. तसेच वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.
- केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म 4 सप्टेंबर 1941 मध्ये झाला.
- सन 1998 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.
- रघुराम राजन यांनी सन 2013 मध्ये रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे 23वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा