6 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (6 एप्रिल 2019)
जपानची हायाबुसा 2 मोहीम प्रगतिपथावर:
- जपानच्या हायाबुसा या शोधक यानाने एका लघुग्रहावर शंकूच्या आकाराचे स्फोटक यंत्र यशस्वीरीत्या पाठवले असून त्याच्या पृष्ठभागावर विवर तयार करून अंतर्गत रचनेचा शोध घेतला जाणार आहे. सौरमाला कशी तयार झाली असावी यावरही त्यामुळे प्रकाश पडणार आहे.
- ही मोहीम जोखमीची असून जपानच्या अवकाश संस्थेच्या हायाबुसा 2 यानाने पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या आरंभाचा शोध घेण्यासाठी चालवलेल्या अभ्यासाचा एक भाग आहे.
- हायाबुसा 2 वरून शंकूच्या आकाराचे एक स्फोटक यंत्र पाठवण्यात आले. त्यावेळी हायाबुसा यान रुगु या लघुग्रहापासून 1600 फूट म्हणजे 500 मीटर उंचीवर होते. हे स्फोटक यंत्र तेथे पडल्यानंतर चाळीस मिनिटांनी त्याचा स्फोट होऊन तेथे विवर तयार होईल. हा लघुग्रह पृथ्वीपासून 30 कोटी किलोमीटर अंतरावर असून हायाबुसा 2 यानाने हे स्फोटक यंत्र अंतराळ कचऱ्याशी टक्कर चुकवून अचूकपणे लघुग्रहावर पाठवले आहे. त्यासोबतच एक कॅमेराही पाठवण्यात आला होता त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमाची छायाचित्रेही टिपण्यात आली आहेत.
- शोधक यानाच्या तळाशी लावलेल्या कॅमेऱ्याने स्फोटक यंत्र योग्य प्रकारे सोडल्याचे दाखवले असून लघुग्रहावर स्फोट झाला की नाही याची अजून खातरजमा झालेली नाही. पण हे स्फोटक यंत्र तेथे पोहोचले आहे यात शंका नाही असे जपानच्या अवकाश संस्थेचे अभियांत्रिकी संशोधक ताकाशी कुबोटा यांनी सांगितले.
- स्फोटकांचा सर्व अडथळे पार करून अचूक वापर व इतर बाबी या अभूतपूर्व असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या मोहिमेत लघुग्रहाच्या अंतर्गत रासायनिक रचनेचा उलगडा होणार असून रूगू लघुग्रहावरील स्फोट कमी तीव्रतेचा राहणार असल्याने तो लघुग्रह कक्षाभ्रष्ट होणार नाही.
लंडनमधील विद्यापीठाकडून शाहरुखला मानद पदवी बहाल:
- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान म्हणजेच किंग खानला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता लंडनमधल्या विद्यापीठाने शाहरूखला मानद पदवी देऊन गौरवले आहे. ‘द युनिव्हर्सिटी ऑफ लॉ‘कडून त्याला लोककल्याण विषयातील पदवी प्रदान करण्यात आली. साडेतीनशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा दीक्षांतसोहळा पार पडला.
- शाहरूखने मानवी हक्क, न्याय आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. त्याने या कार्यात मोलाचे योगदान दिले म्हणूनच लोककल्याण विषयातील पदवी अभिनेता, निर्माता शाहरूखला आम्ही प्रदान करत असल्याचे विद्यापीठाने ट्विट करत म्हटले आहे. शाहरूखने ही पदवी स्वीकारली आहे.
बीसीसीआयचे लोकपाल श्रीशांतच्या बंदीबाबत निर्णय घेणार:
- सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेटपटू श्रीशांतच्या बंदीबाबतचा निर्णय लोकपाल डी.के. जैन यांच्याकडे सोपवला आहे. 2013 साली आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणी श्रीशांतने दाखल केलेल्या याचिकेवर, सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला बंदीबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश दिले होते. याबद्दल 3 महिन्यांमध्ये निर्णय घ्यावा अशीही अट घालण्यात आली होती.
- जस्टीस अशोक भुषण आणि जस्टीस के.एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने, बीसीसीआयचे लोकपाल डी.के. जैन यांना श्रीशांतच्या शिक्षेबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.
- 15 मार्च रोजी बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने श्रीशांतवर घातलेली आजन्म बंदीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र सध्याच्या घडीला ही शिस्तपालन समिती कार्यरत नसल्यामुळे, लोकपाल डी.के. जैन याबाबत निर्णय घेणार आहेत.
UPSC परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला:
- केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC 2018 चा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे. तर मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये राहणारी मराठमोळी सृष्टी देशमुख देशात पाचवी आली आहे.
- पहिल्या पन्नास क्रमांकात महाराष्ट्रातले चार विद्यार्थी आहेत. तृप्ती धोडमिसे 16वी, वैभव गोंदणे 25वा, मनिषा आव्हाळे 33वी आणि हेमंत पाटील 39वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
- तर देशभराचा विचार करता, या परिक्षेत कनिष्क कटारिया पहिला, अक्षत जैन दुसरा, जुनैद अहमद तिसरा, श्रेयांस कुमत चौथा आणि सृष्टी देशमुख पाचवी आली आहे.
मुंबईसह राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह:
- राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मराठमोळ्या गिरगावात, डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रा काढण्यात येत आहे. चित्ररथ, मर्दानी खेळ, बाईक रॅली आणि लोककलेची पर्वणी अशा कार्यक्रमांमुळे शोभायात्रेत अनेक रंग भरले आहेत.
- ढोल-ताशा, लेझीमच्या तालावर तरुणाई हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेसाठी तयार झाली आहेत. गुढी उभारुन ठिकठिकाणी रांगोळी काढून यात्रेचं स्वागत केलं जातंय. चिमुरड्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण उत्साहात शोभायात्रेत सहभागी झाले आहे.
- गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. यंदाच्या शोभायात्रेत अनेक महिला बुलेटस्वारी करताना पाहायला मिळत आहे. त्याचसोबत शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेकांनी देशभक्तीचे संदेश घेऊन शोभायात्रेत सहभागी झाले आहेत. पारंपारिक पोशाखात महिला, तरुणमंडळी या मेळाव्यात सहभागी झालेत.
दिनविशेष:
- डग्लस एअरक्राफ्ट कंपनीचे निर्माते डोनाल्ड विल्स डग्लस याकॅह यांचा जन्म 6 एप्रिल 1892 मध्ये झाला होता.
- भारतीय उद्योजक विष्णू महेश्वर उर्फ व्ही.एम. तथा दादासाहेब जोग यांचा जन्म 6 एप्रिल 1927 रोजी झाला.
- सन 1930 मध्ये प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
- भारतीय क्रिकेटपटू व प्रबंधक ‘दिलीप वेंगसकर’ यांचा जन्म 6 एप्रिल 1956 रोजी झाला.
- भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना 1980 मध्ये झाली व अटल बिहारी वाजपेयी यापक्षाचे पहिले अध्यक्ष झाले होते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा